हजारोंच्या संख्येने इथं भटके धनगर मेंढपाळ जमलेले आहेत आणि ओघ अजूनही सुरूच आहे. महाराष्ट्रातल्या धनगर आणि कर्नाटकमधील कुरुबा या दोन मुख्य जमातींसह इतरही अनेक लोकसमूह इथे एकत्र येतात. वर्षभर भटकण्याच्या आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या त्यांच्या वाटा जरी वेगवेगळ्या असल्या तरी दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हे सर्व लोक ‘पिवळ्या रंगाच्या ढगांच्या’ मागोमाग चालत चालत पट्टण कोडोली गावात पोहोचतात.
हातकणंगले तालुक्यातल्या या साध्या-सरळ खेड्यात, पट्टण कोडोलीत, त्या सगळ्यांचा एकच असणाऱ्या देवाचा म्हणजेच विठ्ठल बिरदेव महाराजांचा जयंती सोहळा साजरा करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपलीये आणि अशावेळी कोल्हापूरवर एक वेगळाच पाऊस बरसतोय तो म्हणजे उत्सवाचा आणि आनंदाचा. भक्तांचे मेळे आणि त्यांच्या वाजत गाजत येणारे जत्थे यांचा पूर सबंध जिल्हाभर एकवटलाय. हा पूर काही कुणाचं घर, आयुष्य किंवा शेतं वाहून नेत नाही, उलट त्याला भक्तिभावाची आणि आनंदाच्या जल्लोषाची जोडच देतो.
देशभरातून आलेल्या धनगर-कुरुबा समजाचे अनेक उपसमुदाय, पोटजाती, जे विठ्ठल बिरदेवांना शेतकरी व धनगरांचा रक्षणकर्ता मानतात, ते सारे महाराष्ट्रात या यात्रेसाठी आवर्जून एकत्र येतात. “इट्टल बिरदेव हा आमच्यासाटी लई म्होट्टा अर्थ घिउन येतुया. त्योच आमचा दैवी रकशक हाय, आमच्या आत्म्याला आधार द्येनारा, अन् मार्गदर्शक. त्योच अखंड श्रद्धेचा, आशेचा आणि भगतीचा पर्तिक हाय,” त्यातल्याच एका यात्रेकरूनी आम्हाला सांगितलं.





























