चालता चालता अमरजीत कौर यांची पावलं अवचित थबकतात. शेण भरलेली पाटी (धातूचं परातीसारखं भांडं- तसला) उचलून डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न त्या करत असतात. आधी ते डगमगतं; मग काही क्षणांनी त्या! मग सावकाश त्यांची छोटी छोटी पावलं रुडी म्हणजे शेणाच्या ढिगाच्या दिशेने जाऊ लागतात... म्हशींच्या गोठ्यातून गोळा केलेलं आणखी एक पाटीभर शेण टाकण्यासाठी! एक काळ असा होता; डोक्यावरची १०-१२ किलो शेणाने भरलेली पाटी अमरजीत कौर सहज वाहून न्यायच्या. पण आता गात्रं थकली आहेत. वयाच्या बहात्तराव्या वर्षी ते शक्य होत नाहीये. तरीही आज डोक्यावरच्या तसल्याच्या भारापेक्षा त्यांच्या काळजातल्या दुःखाचं ओझं तुलनेने जास्त आहे. कदाचित त्यामुळे त्यांची पावलं जास्तच मंदावल्यागत झालीयेत.
कुटुंबासंदर्भातला एक सहज साधा प्रश्न मी विचारला अन् मनात उसळलेल्या आठवणींच्या लाटा त्यांना थेट २४ वर्षं मागे घेऊन गेल्या. “उनहांदास्य पट्टी मोड ते तेरा मुंडा मार गया अॅक्सिडेन्ट नाल. [“ते आले आणि म्हणाले, पट्टीजवळच्या वळणावर तुझा मुलगा अपघातात मरण पावला.]’’ त्या सांगत असतात, “तो रिक्षा चालवायचा. गेला तेव्हा जेमतेम अठरा वर्षांचा होता तो.’’ पाच वर्षांनी दुसराही मुलगा त्यांनी गमावला. अवघा एकवीस वर्षांचा होता तो! बोलता बोलता त्या मग परत एकदा शेण गोळा करण्यासाठी म्हणून उकिडव्या बसू लागतात, तेव्हा त्यांचे गुडघे कड कड वाजतात नि थकलेपणाची जाणीव करून देतात. आता बसल्यावर त्यांचे हात असे काही चालू लागतात की जणू एखादं यंत्रच!
अमरजीत कौर यांचा नवरा दारुडा. तो साधारण ३६ वर्षांपूर्वी वारला तेव्हा ही लेकरं होती अवघी चार-सहा वर्षांची! अगदी लग्न झालं तेव्हापासून अमरजीत गोहा-कुरा (शेण गोळा करणं) हे काम करत आलेल्या. हे काम आणि त्यातून पदरात पडणारा मोबदला नसता तर दोन मुलांना आणि दोन मुलींना (मुलींची एव्हाना लग्नं झालीयेत) लहानाचं मोठं करणं शक्यच झालं नसतं त्यांना! आठवणींच्या गाठी सुटत जातात तसं मनात पुन्हा दु:ख उफाळून येतं. ते उरी कवटाळून आपल्या तळहातांनी त्या आणखी शेण गोळा करत पुढे पुढे सरकत राहतात. मूठ मूठ शेण घेतात आणि आपल्या पाटीत टाकत जातात. आता पाटी उचलून डोक्यावर ठेवायचीय. एक दीर्घ सुस्कारा! आणि साधारण शंभर मीटरवर साठवलेल्या शेणाच्या ढिगाऱ्याकडे त्या चालू लागतात. अधेमधे लटपटायला होत असतं. गोठा साफ करायचं हे काम आज सकाळपासून चाललंय आणि ही त्यांची विसावी खेप आहे. अमरजीत या मेहरे शीख समाजाच्या. हा समाज पंजाब राज्यात अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट आहे. भूमिहीन दलित असलेल्या अमरजीत पट्टी गावामधल्या सात घरचे गोठे साफ करतात, तिथलं शेण गोळा करून आपली उपजीविका भागवतात.
“गोठ्यातलं शेण गोळा करण्यासाठी मी जेव्हा उकिडवी बसलेली असते तेव्हा अनेकदा म्हशींचं मूत्र माझ्या डोक्यावर सांडतं. आणि रोज रोज काही मी न्हाऊ शकत नाही. रोजचा साबण-शॅम्पूचा खर्च मला परवडत नाही. म्हणून मग मी ही अशी प्लास्टिकची पिशवी डोक्यावर बांधते,’’ मुठीत ठेवलेली काळी प्लास्टिकची पिशवी दाखवत अमरजीत सांगत असतात. आत्ता कुठे दिवसातलं हे पहिल्या घरचं काम त्यांनी उरकलंय. आपल्या गोठ्यात दहा म्हशी बाळगणाऱ्या जमीनदार शेतकऱ्याचं हे घर. इथून आता त्या चालत चालत पुढच्या घरी जातील.





