४५ वर्षीय सीता ससाणे नि त्यांचा नवरा पहाटेपासून ऊस तोडणी करत होते. ऊन्हं वर आली. मग दोन घास खाऊन घ्यावेत, म्हणून सीताताई फडाजवळच्या आडोशाकडं आल्या. त्यांच्या मागोमाग ५५ वर्षीय केशवही भाकर-चटणी पोटात ढकलायला येऊन बसले. नि क्षणात झिट आल्यागत केशवनं जमिनीवर लोळण घेतली. नवऱ्याची ही अवस्था पाहून सीता हादरली.
पाहता पाहता केशवचा चेहरा वाकडा झाला. सीता भांबावली. केशवला तशाच अवस्थेत पायजम्यातच लघुशंका झालेली.
“मी आरडून वरडून त्यांना उठवू लागले. पण ते बेशुद्ध झालेले,” सीता तो प्रसंग आठवतात. बीड जिल्ह्यातील आहेरवाहेगावमधील त्यांच्या झोपडीवजा घराच्या अंगणात, अजूनही त्यांना तो प्रसंग कालपरवाच घडल्यासारखा आठवतो.
सीता-केशव व त्यांची दोन मुलं सौरभ व सूरज कोल्हापूरमधील एका साखर कारखान्यासाठी ऊस तोडीला आलेले. तेव्हाची ही घटना. पहाटेपासून हे कुटुंब ऊसतोडीत गुंतलेलं. एकामागून एक ऊसाचं वावर सटासट छाटणं, ऊसाच्या मोळ्या बांधून, ते ओझं डोक्यावर वाहून, ट्रॅक्टरवर लादणं, हे त्यांचं काम सूर्य उगवण्यापूर्वीच सुरू झालेलं.
सूर्यास्तापर्यंत कामाचं हे रहाटगाडगं चालणार होतं. दुपारच्या जेवणानंतर घटकाभराची विश्रांती मिळणार. सीतानं आदल्या रात्री थापलेल्या भाकरी आडोशाला ठेवलेल्या. न्याहरीची सुट्टी होताच तिनं जेवणासाठी चार ताटं वाढली. केशवही जेवायला बसला, पण त्याचं लक्ष ताटातल्या अन्नावर नव्हतं. तो कुठंतरी हरवल्यागत भाकरीकडं पाहत होता. नि अचानक त्याचा चेहरा बदलला. कुणीतरी जबरदस्तीनं मान मोडतंय, असं त्याचं तोंड एकाच दिशेनं तिरपं वळू लागलं.
“मी हाबकले. ह्यांना गडबडीनं दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही,” ऑक्टोबर २०२३ मधील ती कायमचा चटका लावून जाणारी दुपार आठवत सीता सांगतात.
डॉक्टरांनी केशवला तपासलं, निदान झालं : अर्धांगवायूचा झटका (पॅरालिटिक स्ट्रोक). केशवला तातडीनं मोठ्या रुग्णालयात ॲडमिट करणं आवश्यक होतं.
पण ते शक्य झालं नाही. कारण, ऊसतोडमजूरांनी मुकादमांकडून आगाऊ रक्कम घेतलेली असते. तितक्या रक्कमेचा ऊस तोडल्याशिवाय फड सोडायची मुभा त्यांना मिळत नाही. इतर अनेक मजूरांप्रमाणं सीता-केशवनं दीड लाखाची उचल घेतलेली. ती त्यांना सहा महिन्याच्या हंगामात राबराबून फेडायची होती. तो करार मोडायची सवलत मुकादमानं नाकारली.
“मी मुकादमाकडं माझ्या नवऱ्याला दवाखान्यात नेऊ द्या म्हणून विनवणी केली. पण तो ऐकायला राजी नव्हता,” सीता सांगतात. सीता-केशव हे दलित कुटुंब. एका मर्यादेबाहेर ते मुकादमाशी हुज्जत घालू शकले नाहीत. अखेर अंथरूणाला खिळलेल्या केशवला फडाजवळच झोपवून सीता व तिची दोन मुलं ऊस तोडू लागले. २३ वर्षांचा सौरभ व २१ वर्षांचा सूरज ही तरूण मुलंही आपल्या बापाला दवाखान्यात नेण्यासाठी कामातून रजा मागू शकले नाहीत.












