२०२३ च्या ऑगस्टमध्ये आफिया खातूनची गाणी एकदम व्हायरल झाली.
आणि हे अगदी अचानक झालं बरं. एक्स म्हणजेच पूर्वाश्रमीच्या ट्विटरवरच्या एकाने तिचा एक व्हिडिओ शेअर केला. आसाममधले मुस्लिम बोलतात त्या बंगाली भाषेतही गाणी आफिया खातून गातानाचा तो व्हिडिओ होता. आणि तिच्याबरोबर होती तिची दोन मुलं. बंगाली लोकगीतांमध्ये वापरला जाणारा दोतारा आणि ढोल वाजवणारी.
त्या गाण्याचे शब्द होतेः
जोनोतारेइ शोबाइ मिले थानाइ थानाइ एजार दिले,
हिमांतो सोरकार बुले दोइयोशी रेह.
जोनोतारे झालाहिया, हिमांतोर एइ जोंत्रोना, जोनोताइ शोइते आर पारे ना.
आर कोतो जलाइबे बोलो ना, आर कोतो जलाइबे बोलो ना
मराठीमध्येः
किती तरी पोलिस ठाण्यात लोकांनी तक्रार केलीये
हिमांतो सरकार अपराधी आहे
लोकांचा मांडलाय छळ. बघा हिमांतो कसा छळतोय.
आता मात्र असह्य होऊ लागलंय
अजून किती छळ कराल, सांगा, अजून किती छळ कराल, सांगा
हे गाणं का लिहिलं गेलं? बालविवाहांना आळा घालण्याच्या उद्देशाने हिमांता बिस्वा सर्मा सरकारने सुरू केलेल्या धरपकडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मुस्लिम पुरुषांना तुरुंगात टाकलं जात होतं. त्या वेळी हे गाणं तयार झालं.
“माझ्या समाजाला जे काही सहन करावं लागलं, त्या त्रासातून हे गाणं तयार झालं,” आफिया बी सांगते. “कुणी तरी आवाज उठवायलाच पाहिजे होता.” फेब्रुवारी २०२३ पासून आसाममध्ये बालविवाहांच्या विरोधात कारवाया सुरू झाल्या आणि त्यामध्ये ३,९०० हून जास्त लोकांना अटक करण्यात आली. त्यानंतरही शेकडो लोकांना तुरुंगात टाकण्यात आलंय आणि यातले बहुतेक बंगाली मुस्लिम आहेत.










