“हरियाणा, पंजाबपासून जैसलमेरपर्यंतचा सर्व प्रदेश आम्ही पायी पालथा घातलाय,” भादर भोपा सांगतात. वायव्य राजस्थानमधल्या आपल्या घराशेजारच्या एका झाडाखाली हे ६५ वर्षीय गृहस्थ बसलेत. “अशी एकही जागा नाही जी आम्ही पाहिली नाही,” ते पुढे म्हणतात.
गुजरात आणि राजस्थानमध्ये राहणाऱ्या भटक्या भोपा समाजातील भादर यांनी आपलं बहुतांश आयुष्य देश फिरण्यात आणि बांबू व नारळाच्या करवंटीपासून बनवलेलं ‘रावणहत्था’ हे तंतुवाद्य वाजवण्यात घालवलंय. “आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचो, तिथे राहायचो, सादरीकरण करायचो आणि पुढच्या प्रवासाला निघायचो,” ते 'पारी'ला सांगतात.
अखेर, ११ वर्षांपूर्वी भादर आणि त्यांच्या पाच मुलांनी चुरू जिल्ह्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. “त्या भटक्या आयुष्याला कंटाळून मी एका गावात स्थायिक झालो,” धीरवास बारा गावचे रहिवासी असलेले भादर म्हणतात. त्यांनी हे गाव निवडलं कारण ते बऱ्याचदा या गावात राहून गेले होते आणि तिथल्या लोकांशी आता त्यांची ओळखही झाली होती. माझ्या आजोबांना आठवतं की भोपा कुटुंब संगीतकार म्हणून आमच्या गावातून प्रवास करायचं.
या कुटुंबाची नाळ नायक समुदायाशी (अनुसूचित जातीमध्ये नोंदवलेले) जोडली गेलीये, तरीही राजस्थानमध्ये भोपा समाजाला इतर मागास वर्गीय मानला जातो. नायक समाजही त्यांना आपल्या समुदायाचा भाग म्हणून स्वीकारण्यास संकोच करतो.
सुरुवातीला धीरवास बारा इथे जमीन विकत घेणं परवडण्याजोगं नव्हतं, त्यामुळे सुरुवातीची दोन वर्षं ते गावाच्या अगदी बाहेर राहिले. “नंतर आम्ही सरपंचांशी बोललो आणि त्यांनी आम्हाला ही जमीन दिली,” असं भादर भोपा यांचा मुलगा भंवर लाल सांगतो. “ही जमीन एक बिघा आणि तीन बिस्वा म्हणजे जवळपास पाउण एकर इतकी आहे.”
धीरवास बारा गावच्या बस स्थानकापासून शेतांकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने दक्षिणेकडे चालत गेल्यावर दोन स्मशानभूमी दिसतात. पहिली जागा 'स्वामी' समाज (ज्यांची वर्गवारी 'इतर मागास वर्ग'मध्ये केली जाते) वापरतो आणि काहीच अंतरावर असलेली दुसरी जागा अनुसूचित जातीच्या लोकांसाठी आहे. एक रस्ता या स्मशानभूमींना पलीकडे असलेल्या दलित वस्तीपासून वेगळे करतो. आणि त्याच्याही पलीकडे ‘हडवार’ आहे जिथं मृत जनावरांची विल्हेवाट लावली जाते.
या ‘हडवार’च्या एका भागात, तात्पुरत्या स्वरुपाच्या घरांमध्ये, भादर भोपा यांचं सुमारे ५० जणांचं मोठं कुटुंब राहातं. त्यांचं सध्याचं जगणं हे पूर्वीच्या भटक्या जीवनापेक्षा खूप वेगळं आणि स्थिर आहे.










