मोहम्मद इस्लाम हे संभलच्या सराय तरीन या भागात हाडे व शिंगांपासून बटणं, बिअरचे ग्लास, गृहसजावटीच्या वस्तू आणि स्वयंपाकघरातील भांडी तयार करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या छोट्याशा भाड्याच्या दुकानात ग्राहकांची सतत वर्दळ असते. काही लहान मुले चॉकलेट घेण्यासाठी येतात तर मोठी मंडळी रोजच्या वापराच्या वस्तू विकत घेतात आणि काही वयस्कर लोकं ‘सींग की कंगी’ म्हणजेच म्हशीच्या शिंगापासून बनवलेली बारीक दातांचा कंगवा घेण्यासाठी येतात.
६० वर्षीय इस्लाम हे सराय तरीनमधील शेवटच्या कारागिरांपैकी एक आहेत, जे अजूनही शिंगापासून कंगवे बनवण्यात कुशल आहेत. वयाच्या सत्तरीत असलेले त्यांचे खूप वर्षांपासूनचे सहकारी मकसूद खान हे या वस्तूच्या काही उरलेल्या पुरवठादारांपैकी एक आहेत.
“या कलेचे जे कारागीर गेले ते जाताना ही कला सुद्धा त्यांच्यासोबत घेऊनच गेले. ती आता पुन्हा मिळणं अवघड आहे,” इस्लाम हुक्क्याचा झुरका घेत म्हणतात. “तुम्ही संपूर्ण सराय तरीनभर भटका, पण जर तुम्हाला शिंगाच्या कंगव्यांचा कारागीर हवा असेल, तर सगळे तुम्हाला माझ्याकडेच पाठवतील.”
२०२२ मध्ये या कलेला भौगोलिक मानांकन (GI) चा टॅग मिळाला, जो उत्पादनाच्या मूळ स्थानावर आधारित ओळख दर्शवणाऱ्या बौद्धिक संपदेच्या संरक्षणाचा एक प्रकार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या 'वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट' या हस्तकला योजनेत हाडे व शिंगांच्या कलाकृतींना संभलसाठी खास ओळख म्हणून प्रोत्साहन दिलं जातं.
“जिसके सर पर बाल उसकी कंगी (ज्याच्या डोक्यावर केस त्याचा कंगवा),” इस्लाम एक प्रसिद्ध वाक्य विनोदाने सांगतात. म्हणजेच ज्याच्या डोक्यावर केस त्याला कंगवा लागतो. “एक काळ होता, जेव्हा प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत कंगवे मिळायचे.”
त्यांचं दुकान जे त्यांचं वर्कशॉपही आहे ते त्यांनी महिन्याला दोन हजार रुपये भाड्याने घेतलेलं आहे. दुकानदार आणि कारागीर या दोन्ही भूमिकांमध्ये स्वतःला सांभाळण्याची त्यांची सतत कसरत चालू असते. समोर पसरलेली त्यांची कामाची साधनं: अनेक प्रकारच्या आऱ्या (कटावण्या), छिनी, छिल्ली (घासकण), वाळूचे पेपर आणि अड्डा (काठावर कंग्या ठेवण्यासाठी लाकडी फळकुट).




























