त्याचा दिवस पहाटे ५.३० वाजता सुरू होतो. “सकाळी ८.३० वाजता आम्ही स्वयंपाक, बाकीची तयारी, नाश्ता करून तयार असतो आणि कामावर जातो. कितीतरी वेळा आम्ही भात, पातळ भाजी आणि डाळ खातो,” तो म्हणतो. कामाच्या ठिकाणी दुपारचं जेवण म्हणून तेच डब्ब्यात बांधून नेतो. दिवसभर ढोर काम केल्यानंतर रात्री जर आम्हाला चांगलं जेवण मिळालं नाही त्रास होतो. रात्रीच्या जेवणात आम्ही रोटी आणि चिकन किंवा मासे आणि भाताला प्राधान्य देतो.” आम्ही आळीपाळीने स्वयंपाक करतो आणि किराणा सामान विकत आणतो. नवीनला रोटी छान बनवता येते आणि त्याला त्याचं कौतुकही वाटतं. तो त्याच्या साथीदारासाठी काही मिनिटातच सहा ते सात रोट्या बनू शकतो, तो सांगतो.
खूप काम करून थकल्यानंतर दिवसाच्या शेवटी सहा ते आठ लोक १० x १० फुटांच्या एका लहानशा खोलीत येतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर जाण्या झोपी जातात. “आम्ही बांधकामाच्या ठिकाणी मुंडा (टणक, सरळ लाकूड), सारिया (लोखंडी सळया), पत्रा, ताडपत्री वापरून आमची छोटी खोली बनवतो,” नवीनने त्याच्या फोनमध्ये काही फोटो दाखवले.
“शेठ किंवा बिल्डर ठराविक वस्तू आणि पैसे देतात. आमच्या खोलीमध्ये डास, माशा आणि उंदीर नेहमी शिरतात. कितीतरी वेळा पैसे, मोबाइल चोरीला गेलेत,” तो पुढे म्हणतो. बिल्डर वीज आणि पाणी पुरवतो पण कामगारांना कायम लोडशेडिंगला तोंड द्यावं लागतं. “तंबुमध्ये राहणाऱ्या ५० ते ६० कामगारांसाठी आमच्याकडे एक-दोनच बाथरुम आहेत. त्यामुळे आम्ही कामावर जाण्यासाठी तयार होतो तेव्हा सकाळी खूप गोंधळ उडतो.”
कामाच्या ठिकाणी कोणतेच कायदे आमच्या सुरक्षेची आणि आरोग्याची खात्री देत नाही. आमच्याकडे कोणतीच संरक्षणात्मक उपकरणं नसतात, नवीन सांगतो. काही वर्षांपूर्वी एका मजूराच्या अंगावर जड झाकण पडलं. त्याचा जागीच मृत्यू झाला, तेव्हा कंत्राटदार आणि मालकाने स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांच्या बळाचा वापर करून ते प्रकरण दाबलं. “माणसं इतकी निर्दयी कशी असू शकतात?” नवीनला हा प्रसंग आठवला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव होते.
कोविड-१९ महामारीमध्ये लॉकडाउनच्या वेळी पहिले दोन महिने या तरुणासाठी जास्तच कठीण होते. “ते दिवस भयानक होते. आम्हाला बिल्डरकडून थोडेफार पैसे मिळाले. अन्नपाण्याची तर भ्रांत होती. आम्ही जर काही वस्तू घ्यायला बाहेर पडलो तर, पोलिस आम्हाला लाढ्या घेऊन हाकलून लावायचे. तब्बल दोन महिन्यानंतर आमच्या गावातल्या ५० लोकांनी एकत्र येऊन १.४ लाख रुपये जमा करू एक ट्रक बूक केला आणि आम्ही सगळे गावी परतलो.”