“रॉयल बंगाल वाघ जेव्हा गावात शिरतो, तेव्हा अक्षरशः गोंधळ उडतो,” असं लुत्फोर मोल्ला सांगतो.
वाघ गावात शिरल्याची बातमी पसरताच लुत्फोर आपल्या माणसांसोबत धावत येतो आणि वाघाला परत जंगलात हुसकावून लावतो. गेल्या चार-पाच वर्षांपासून सुंदरबनातील कुलतोली ब्लॉकसाठी राज्य वनविभागाने तयार केलेल्या दोन ‘क्विक रिस्पॉन्स टीम्स’ पैकी एका टीमची जबाबदारी लुत्फोरकडे आहे.
या वाघ हुसकावणाऱ्या टीमच्या म्होरक्याबद्दल कळताच आम्ही त्याच्या गावाकडे म्हणजे माईपिट कोस्टल पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पुर्बा गुर्गुरिया गावाकडे रवाना झालो.
डांबरी नसलेला कच्चा रस्ता पुढे मातीच्या खडबडीत वाटेवर जातो. वळणदार रस्त्याच्या कडेला माटला नदीचं खोल काळं पाणी वाहतं. तो अर्धा तास चालत असताना आम्हाला संपूर्ण माटलावर एकही बोट दिसली नाही. नदीच्या दुसऱ्या काठावर विशाल, दाट जंगल उभं होतं.
पुर्बा गुर्गुरियामध्ये जवळपास ५,६०० लोक (जनगणना २०११) राहतात. यात बहुसंख्य हिंदू असले तरीही मुस्लिमांचीही वस्ती बऱ्यापैकी आहे. भुबनेश्वरी ग्रामपंचायतीतल्या या गावात मासेमारी आणि शेती हेच उपजीविकेचे मुख्य स्रोत आहेत.
आम्ही बट टोला या वस्तीवर पोहोचल्यावर जिथं लुत्फोर राहतो त्या घराचा पत्ता विचारला. बट टोलालगतच्या काली मंदिराच्या अंगणात एक किशोरवयीन मुलगा खेकड्यांनी भरलेली पिशवी हातात धरून थांबला होता. आम्हाला पाहून तो म्हणाला, “तुम्ही कोलकात्याहून आलात ना? मी लुत्फोर मोल्लाचा मोठा मुलगा. तुमचीच वाट बघत होतो.”
लुत्फोरचं घर जवळच आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुमारे १,००० चौरस फूट जमिनीवर ते बांधलंय. या एकमजली घरात लहान विटांच्या तीन खोल्या, काँक्रीटचं छत आणि एक व्हरांडा आहे. मोठ्या खोलीत शिरताच खाटेवर आडवा पडलेल्या एका अशक्त माणसाचा आवाज आला, “काय सांगू, या तापाने गेल्या काही दिवसांपासून मी आजारी आहे. अगदी नको झालंय.” हा लुत्फोर मोल्ला? हा इतका अशक्त माणूस!








