मुंबईच्या कानाकोपऱ्यात मेट्रो आणि द्रुतगती मार्ग पोचत असताना दामू नगरच्या रहिवाश्यांचा रोजचा छोटासा प्रवाससुद्धा चांगलाच खडतर आहे. आणि हा प्रवास केल्याशिवाय गत्यंतर नाही. रोज उघड्यावर शौचाला जायची ही कसरत. इथले लोक सांगतात त्याप्रमाणे आधी एक फूटभर उंचीची भिंत ओलांडायची, त्यानंतर कचऱ्याच्या ढिगातून वाट काढत चालत जायचं. हवेत सगळीकडे मैल्याची दुर्गंधी भरून राहिलेली असते. हे थोडंफार गवत असलेलं उघडं माळ आहे. थोडी झाडं आहेत. जराशी सावली आणि अगदीच तोकडा आडोसा देणारी.
कसला काय आडोसा? “आडोसा, खाजगीपणा असलं काहीही इथे नसतं,” ५१ वर्षीय मीरा येडे सांगतात. त्या गेली अनेक वर्षं दामूनगरमध्ये राहतायत. “कुणाच्या पावलांचा आवाज आला की आम्ही उभं राहतो.” या माळाचे आपोआपच दोन भाग पडलेत. डावीकडची बाजू पुरुषांची आणि उजवीकडची बायांची. पण मीराताई सांगतात, “मध्ये अगदीच थोडं अंतर आहे. काही मीटर पण नसेल. कोण मोजायला चाललंय?” या दोन भागांमध्ये भिंत, किंवा कसलाही दुसरा अडथळा नाही.
दामू नगरचे हे रहिवासी म्हणजे स्थलांतरितांची दुसरी पिढी. उत्तर मुंबई मतदारसंघाच्या निवडणुकींपेक्षा त्यांच्यासाठी हा मुद्दा जास्त जिव्हाळ्याचा आहे. भारताच्या १८ व्या लोकसभा निवडणुकीत संसदेत जाणाऱ्या ५४३ खासदारांचं भवितव्य ठरवणाऱ्या लोकशाहीच्या ‘उत्सवा’पेक्षा त्यांना हा प्रश्न जास्त भेडसावतोय. मीराताईंचा मुलगा, प्रकाशभाऊ म्हणतो तसं “देशात मात्र सगळंच चांगलं चालल्याच्या बाता केल्या जात आहेत.” आपल्या घराच्या उंबऱ्यावर उभं राहून प्रकाशभाऊ आमच्याशी बोलत होता. छताच्या पत्र्यामुळे घरातलं तापमान बाहेरपेक्षा थोडं जास्तच होतं.
“या इथे खऱ्या मुद्द्यांवर कुणालाही बोलायचं नाहीये,” ३० वर्षीय प्रकाश भाऊ म्हणतो. दामू नगरमध्ये सुमारे ११,००० लोक राहतात. संडास, पाणी आणि वीज नसल्याने त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो ते तो सांगतो. दामू नगर या वस्तीची नोंद जनगणनेमध्ये भीमनगर अशी करण्यात आली आहे. कच्च्या भिंती, ताडपत्री आणि पत्रा अशी इथली घरं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या एका टेकडीवर वसलेली आहेत. वरच्या घरांपर्यंत पोचायचं तर टेकडी चढून मधल्या अरुंद गल्ल्यांमधून, गटाराच्या पाण्यातून वाट काढत जावं लागतं.





















