"रोज रोज खायला काय आहे आमच्याकडे, या शिळ्या भाताच्या पेजेशिवाय (पांता भात)?" भाताला चव यावी म्हणून सुक्या लाल मिरच्या आणि त्यावर मीठ टाकत बाटो मल्लिक म्हणतात.
संध्याकाळची वेळ झालीये अन् बाटो आणि तिचे पती योगेन मल्लिक नुकतेच जवळच्या जंगलातून परतले आहेत. या आदिवासी पाड्यावरील इतर कुटुंबांपैकी हे कुटुंब आपला संपूर्ण दिवस आठवडे बाजारात विकण्यासाठी सागाची (साळ) पानं गोळा करण्यात घालवतं.
त्यांचं घर पश्चिम बंगालच्या झारग्राम जिल्ह्यातल्या बेनाशुली गावात. जिथं प्रामुख्याने साबर आदिवासींचा (पश्चिम बंगालमध्ये संवर्गीकृत 'सवार') समुदाय रहातो. हा आदिवासी समुदाय देशातील अत्यंत गरीब आणि वंचित नागरिकांपैकी एक आहे, जो भूक आणि कुपोषणाच्या छायेत आपलं आयुष्य कंठत आहे.
मी साबर लोकांच्या जगण्याचं दस्तऐवजीकरण करण्यासाठी अनेक वर्षांपासून या भागाला भेट देत आहे. ब्रिटिशांनी त्यांना 'गुन्हेगारी जमात' म्हणून घोषित केले होते, त्यानंतर १९५२ मध्ये त्यांना यातून विमुक्त करण्यात आले. त्यांच्यापैकी फार कमी लोकांकडे स्वतःची जमीन आहे आणि उदरनिर्वाहासाठी ते पूर्णपणे जंगलावर अवलंबून आहेत. वाचा : 'हंगर इन द बेली ऑफ द बीस्ट'
मी जेव्हा जेव्हा इथे परत येतो, तेव्हा मला हेच जाणवते की त्यांची परिस्थिती वर्षानुवर्षे आणि अनेक दशकांपासून बदललेली नाही. भूक भागवण्यासाठी अन्न मिळेनासं झालं की, स्थानिक मोहाच्या (महुआ) फुलांपासून बनवलेली दारू अन्नाला पर्याय म्हणून वापरली जाते, कारण त्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते. खरं तर, जवळपास प्रत्येक घरात वाढत्या दारूच्या व्यसनामुळे (स्थानिक दारू गल्लोगल्ली गाळली जाते), कुपोषण आणि अॅनिमिया (रक्तक्षय) हा जणू पाचवीलाच पुजला आहे.























