गुलाबाच्या पाकळ्या असो वा पानांवरल्या शिरा इर्शाद हुसेन पितळेच्या भांड्यावर या आकृत्या आणि बरंच काही सहजपणे कोरू शकतात. ते कलाकार असून त्यांची कला म्हणजे ‘सिया कलम’; पितळ नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहराची आणखी एक ओळख म्हणजे ही कला.
पीरजादा इथल्या कारखान्यात त्यांनी दिवसभरात कोरीवकाम केलेल्या वस्तू आजूबाजूला विखुरलेल्या आहेत. यामध्ये मोर, तेलाचे दिवे, स्वस्तिकचं चिन्ह असलेल्या कप-बशा, पूजेच्या घंटा आणि तलवारीच्या मुठीवर कोरलेले सिंहाचे मुखवटे अशा बऱ्याच वस्तू तिथं होत्या.
हुसेन यांच्या अनेक पिढ्या सिया कलमचं काम करत आल्या आहे. हुसेन यांनीही वयाच्या दहाव्या वर्षी या कामाला सुरुवात केली. ते सध्या ज्या नक्षीदार दिव्यावर काम करतायत, तो दिवा तिपाईवर (छोटा लाकडी टेबल) दोन दगडांच्या मध्ये सरळ ठेवलेला आहे. हुसेन यांनी दिव्याला बांधलेला एक धागा टेबलाखालून नेऊन उजव्या पायाने घट्ट पकडला आहे. हुसेन जेव्हा पेन्सिलसारख्या छिन्नीवर लाकडी काठी ठोकतात तेव्हा त्या पितळी वस्तूवर सुंदर नक्षी आकार घेते.
“गिऱ्हाईक अनेकदा खास भेटवस्तू म्हणून ठराविक किंवा आवडती नक्षी कोरण्याची मागणी करतात. काही जोडपे हिंदी, उर्दू किंवा इंग्रजी भाषेमध्ये नावं कोरून घेतात, काही लोक कुरानमधील आयती किंवा भिंतीवर लावण्यासाठी आकर्षक नक्षीकाम करून घेतात. मी बऱ्याचदा फुलांची नक्षी काढतो कारण लोकांना ती जास्त आवडते,” ते पारीला सांगतात. “मला स्वतःला गुलाबाच्या फुलाची नक्षी असलेल्या वस्तू जास्त आवडतात.”
हा निष्णात कारागीर दहा फुटांच्या खोलीच्या उंबरठ्यावर बसलाय, ज्यात इतर कारागिरही काम करतायत. हे काम सुरू केल्याच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी ते सांगतात, “शिकताना हे सगळं कलात्मक वाटायचं अन् आता हे फक्त काम वाटतं.”




















