नोंद : भारतातील ग्रामीण आरोग्याच्या स्थितीवरील मालिकेतील हा पहिला लेख आहे.
मलाजपूर या छोट्याशा शेतीप्रधान गावात, सवी धुर्वे (१७) आणि आशा कोरकू (१६) (नावे बदलली आहेत) या दोन किशोरवयीन मुलींमध्ये एक अनोखी मैत्री जुळली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इथल्याच जत्रेत त्यांची भेट झाली, जिथं त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना 'बाहेरची बाधा' उतरवण्यासाठी म्हणून आणलं होतं. या दोन्ही मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना खात्री आहे की त्यांच्यावर एखाद्या सैतानाचं सावट आहे.
"मला झटके यायचे आणि मी खोलीत इकडे तिकडे फेकली जायचे. वेदनेनं माझं शरीर वेडंवाकडं व्हायचं आणि जेव्हा मी शुद्धीवर यायचे, तेव्हा मला काहीच आठवायचं नाही," सवी सांगते. सवीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच आशा मध्येच म्हणते, "माझंही तसंच व्हायचं. मला पण आठवायचं नाही."
त्या एकमेकींकडे बघून हसतात – कधी विनाकारण, तर कधी कशावरही. किशोरवयीन जिवलग मैत्रिणींमध्ये जी एक सळसळती ऊर्जा असते, ती त्यांच्यात स्पष्ट दिसते. गेल्या महिनाभरापासून या दोघीही मंदिरच्या परिसरातच राहतायत. या काळात त्या एकमेकींच्या इतक्या जवळ आल्या आहेत की त्यांना वेगळं करणं कठीण आहे – आरतीला खांद्याला खांदा लावून बसणं असो, गाभाऱ्यात देवाला प्रदक्षिणा घालताना कानात विनोद सांगणं असो किंवा एकमेकींची वाक्यं पूर्ण करत बोलणं असो.
सवी आशेने आशाकडे पाहते आणि म्हणते, "तिला पटकन बाधा होते..."
"– मी ते शब्दात नाही सांगू शकत –"
"– तुम्हाला आरतीच्या वेळी दिसेलच –"
"– पण आता मला बरं वाटतंय –" आशा म्हणते, महिनाभर मंदिरात राहिल्यामुळे आपल्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं ती सुचवते.
मलाजपूरचा हा 'भूत मेळा' ही शतकानुशतके चालत आलेली एक वार्षिक सणच आहे. माघ शुद्ध पौर्णिमेला (जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान) सुरू होणारा हा मेळा वसंत पंचमीला संपतो. बेतुल जिल्ह्यातल्या चिचोली ब्लॉकमध्ये भरणारा हा मेळा गुरुसाहब बाबा किंवा देवजी महाराज यांच्या समाधीभोवती केंद्रित आहे. असं मानण्याची प्रथा आहे की, त्यांच्याकडे 'बाधा' झालेल्या लोकांना बरे करण्याची दैवी शक्ती होती. इथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की, दुष्ट आत्मे मंदिर परिसरातील वडाच्या झाडांच्या पानांमध्ये अडकतात. मध्य प्रदेशसह शेजारच्या छत्तीसगड आणि राजस्थानमधूनही हजारो भाविक आणि श्रद्धाळू या मेळ्याला हजेरी लावतात.












