"माझ्या वडिलांनी मला शिकू दिलं असतं तर मी पोलिस अधिकारी झाले असते," चिकट भांड्यांनी भरलेल्या आणि साबणाने फेसाळलेल्या सिंककडे वळण्यापूर्वी त्या हताशपणे म्हणतात. सकाळचे ९ वाजलेत आणि त्या सोसायट्यांमधील घरांकडे धावत असतील. ज्या वसाहतीत त्या घरकामं करतात, तिथं त्या अनिता ताई म्हणून ओळखल्या जातात. घराच्या वाटेकडे निघण्याआधी त्यांना आणखी पाच घरांमध्ये जायचं आहे. त्या काम करत असलेल्या उच्चभ्रू उपनगरापासून म्हणजे वायव्य हैद्राबादमधील नल्लगंडलापासून शेजारच्या संगारेड्डी जिल्ह्यातील पटाणचेरूत त्यांच्या घरी परतण्यासाठी १० किलोमीटरचं अंतर आहे.
अनिता राठोड, वयवर्षे २५, आधीच त्या चार मुलांची आई आहेत, त्या तेलंगणातील अनुसूचित जमातीतील लंबाडी समुदायाच्या आहेत. स्थलांतरित कामगारांना आकर्षित करण्यात देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये स्थान मिळवणाऱ्या हैदराबादमध्ये – तिथल्या सोसायटीजमध्ये काम करणाऱ्या अनेक स्थलांतरित कामगारांपैकी त्या एक आहेत. जास्तीच्या कामामुळे त्यांना त्यांच्या मुलांना चल्लागिद्दा तांडा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या आई-वडिलांकडे सोडावं लागलं आहे आणि त्यांच्या स्वतःच्या स्वप्नांनाही..
रोज सकाळी पहाटे ४ वाजता स्वयंपाक करत, कपडे धुवत, घर स्वच्छ करत त्यांचा दिवस सुरु होतो. सकाळी ५.३० वाजता त्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील लिंगमपल्लीपाशी बस पकडतात. आणि तिथून त्या रिक्षाला २० रु. देऊन ६ वाजेपर्यंत नल्लगंडलातील सोसायटीमध्ये पोहचतात. २०२३ मध्ये सुरू झालेल्या तेलंगणा सरकारच्या महालक्ष्मी योजनेमुळे महिलांना राज्य परिवहन बसमधून मोफत प्रवास करता येतो. त्यामुळे अनिताना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रवासात करताना थोडी फार बचत व्हायला मदत होते. तरीसुद्धा प्रवासावर त्यांचा दररोज ८० रुपये खर्च होतो.














