२४ वर्षांच्या वीणा राणीला सप्टेंबर २०२५ च्या महिन्याभरात क्वचितच झोप लागली असेल. पंजाबच्या फाझिल्का जिल्ह्यातील वल्ले शाह उत्तर गावातील आपल्या कुटुंबाची शेती गिळंकृत करणाऱ्या आणि मागच्या महिन्यात घरात शिरलेल्या पुराच्या आठवणी डोळ्यांसमोर आणत ती तासनतास खाटेवर डोळे मिटून पडून असायची.
"आता मला आधीपेक्षा बरं वाटतंय," रात्रीची औषधं घेत असताना वीणा सांगते. मुख्य गावाबाहेर शेतामध्ये असलेलं त्यांचं तीन खोल्यांचं पक्कं घर सतलज नदीच्या खाडीजवळ आहे. घरापासून ती खाडी शांत दिसत असली तरी ती आठ फूट खोल आहे आणि त्या खाडीच्या पलीकडे त्यांची चार एकर शेती आहे.
"तिने तर हसणं सोडूनच दिलं होतं," वीणाची २६ वर्षांची बहीण कैलास राणी सांगते. तिचे वडील ५२ वर्षांचे जरनेल सिंग आठवतात की, तिला जबरदस्तीने उठवून बसवण्याचा प्रयत्न केला तरी ती रडायची.
वीणा सांगते, "पूर्ण पिकाचं नुकसान झाल्यामुळे आता पैसे कुठून येणार, पाणी किती काळ साचून राहील आणि पुढच्या हंगामात आम्ही गव्हाची पेरणी तरी करू शकू का? हेच विचार सतत डोक्यात असायचे." जेव्हा जवळच्या व्यक्ती तिला तिच्या काळजीचं कारण विचारायच्या, तेव्हा तिला ते नीट सांगताही येत नसे. "माझ्या डोक्यावर काहीतरी जड ओझं ठेवल्यासारखं मला वाटायचं."
सततच्या पुरामूळे गावातील प्रत्येकजण दुःखी आणि चिंताक्रांत होता. वीणाला वाटलं की हे दिवसही निघून जातील.
पण तसं झालं नाही. ती जसजशी अधिक अबोल आणि उदास होऊ लागली, तसं घरच्यांनी तिला ५० किलोमीटर दूर अबोहर इथल्या मानसोपचारतज्ज्ञांकडे नेले. तिथे तिला 'नैराश्य' (डिप्रेशन) असल्याचे निदान झाले आणि पाच महिन्यांसाठी औषधे सुरू करण्यात आली.
दवाखान्यातही ती हुंदके देऊन रडत होती. (दिमाग दी नसा कमझोर हो गई ने) "माझ्या मेंदूच्या नसा कमकुवत झाल्या आहेत", ती सांगते.
















