“जंगलात जाताना जर तुम्ही डोक्यावर घुंघू घेतलं असेल, तर तुमच्यावर कधीच वीज पडणार नाही,” झारखंडच्या गुमला जिल्ह्यातल्या कुजाम गावच्या सुकनी असुर सांगत असतात. घुंघू म्हणजे मालू वनस्पतीच्या (Phaneravahlii) पानांपासून बनवलेली एक प्रकारची छत्री. मालू नावाची वेल या भागात मुबलक प्रमाणात आढळते.
घुंघू वर्षभर वापरता येतं. उन्हाळ्यात ‘लू’ म्हणजे उष्ण वाऱ्यांपासून, हिवाळ्यातल्या गारठ्यापासून आणि पावसाच्या तडाख्यापासून घुंघू संरक्षण करतं. मुख्य म्हणजे, घुमटाच्या आकाराचं घुंघू डोक्यावर ठेवल्यावर हात पूर्णपणे मोकळे राहतात आणि काम करणं शक्य होतं.
सुकनी लहानपणीच घुंघू बनवायला शिकल्या त्या त्यांच्या आईकडून. “पूर्वी सगळेच जंगलातून मालू वेलीची पानं गोळा करायचे आणि घुंघू बनवायचे,” छपन्न पावसाळे बघितलेल्या सुकनी सांगत असतात, “पण घुंघू आता कुणी वापरत नाही आणि फारसं कुणी बनवतही नाही.”
सुकनी या असुर समुदायाच्या. झारखंड राज्यात हा समुदाय आदिम जमातीत सूचीबद्ध आहे. त्यांच्या कुटुंबाची दहा एकर शेती आहे. या शेतजमिनीवर बहुतेकदा ते भात, मका आणि गुंडली (लहानसं नाचणीसारखं भरड धान्य) पिकवतात.
सुकनी यांचं कुटुंब तीन खोल्यांच्या मातीच्या घरात रहातं. कुटुंबात १२ जण आहेत. घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर बिशुनपुर वनक्षेत्र सुरू होतं. कुजामचे गावकरी जळण, फळं, गुरांसाठीची कुरणं आणि इतर अनेक गोष्टींसाठी याच जंगलावर अवलंबून आहेत. सुकनी म्हणतात, “हमरा रोजी रोटी सब यहीं है [आमची रोजीरोटी, आमचं पोटपाणी सगळं काही इथे या जंगलातच तर आहे.”
























