अर्थसंकल्पावरचे माझे सततचे प्रश्न फेटाळून लावत बाबासाहेब पवार म्हणतात, , "आम्हाला ह्याबद्दल काहीच माहित नाही.".
त्यांची पत्नी मंदा तर उलटा सवाल करते, "आम्हाला काय हवंय हे सरकारने कधी विचारलं का?" ते आमच्या वतीने परस्पर कसं काय ठरवू शकतात? आम्हाला महिन्याचे ३० दिवस काम हवं आहे.”
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्याल्यात कुरुळी गावाच्या बाहेर असलेल्या त्यांच्या पत्र्याच्या खोलीत आज बरीच लगबग सुरू आहे. “जालन्यावरून आम्ही २००४ साली इथे राहायला आलो. आमचं स्वतःचं असं गाव कधी नव्हतंच. आमचे लोक कायम गावाचा वेशीबाहेर राहतात कारण आमची सतत भटकंती सुरू असते,” बाबासाहेब सांगतात.
त्यांनी न सांगितलेलं बरंच काही समजून घेण्याची गरज आहे. कुणे एके काळी इंग्रजांनी भिल्ल पारधी जमातीवर "गुन्हेगार जमात" असा शिक्का मारला. ७० वर्षांपूर्वी गुन्हेगार सूचीमधून ते विमुक्त झाले पण आजही भिल्ल पारधी जमातीचे लोक सामाजिक कलंक आणि वंचनेच्या विळख्यात अडकले आहेत. अशा अनेक जमातींचा महाराष्ट्रमध्ये अनुसूचित जमातींमध्ये समावेश झाला असून, आजही त्यांचे स्थलांतर बहुतांश वेळा दडपशाहीमुळेच होते.
त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पाचं भाषण आणि त्यातले स्थलांतरावरचे विचार ऐकलेले नाहीत. ते ऐकून त्यांना फार आनंदही होणार नाही. “ग्रामीण भागांमध्ये संधी उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे, जेणेकरून स्थलांतर हा एक पर्याय असेल, गरज नाही,” असे सीतारामन त्यांच्या २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्प भाषणात म्हणतात.



