सरिलं दळयाण, मला आणिक घेणं आलं
बाळा गं ह्यानी माझ्या, बाप लेकानी येणं केलं
असं दळण दळीतं, सूप भरुनी दळयातं
आता ना गं माझा राघू, शाळेला गं जायायाचा
जातं काही नव्हं, डोंगरीचा गं परबतु
खंड्याच्या खंड्या दळी, बाळ माझा संबरतु
असं दोन बायकाचा रथ, कुणाच्या गं वाड्यामधी
अशा दळितात सासू सुना, सात खणाच्या गं माडीमधी
असं जातं काही नव्हं, डोंगरीचा परबतु
खंड्याच्या खंड्या दळी, बाळ माझा गं संबरतु
असं जातं काही नव्हं, काळा कुरुंद गं खाणियीचा
अशा गवळण माझ्या बाई, भर आपल्या ज्वानीचा
असं जातं वढायाला, काय बसावं हल्यावाणी
असं दोघींच्या मधून, रथ चालला पाण्यावाणी
असं जातं ना वढावं, नखा बोटाच्या आगयळी
असं बयाचं पेले दूध, जसं मधीच्या सागायळी
असं दळता कांडतानी गं, घाम गळतो वाटीलोटी
अशी बयानी दिली घुटी गं, जायफळाची मुठीमुठी
अशी दळता कांडतानी गं, माझी तळहात पिवयाळी
अशी बयानी दिली गुटी गं, जायफळाची कवयाळी
अगं असं जातं ना वढावं, अंग कशाला हलायावं
अशी दळ ना माझ्या बाई, खुटा मनगटी तोलायावं
गळा
जाईचं झाड, कळीचा भार,
तोडिती नार, गुंफिती हार.
सुरत अनिवार, चंद्राची कोर.
झाडावरिला राघू, बोलंना काही
वनाच्या ठायी, पानी का नाही.
बंधुला इडा दे गं, राधिका बाई.
सख्याला इडा दे गं, राधिका बाई.