कोणालाही त्याचं नाव माहीत नव्हतं. तो मोहल्ल्यातला केवळ एक वेडा म्हातारा होता. दिवसा हसणारा, रात्री रडणारा, आणि सिंधी किंवा उर्दूमध्ये स्वतःशीच बोलणारा — म्हणून वेडा. बहुतांश वेळा त्याची बडबड म्हणजे निरर्थक बोलणंच वाटायचं. त्यातील बहुतांश बोलणं म्हणजे केवळ बकबकच होती - गालिबच्या गजलांव्यतिरिक्त केली गेलेली.
हे कुठल्या प्रकारचं उजाडपण आहे?
हा असला ओसाडपणा पाहिला की घराची आठवण येते.
त्याला असं कविता म्हणताना ऐकलं की क्षणभर शहाणपण आणि वेडेपणा यांच्यातली सीमारेषा पुसट होताना दिसायची.
दशकानुदशकं त्याचं घर असलेली जागा आता मोहल्ल्याच्या एका टोकाला आहे. ओस पडलेल्या, जीर्ण घराचा उंचवटा — जिथे तो दोन भटक्या कुत्र्यांसोबत जागता पहारा देत बसून असायचा.
तो इथे कधी येऊन राहायला लागला, हे कुणालाच माहीत नव्हतं. त्याचं वयही कुणाला ठाऊक नव्हतं. पण सुरकुत्यांनी भरलेला त्याचा चेहरा — जणू चुरगळलेल्या भारताच्या नकाशासारखा — म्हातारपणाची साक्ष देत होता.
काही अफवाही होत्या. काहीजण म्हणायचे, फाळणीच्या वेळी तो आपल्या कुटुंबापासून तुटला. काही म्हणायचे, फाळणीनंतरच्या दंगलीत त्याच्या कुटुंबाची हत्या केली गेली. तर काहींच्या मते तो एकेकाळी व्यापारी होता — पत्नी आणि दोन मुलांना देशाबाहेर हाकलल्यावर त्याने संपत्तीही गमावली आणि शहाणपणही.
तो मुस्लिम होता का — दाढी आणि डोक्याभोवती गुंडाळलेल्या मळक्या हिरव्या कापडामुळे? की तो दरदिवशी संध्याकाळी आपल्या उसवलेल्या, फाटलेल्या गादीजवळच्या छोट्याशा कोनाड्यात दिवा लावणारा हिंदू होता — जो प्रार्थनेसारखं काहीतरी पुटपुटायचा? काहीही असो, लोकांनी त्याच्यावर दया केली आणि आपलं उरलेलं अन्न त्याला दिलं. रेशन मिळणं कठीण असतानाही, आपल्याकडचं थोडंसं अन्न का होईना त्यांनी त्याला दिलं.
मात्र शेवटच्या काही दिवसांत त्याने अन्नाचा एक कणही घेतला नव्हता. पूर्वीसारखा रस्त्यांवर फिरतही नव्हता. जणू तो तिथेच जखडून गेला होता. त्याने दिवा लावला नाही की त्याला गालिबही आठवला नाही. कुणालाही जवळ येऊ न देता कोपऱ्यातल्या जागी लहान लहान होत आक्रसत गेला — अगदी मृत्यूच्या शेवटच्या घटकेपर्यंत.
काहींनी सांगितलं, त्याने तक्रार केली होती की आपण स्वतः काटेरी तार गिळली आहे आणि ती घशात अडकली आहे. दुसरा कुणीतरी म्हणाला, कोविडमुळे तो गेला असणार.


