“तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं होतं- मी मेलोय. इथे… हो, या इथेच अक्षरक्ष: बर्फात गाडला गेलो होतो मी.”
१७,४८० फूट उंचीवरच्या तांगलांग ला पर्वतीय खिंडीवरची ती घनघोर बर्फवृष्टी सरापला आठवते. “मला वाचवायला लगेच धावून आले इतर सगळे मजूर!” तो सांगतो. लष्कराचं रुग्णालय जवळ होतं म्हणून बरं; त्याच्यावर वेळेत उपचार होऊ शकले.
अनिश्चित हवामान नि त्यापायी आ वासणाऱ्या धोक्यांना सामोरं जाणं... लडाखमधल्या उंच पर्वतीय प्रदेशात रस्ते बांधणीसाठी राबणाऱ्या सरापसारख्या मजुरांसाठी हे नेहमीचंच! तापमान इथे अनेकदा गोठणबिंदूच्या खाली जातं; पण गेल्या दोन दशकात आणखीही काही बदल जाणवतायत. लेह जिल्ह्यातल्या गिया गावचा सराप सांगतो, “हवामान बदलामुळे हिमवर्षाव उशिरा होतो आणि बर्फवृष्टीही प्रचंड होते. आता धोका वाढलाय; तो त्यामुळे!”
तांगलांग ला या प्रदेशातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच खिंड. या खिंडीतला रस्ता शाबूत ठेवण्याचं काम करतात सराप आणि त्याच्या टीममधले मजूर. अघोरी थंडी आणि टोकाच्या हवामानामुळे ऑक्टोबर ते मे या दरम्यान खिंडीतला हा रस्ता बंद असतो. हा रस्ता खुला झाला की लेह ते मनाली या महामार्गावरची वाहतूक सुरळीत होते. तब्बल ४२८ किलोमीटरच्या या प्रवासात चार खिंडी ओलांडाव्या लागतात. तांगलांग ला हे त्यातलं सर्वोच्च ठिकाण. इथे थांबावं नि अवघं दृश्य नजरेत साठवून घ्यावं इतका हा परिसर विलोभनीय! पण इथल्या वाऱ्यात नि गारठ्यात १०-१५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभं राहून आजूबाजूचा परिसर न्याहाळणं म्हणजे दिव्यच!


















