एकेदिवशी गजानंद सहारियाच्या झोपडीपाशी काहीजण आले आणि त्याला ‘जमीन विका’ असं सांगून गेले. त्यावेळी गजानंदला शोध लागला- आपण ‘जमीनदार’ असल्याचा! “त्यांनी मला सांगितलं, १० बिघा [सुमारे सहा एकर] जमीन माझ्या नावावर आहे. मी [सुमारे दोन किलोमीटर अंतरावर] जमीन पाहण्यासाठी गेलो होतो. त्या पडीक जमिनीवर काहीही कसंही अंदाधुंद वाढलेलं होतं. आजवर आम्ही किंवा इतर कुणी तिथे कशाचीच लागवड केली नव्हती,” कलोनी गावातल्या मुंडेयार आदिवासी वस्तीत राहणारा गजानंद सहारिया सांगत असतो.
नव्यानेच लागलेल्या शोधामुळे आश्चर्यचकित झालेला हा ३५ वर्षीय सहारिया आदिवासी. आता पैसेही मिळणार; म्हणून सुखावलेला! साधारण २०० रुपये मजुरीवर महिन्यातले चार-पाच दिवस त्याला कसंबसं काम मिळतं. कामासाठी त्याला स्थलांतरही करावं लागतं. गजानंदचं १५ जणांचं एकत्र कुटुंब आहे. शाहबादच्या जंगलातून लाकडाव्यतिरिक्त जी वनोपज (एनटीएफपी) मिळते त्यावर यांचं घर चालतं. “मोह, तेंदू, जळण, आचार, आवळा असं आम्ही गोळा करतो आणि त्यावर भागवतो,” तो सांगतो. यातून महिन्याला काही हजार रुपये मिळतात.
हे कुटुंब ज्या जंगलावर सर्वस्वी अवलंबून आहे; ते आहे शाहबाद तलेती जंगल. पूर्व राजस्थानमधे तब्बल १७९ चौरस किलोमीटरवर पसरलेलं हे घनदाट जंगल दुर्मिळ वनस्पती, वृक्ष आणि वन्यजीवांनी समृद्ध आहे. अलीकडेच २०२२ मध्ये वन विभागाने त्याचं पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करत त्याला ‘संवर्धित अभयारण्य’ घोषित केलंय. भुत्या म्हणून ओळखला जाणारा कराया [स्टर्कुलिया युरेन्स] वृक्ष शाहबादसारख्या मोजक्या जंगलांमध्येच आढळतो. शेकडो औषधी वनस्पतीसुद्धा या जंगलात सापडतात.
हे जंगल म्हणजे अनुसूची १ मधल्या अनेक पशुपक्ष्यांचं निवासस्थान आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत या पशुपक्ष्यांना शिकारीपासून संरक्षण देण्यात आलंय. बंगाल कोल्हा, सोनेरी कोल्हा, भारतीय लांडगा, बिबट्या (पँथेरा पार्डस्), भारतीय राखाडी मुंगूस, पट्टेदार तरस (हायना हायना), चांदी अस्वल, उदमांजर, झिपरं अस्वल, लाल डोक्याचं गिधाड, भारतीय मोर आणि इतरही बऱ्याच पशुपक्ष्यांचा या यादीत समावेश आहे.
कुनो राष्ट्रीय उद्यानापासून जेमतेम एका तासाच्या अंतरावर हे जंगल आहे. मध्य प्रदेशातलं गांधी सागर हे चित्त्यांचं आणखी एक निवासस्थान. गांधी सागरला कुनोशी जोडणाऱ्या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये हे जंगल येतं. चित्यांच्या मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढतेय. त्या पार्श्वभूमीवर, या कॉरिडॉरचा उपयोग होईल अशी आशा अधिकाऱ्यांना वाटतेय.
जून महिन्यातला हा अख्खा आठवडा संततधार आहे. जंगलातली तळी नि मोठमोठे नदीनालेओढे तुडुंब भरून वाहातायत. कुंडा खो धबधब्याच्या दिशेने ते वाहत चाललेत. गढूळ पाण्याचा हा नदीप्रवाह धबधब्याच्या रूपात १०० फूट खोल दरीत कोसळतो. खालून कुनो नदी वाहतेय. पावसाची संततधार असूनही गावकरी वनोपज शोधायला निघालेले दिसतात.



















