“बाबराने भारतात दोन गोष्टी आणल्या. एक म्हणजे, बंदुकीची दारू आणि दुसरी, बाकर-खानी!” ऐजाज हसन सांगत असतात. नान-बाई अर्थात बेकर हा त्यांचा पिढीजात व्यवसाय. ऐजाज हे तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी. पाटण्यातल्या सर्वात जुन्या वस्त्यांपैकी एक आहे- लोधी कटरा. इथे त्यांचं घर आहे. आणि या घराशेजारी तंदूर (मातीची पारंपरिक चूल) आहे. या तंदूरजवळच ते बसलेत. हंड्याच्या आकाराची ही भलीमोठी भूमिगत चूल त्यांनी नुकतीच स्वच्छ केलीय आणि थंड व्हावी म्हणून त्यावर ओल्या मातीचा लेप दिलाय.
बाकर-खानी म्हणजे पापुद्र्यापापुद्र्यांची खमंग खुसखुशीत गोड रोटी. एक अस्सल मुघल पाककृती असंही हिचं वर्णन करता येतं. हा पदार्थ कसा आला, कुठून आला याबद्दलच्या अनेक कथा आहेत. त्यातली सगळ्यात लक्षणीय आहे ती, ऐजाज हसन यांना त्यांच्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट. त्यांचे आजोबा म्हणजे हाफिज आमीर हसन. अत्यंत कुशल बेकर अशी त्यांची ख्याती. या व्यवसायातला हा दादा माणूस. सगळे बेकर त्यांना गुरूस्थानी मानायचे. “बंगालमधे आणि उत्तर प्रदेशात बाकर-खानीचे नानाविध प्रकार मिळतात; पण त्या सगळ्यांमधे पाटण्याची बाकर-खानी एकदम अनोखी. म्हणूनच ‘शाही’ किंवा ‘मुघलाई बाकरखानी’ म्हणून ती ओळखली जाते.” एकीकडे अशी माहिती देत असताना ऐजाज शांतपणे इम्तियाज या आपल्या मदतनीसाची वाट पहात असतात. सकाळचा चहा पुन्हा गरम करून इम्तियाज त्यांना आणून देणार असतो.
बाजारात गेल्या चार-पाच दशकांपासून चर्चा आहे ती लहान लहान बाकर-खानींची. या बाकर-खानी अस्सल वाटाव्या म्हणून या साखरेच्या पाकात बुडवून काढल्या जातात. खऱ्याखुऱ्या बाकर-खानींपेक्षा या खूपच स्वस्त असतात. बाजाराच्या रेट्यापायी केल्या जात असलेल्या या उठाठेवींमुळे अस्वस्थ असलेले ऐजाज म्हणतात, “आता बाकर-खानीचाही सुळसुळाट झालाय आणि बेकर मंडळींचाही! पाटण्यात अगदी २५-३० रुपयातही बाकर-खानी मिळेल. पण ती खाल्ल्यावर ना खाणाऱ्याचं मन भरेल; ना ही कला अवगत करण्यात ज्यांनी आपली आयुष्यंच्या आयुष्यं घालवली त्यांचं पोट!”
ऐजाज म्हणतात- या नक्कल करणाऱ्यांनी त्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतलाय. त्यांचा अनुभव असं सांगतो की अगदी जरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक अख्खा दिवस चार लोक राबले तरी तंदूरमधे दिवसाला फार फार तर ५० बाकर-खानी बनवता येतात; त्याहून जास्त नाही.




























