श्रीनाथ सिंग खरवार बोलता बोलता हरखून जातात. बालपणात दोस्तांबरोबर जंगलात घालवलेला काळ त्यांच्या नजरेसमोर तरळतो. सुनसान रानांत ही पोरंसोरं तेव्हा तेंदूपत्ता (डायोस्पायरोस मेलानोक्सिलॉन) गोळा करायला जात. जंगलातली शांतता या मुलांच्या हसण्याबागडण्यानं फुलून जायची. “पाणी न् भाकऱ्यांची शिदोरी आम्ही संगट न्ह्यायचो. आमच्या गप्पाटप्पांनी जंगलात जीव आल्यागत वाटायचं.” श्रीनाथना तो भारलेला काळ आठवतो.
४७ वर्षीय श्रीनाथ जवळपास पंचवीस वर्षांपूर्वींच्या आठवणींना उजाळा देताहेत. आम्ही दोघं 'अधौरा' टेकड्यांच्या दिशेनं जाणाऱ्या बसमध्ये बसलोय. ही बस पहाटेच बिहारच्या दक्षिणेकडील 'कैमूर' जिल्ह्यातील 'भभुआ' या शहरातून निघालीय. गाडीतले बहुतेक प्रवासी आदिवासी. ही मंडळी कामधंद्यासाठी बाहेरगावी राहणारी, या बसमधून ही माणसं आपापल्या गावी 'परती'चा प्रवास करताहेत.
श्रीनाथही, त्यांचं मूळगाव छनपुराला निघालेत. रोजगारासाठी श्रीनाथ झारखंडमधील पात्रातू मधील एका सिमेंट कारखान्यात काम करतात; कामानिमित्त हा माणूस आता वेगळ्या राज्यात राहतोय. तसं म्हंटलं तर झारखंड पूर्वी बिहारचाच भाग होता. पण नंतर ते एक स्वतंत्र राज्य झालं. श्रीनाथनं यापूर्वी दिल्ली व महाराष्ट्र यासारख्या दूरच्या राज्यांतील कारखान्यांतही काम केलंय, पण आता ते आपल्या जवळच्याच राज्यात काम करताहेत. “दिल्ली किंवा महाराष्ट्राच्या तुलनेत, पात्रातू माझ्या मुळ गावापासून जवळ, मनाला येईल तेव्हा घरी येता येतं,” श्रीनाथ सांगतात.
सूर्य आता डोक्यावर तळपू लागलाय. नि बस अधौराकडं जाणारा घाटरस्ता धीम्यागतीनं चढतेय. वाटेत घाटातली झाडी नजरेला खुणावते. 'साल' वृक्षांच्या या जंगलात आता पानगळ सुरू झालीय. झाडांची पिवळी पानं धरणीवर पडलेली दिसतात नि ते वृक्ष आपल्या फांद्यांसह एखाद्या सांगाड्यागत तग धरून असल्यागत वाटतात. बसनं घाट चढायला सुरुवात केली नि काही मिनिटांतच मोबाईलचं नेटवर्क गायब झालं; आता या भागात केवळ भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चं नेटवर्कच तेवढं आहे.


















