…मोन्युल चोकले ग्याल लो
मोन्युल चोकले ग्याल लो
(मोन्पाच्या मातीचा विजय असो
मोन्युलचा विजय असो)
शालेय सभेतलं हे शेवटचं गाणं मनात कुतूहल निर्माण करून गेलं. केवळ ते ओळखीचं किंवा मला माहित नसलेल्या भाषेतलं गाणं होतं म्हणून नाही, तर या हिमाचलच्या दऱ्यांमध्ये ऐकलेल्या बोलीपेक्षा ते ऐकायला वेगळंच वाटत होतं म्हणून. मी पश्चिम कामेंग जिल्ह्यातील चुग गावात राहून मोन्पा लोकांच्या जीवनाची नोंद करून आता काही काळ उलटलाय.
जुलै अखेरीस गुरुवारच्या एका सकाळी मी अरुणाचल प्रदेशच्या सर्वांत निसर्गरम्य म्हणून ओळख असलेल्या गावात थांबले होते. नावांग त्सेरिंग यांच्या गाडीवर बसून मी चुगपासून सहा किमी दूर असलेल्या रामा कॅम्प येथील पीएम श्री सरकारी माध्यमिक शाळेत पोहोचले. जवळपासच्या गावांतून बरीच मुलं रोज सकाळी शाळेत चालत येतात.
सकाळी ९ वाजता सभेची वेळ असते आणि मी भिंतीच्या शक्य तितक्या जवळ, परिपाठ सादर करणाऱ्या मुलांच्या मागेच उभी राहण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या समोर गर्द हिरवे डोंगर, निळंशार आभाळ आणि त्यात मुलांच्या गणवेशाला साजेसे पांढरेशुभ्र ढग आहेत. शाळेचे २६० विद्यार्थी रांगेत व्यवस्थित उभे आहेत.





