“म्या हाथंच जलमलोय गाऽ. ह्या राना-डोंगरात भटकत जिनगी गेली माही” येमा सोंगाळ हसतमुखानं त्यांची वस्ती दाखवतात. सह्याद्रीच्या गर्द हिरवाईत वसलेलं लाल कौलारू घरांचं हे गाव – निसर्ग नि मानवी जीवनाच्या सरमिसळीनं समृद्ध वाटतं. येमा सोंगळांना कल्पनाही नाही, त्यांच्या या परिसराची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेलीय, जैविक विविधतेनं समृद्ध अशी जगातील केवळ आठ ठिकाणं, त्यातला एक भाग पश्चिम घाटातील हा परिसर.
दुर्देवानं, येत्या काळात या परिसरातील २८० हेक्टर भूभाग पाण्याखाली जाऊ शकतो.
काळभोंडे हे सोंगाळांचं गाव. लाडेवाडी हा त्यांचा पाडा. पाड्यातील आपल्या कौलारू घराच्या अंगणातून ते दूर दिशेला बोट दाखवत म्हणतात, “त्योऽ डोंगुर दिसतुय ना गा, त्या पल्याड माह्यं श्यात.” या पाड्यापासून शेतावर जायला त्यांना तासभर पाटपीट करावी लागते. सोंगळांची बायको सुलीबाई, या आदिवासी जोडप्यानं आता सत्तरी गाठलीय. डोंगरापलीकडंचं छोटंसं शेतच यांना आधार वाटतं. ते तिथं वरई पिकवतात. “कार्तिकाच्या पावसानं पाच-सा पोती वरी गावतीय, उरला मोसम पडीतच ऱ्हातीय जिमीन,” सोंगाळ सांगतात. ते कोरडवाहू शेतकरी. वर्षातील एकाच हंगामात पाच-सहा क्विंटल वरई पिकते. या भरड धान्याच्या जोरावर त्यांचा १५ माणसांचा कुटुंबकबिला वर्ष रेटून नेतो. येमा-सुली, या जोडप्याची चार मुलं, तीन सुना व सहा नातवं, दरवर्षी मान्सूनच्या मनमर्जीनं गुजराण करतात. हे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे, तितकंच जंगलावरही.
“ह्ये जंगल हाय म्हून आम्हीबी हाय” सोंगाळ पुस्ती जोडतात, “जंगल मायंदाळ देतं - रानफळं, कंदमुळं म्हणू नका का रानभाज्या, आन् सर्दीताप व्हवदे का गुडघेदुखी, औषदी वनस्पतीबी गावतीयच की रानांत.” या परिसरात येमा सोंगाळांसारखी ९७ कुटुंबं जंगलांच्या सहाऱ्यानं जगतात. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वर्षानुवर्षे ‘म ठाकरां’ची ही वस्ती आहे. ही एक अनुसुचित आदिवासी जमात. ‘आम्ही कंदीच हिर्व्या झाडावर घाव घालत न्हाय. सरपणासाठी वाळल्या काटक्या येचंतो. घर आपलं कच्च्या मातीच्या ईटंवर हुभं, आन् आढ्याला लाकूड लागतं, त्ये यकांद्या वरसाला रानांतून घितलं गा का वरीस न वरीस पघायलाच नकु” सोंगाळ जंगलातील लाकडाशी त्यांचं नातं सांगतात.




















