नागालॅण्डच्या सीमेला लागून असलेल्या आसाममधील जोरहाट जिल्ह्यात पोहुकोतिया श्याम हे छोटंसं गाव वसलंय. अधिकृत नोंदींमध्ये या गावाचं नाव आहे टिपोमिया हबी गाव. ताई तुरुंग समाजाचं गाव म्हणून याची ओळख. वळणावळणाचे मातीचे रस्ते, दाट वनराई अन् त्यामध्ये विखुरलेली पारंपरिक सांग घरं (खांबांवर उभारलेली घरे), या घरांभोवती छोटीशी बाग अन् बांबूचं कुंपण. एखादं चित्र रेखाटल्यासारखं या गावाचं रुप आहे. याच गावात ७७ वर्षीय शेतकरी अनंत तुरुंग राहतात, ज्यांनी आपली ताई तुरुंग ही मातृभाषा जपण्यासाठी अनेक दशकं काम केलंय. अन् आता ते ही भाषा पुढील पिढीपर्यंत पोचवण्यासाठी शब्दकोश तयार करतायत. खरं तर हा ताई तुरुंग भाषेचा खजिनाच आहे.
अनंत तुरुंग म्हणतात की, “भाषा ही पाण्यासारखी, वाहत्या नदीसारखी असते, ती कधीच एकसारखी राहत नाही, पण ती अशी अचानक नष्ट व्हायला नको.” याच विचारानं प्रेरित होऊन या अल्पभूधारक शेतकऱ्यानं आपली मातृभाषा जतन करण्याचा संकल्प केला. अन् गेल्या पाच दशकांपासून ते यासाठी अथक प्रयत्न करतायत. तुरुंग जमातीचं मूळ शोधण्यापासून ते शब्द संकलन करणं, तसेच शब्दांची व्युत्पत्ती, व्याकरण, स्थलांतर अन् सांस्कृतिक बदलांमुळे भाषेचं बदललेलं स्वरुप यावर त्यांनी संशोधन आणि अभ्यास केला आहे. या भाषेचा उगम, इतिहास पुढील पिढीपर्यंत पोचवण्यासाठी पुस्तके, मासिके आणि वर्तमानपत्रांमधन ते लेखन करतात. मातृभाषा जपण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड या सर्व गोष्टींमधून लक्षात येते.
भाषा संवर्धनासाठी लागणारा सर्व खर्च ते स्वतःच्या खिशातून करतायत, अन् हा खर्च भागतो तो त्यांच्या पाच बिघे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून. गावात स्थानिक पातळीवर चालणाऱ्या एका शाळेत त्यांनी चाळीस वर्षांहून अधिक काळ शिक्षक आणि प्रशासक म्हणून काम केलं. ही शाळा सामाजिक पुढाकारातून सुरू असल्यानं त्यांना त्यातून कधी उत्पन्न मिळालं नाही. त्यांच्या निवृत्तीच्या काही काळ आधी या शाळेला सरकारी अनुदान मिळायला सुरुवात झाली आणि त्यांना लिपिक म्हणून हक्काचा पगार मिळाला पण तोही केवळ तीन महिन्यांसाठी. त्यानंतर ते शाळेतून निवृत्त झाले. पण या सगळ्याचा त्यांचा भाषा संवर्धनाच्या कामात अडथळा आला नाही.










