पाणावलेले बदामी आकाराचे नितळ तपकिरी डोळे! रिझवाना हाजीला भेटता क्षणी हे डोळेच नजरेत भरतात. रिझवाना चटकन डोळे पुसते. केस सारखे करून ते ओढणीखाली घेत हळूच म्हणते- ‘पुरुषांसाठी असतात गॉगल्स!’
“माझा नवरा घालतो गॉगल्स,’’ गडद गॉगल्स घातलेल्या शरीककडे पाहात ती बोलत असते. जवळच्याच मिठागरात राबत असलेला शरीक जोर लावून स्फटिकलेलं मीठ ओढत असतो.
“तू का नाही घालत?’’ प्रश्न ऐकताच ती मनापासून हसते. जणू ही कल्पनाच अशक्य नि विचित्र असावी अशी! “काय म्हणतील मोठी माणसं! आमच्या समाजात नाही घालत बायका गॉगल्स!’’ बोलण्याच्या ओघात हलवलेल्या नकाराच्या हलक्या हाताने ती जणू प्रश्नच पुसून टाकते. न राहून पुन्हा एकदा पाणावलेले डोळे पुसत म्हणते, “मी जराशी बुजरी आहे!’’ तिचा संकोच तिच्या शब्दांइतकाच गोड भासून जातो.
कोरड्या, खारट वाऱ्याची सततची सोबत. त्यापायी धूळ आणि मिठाचे कण डोळ्यात साचत राहतात. मग डोळे कोरडे पडतात, दृष्टीवर परिणाम होतो. रिझवानाचे सतत पाणावणारे डोळे हे याच त्रासाचं लक्षण. गुजरातमधल्या मिठागरांमध्ये राबणाऱ्या कामगारांमध्ये- आगरियांमध्ये- आढळणारा हा सगळ्यात सामान्य आजार! आगर या मूळ गुजराती शब्दावरून आगरिया हा शब्द आलाय. याचा अर्थ मिठागरात राबणारे कामगार. कच्छच्या रणात साधारण ५,००० चौरस किलोमीटर परिसरावर ही मिठागरं पसरलेली आहेत. इथल्या जमिनीवरचा सखल भाग उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कोरडाच असतो. पावसाळ्यात मात्र या खोलगट सखल भागात पाणी साठतं. पावसाळ्यापुरते ते बनतात पाणथळीचे प्रदेश!
इथलं वाळवंट पाणथळ प्रदेशात रूपांतरित होतं नि रणचा अनोखा परिसर जैवविविधतेने नटून जातो. काळवीट, रानडुक्कर आणि हरिणासारखे प्राणी वर्षभर इथेच वास्तव्याला असतात. पावसाळ्यात हा परिसर फ्लेमिंगो आणि पेलिकनसारख्या स्थलांतरित पक्ष्यांनी बहरून जातो. ज्या त्या वर्षी काय घडणार याचा अंदाज या वन्यजीवांच्या आगमनावरून बांधला जातो. त्यामुळे एक म्हण इथे प्रचलित आहे: “कच्छमा काले शु आवसे, ए आजेज देखे. [कच्छमधे भविष्याचं प्रतिबिंब वर्तमानातच पाहता येतं.]”
इथलं पाणी ओसरलं की मग आगरिया इथे येतात नि तंबू उभारून आठ महिने इथेच तळ ठोकतात. इथल्या जमिनीखालच्या खाऱ्या पाण्यापासून ते मीठ तयार करतात. भारतात तयार केल्या जाणाऱ्या एकूण मिठापैकी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मिठाचं उत्पादन यातून होतं.
हे रण म्हणजे सरळसोट रेषांचं एक निराळंच जग आहे: मिठाच्या आगरांचं पांढरंशुभ्र जाळं, चौकोनी सोलर पॅनल्स आणि जमिनीवरचे अगदी एकसारख्या रचनेतले आयताकृती भाग. विशाल पसरलेल्या मिठागरांची अंगावर येणारी दृढ कठोरता. सकाळी १० वाजताच कच्छच्या रणात सूर्य एखाद्या वितळत्या तप्त गोळ्यासारखा तळपत असतो आणि सगळीकडे असह्य चकाकी ल्यालेलं पांढरपण पसरलेलं असतं. थेट क्षितिजापर्यंत पसरलेला मिठाचा जाडसर खारट थर दुसऱ्याच जगातल्या भूमीगत भासतो. खाली आणि वर सगळीकडे पांढराच रंग! डोळे दिपवून टाकतो... नकोसा वाटून जातो. उष्णता सगळ्याच गोष्टींमधलं पाणी आटवून टाकते: ओठ फुटतात, घसा तहानेने व्याकूळतो, डोळे पाणावत राहतात नि कोरड्याठाक जमिनीसारख्या शुष्क टाचाही भेगाळून जातात... आरपार!














