“तार दिसली आणि वाटलं, संपलं सगळं... आपल्या मायभूमीत काही परत जाता यायचं नाही. माझ्या दादोंचे दादो [खापर पणजोबा] इथे, या इथे मुर्शिदाबादमध्येच रहायचे. माझी आजी [आईची आई] भगवानगोलाच्या याच गावची. आज आमचं घर तिथेच आहे.”
मेहबूब शेख, वय ३६. मनातली काळजी, चिंता चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. बलिया हसेनसागर या आपल्या गावी, आपल्या घरी तो पूर्वापारपासून आपली मुळं या मुर्शिदाबादच्या मातीत कशी घट्ट रुजलेली आहेत ते सांगत होता. ‘बांग्लादेशी घुसखोर’ असा ठपका ठेवून त्याला सीमापार हुसकण्यात आलं त्याला आता कुठे महिना होतोय.
“मतदार कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड – एक न् एक कागद आहे माझ्याकडे. काबाडकष्ट करून मी थोडी जमीन सुद्धा विकत घेतलीये. मग आता ते मला बांग्लादेशी कसं काय म्हणू शकतात?” हा स्थलांतरित मजूर आम्हाला विचारतो.
आणि असा सवाल करणारा मेहबूब काही एकटा नाही. मुर्शिदाबादहून कामासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेल्या अनेक मजुरांचा अगदी हाच सवाल आहे. मग ते बांधकाम मजूर असोत, घरकामगार किंवा पथारीवाले, फेरीवाले. आमच्या या जिल्ह्यातल्या बंगाली बोलणाऱ्या मुस्लिम स्थलांतरित मजुरांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये असं टिपून का छळण्यात येतंय?



















