हरियाणाच्या गावखेड्यांत चारचौघांच्या घोळक्यात मधोमध हमखास दिसेल : हुक्का. "हुक्का के सहारे पंचायत चलती रेयां करतीं!" रोहतास सांगतात, गावांतील चौपालांभवती खेळण्यातच याचं बालपण गेलंय. त्यामुळं बड्याबुजुर्गांचे निर्णय कसे हुक्क्याच्या धुरासह गावात विरघळतात ते यानं पाहिलंय.
"दोन-चार घुटक्यांत चहापाण्यासारखा हुक्का खतम होत नाही, - चिलमित तंबाखूचा बार लावून हुक्का शिलगावला की तो तासंतास चालतो. पाच-दहा माणसं कोंडाळं करून कश घेत, कितीही वेळ काढतील, खेड्यात टाईमपास करायला हुक्का बेस्ट!" रोहतास सांगतात.
चाळीस वर्षीय रोहतासच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटते, जेव्हा ते सांगतात, "आता तुम्हाला घराघरात एक चौपाल न् एक हुक्का दिसेल." मग ते स्वत:ही हुक्क्याचा एक झुरका घेतात. कारागिरी शिकता शिकता बारा वर्षांपूर्वी या झुरक्यांची लतही त्यांना लागली. आपल्या कामाच्या व्यग्रतेतून डोकं काढून ते 'पारी'शी बोलायला वेळ देताहेत.
हुक्का भारतीयांच्या फुफ्फुसांत शिरला कधी? असं मानतात, हुक्क्याचा आविष्कार सोळाव्या शतकात मुघल राजवटीत झाला. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, हुक्क्याचा प्रवर्तक आहे - तिसरा मुघल सम्राट - अकबर. या शेहनशहानं सर्वप्रथम लांबूळक्या नळीतनं कश घेतला, नि तेव्हापासून तंबाखूसेवनाची ही तऱ्हा लोकप्रिय झाली. काही ईतिहासकार त्यापूर्वीही धुम्रपानाचा हा प्रकार मध्य व दक्षिण आशियात प्रचलित असल्याचं नोंदवतात.
काही का असेना, तंबाखूसेवनाचा खचितच हा लोभसवाणा प्रकार. "हुक्का आपल्या संस्कृतीचा भागच आहे," धरमबीर सांगतात, "कितीका गुतड्याचा बखेडा सोडवायला पंचायत बसूदे, हुक्क्याच्या साथीनं एक घाव दोन तुकडे...मोठमोठे निर्णय चुटकीसरशी होतात."




















