मोहम्मद अस्लम गरम वितळलेलं पितळ एका साच्यामध्ये ओतत असताना त्याचे लहान कण हवेमध्ये उडताना दिसतात. हे पितळाला चंदन पियाली (पूजेसाठी वापरली जाणारी छोटी वाटी) चा आकार देईल.
पितळेच्या कामात पारंगत असलेल्या या धातू कारागीराचे, अस्लमचे हात घट्ट आणि सावधपणे फिरत असतात. तो पितळ ओतताना साच्यावरील दाब मोजतो, वस्तूला आकार देणारी रेती सांडत तर नाही ना याची खात्री करतो.
“तुम्हाला तुमचे हात घट्ट ठेवावे लागतील नाहीतर साच्याची रचना बिघडेल. अडत (साचेबद्ध केलेली वस्तू) खराब होईल,” ५५ वर्षीय अस्लम सांगतात. परंतु, गळणाऱ्या रेतीपेक्षा त्यांना हवेत उडणाऱ्या कणांची जास्त चिंता आहे. “तुम्हाला ते दिसलं का? हे पितळ आहे आणि ते वाया जाणार आहे. आम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल,” ते चिडक्या स्वरात बोलले. “१०० किलोग्रॅम पितळामागे ३ किलोग्रॅम पितळ हवेत वाया जाते. म्हणजे अंदाजे ५० रुपये हवेत गायब होतात.”
पितळ कामासाठी प्रसिद्ध असलेल्या मुरादाबादच्या पीरजादा भागातल्या अनेक भट्ट्यांपैकी एका भट्टीमध्ये काम करणाऱ्या मूठभर कारागीरांपैकी एक अस्लम आहे. या कारागिरीला स्थानिक भाषेमध्ये ‘धालाय का काम’ किंवा ‘कास्टिंग’ असे म्हणतात, ज्यात कारागीर पितळी सिली (वीट) चे तुकडे वितळवून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू तयार करतात.
कोळसा, वाळू, लाकडी फळ्या, लोखंडी रॉड, पक्कड आणि वेगवेगळ्या आकाराचे चिमटे हे त्यांचं कामाचं साहित्य असून अस्लम आणि त्यांचे सहाय्यक रईस जान दिवसातले १२ तास जिथे काम करतात तिथे विखुरलेले असते. दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या पाच स्क्वेअर फूट जागेसाठी अस्लम दरमहा १५०० रुपये भाडे देतात.




















