सेबंती रॉय नाच शिकायची. पहिल्यांदा तिच्या शिक्षिकेलाच जाणवलं की या मुलीचे खांदे एकसारखे दिसत नाहीयेत. ही तर नाचात गुणी-उभरती मुलगी, पण तिच्या हालचालींतली चपळता मंदावतेय. सेबंती तेव्हा तेरा वर्षांची होती. तिच्या शरीरातला हा बदल हेरला गेला, नि लवकरच डॉक्टरांनी हा स्कोलियोसिस असल्याचं निदान केलं. "मला हे कळलं नि पहिल्याछूट मी रोमांचितच झालेले, कारण तेव्हा मी ॠतिक रोशनची फॅन होते, हो, तोच डान्सर हिरो ॠतिक – त्याला होता तोच आजार मलाही झालाय. थ्रिलींग! " हे आठवून सेबंतीला आता हसू येतं.
वयाच्या २१व्या वर्षी अभिनेता ॠतिक रोशनला स्कोलियोसिसचं निदान झालेलं, त्यानंतर त्याचं डान्स करियर खतमच झाल्यात जमा होतं. कारण स्कोलियोसिसनं पाठीतील मणक्याला बाक येतो. तसं आपणा सर्वांच्याच मणक्यांना नैसर्गिक बाक असतोच, पण ज्या बालकांना हा विकार होतो, त्यांचा मणका किंवा मणक्याचा एखादा भाग इंग्रजी 'एस' किंवा 'सी' या आकारासारखा अनैसर्गिकपणे घुमावदार होतो.
सेबंती तेव्हा रहायला होती, साउथ २४ परगणा जिल्ह्यात. तिथे उपचारांची सोय नव्हती. म्हणून तिला कोलकत्यात आणलं गेलं, - किशोरावस्थेतील इडियोपेथिक स्कोलियोसिस (आयएएस) वरील शस्त्रक्रियेसाठी. तिचा कणा सशक्त रहावा, यासाठी शस्त्रक्रिया केली गेली. तिच्या मणक्याला दोन रॉड व १४ स्क्रू बसवले गेले.
"आता मला त्या रॉड न् स्क्रूंची जाणीवही होत नाही," त्या शस्त्रक्रियेनंतर बारा वर्षांनी सेबंती हे म्हणतेय, "आयुष्य अगदी नॉर्मल आहे. मी स्कोलियोसिस सोबत जगायला शिकले, नि जगणं सहजसुंदर झालं," बोलतांना तिच्या चेहऱ्यावरील स्मितरेषा खुलून दिसतात. आम्ही तिच्या आजोळच्या घरावरील गच्चीत बसलोय. डायमंड हार्बर शहरांत. पश्चिम बंगालचा हा तो इलाखा जिथून हुगळी नदी वाहते नि बंगालच्या उपसागरात विलिन होते.
या विकारामुळं सेबंतीला काही काळ बेढबपणा जाणवला, थोडं असहज केलं, पण तितकंच. लवकर निदान झाल्यानं ती सुदैवी ठरली. पण हा विकार उद्भवलेले लाखो जीव नशीबाला कोसतात. कारण स्कोलियोसिस हा अत्यंत वेदनादायक व खचवून टाकणारा आजार. या विकारापाठोपाठ ह्रदयरोग नि श्वासोच्छवास घ्यायला तकलीफ सारख्या व्याधींचीही शक्यता असते. विशेषत: ग्रामीण भागातील रूग्णांसाठी योग्य प्राथमिक रोगनिदान हेच एक मोठं आव्हान आहे.


















