राजकुमार हा त्याच्या पालकांचा तिसरा मुलगा होता. तो त्या दिवशी शेळ्या चरायला घेऊन गेला होता. १३ वर्षांचा राजकुमार बऱ्याचदा घरापासून साधारण एक किलोमीटरवर असलेल्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाजवळ शेळ्या चरायला घेऊन जायचा.
परंतु १४ मे २०२२ ला तो शेळ्या घेऊन गेला असता त्याच्यावर वाघानं हल्ला केला (पँथेरा वाघीण). तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ते पाहिलं आणि धावत जाऊन गावातल्या लोकांना सांगितलं. बेशुद्ध झालेल्या राजकुमारला २५ किलोमीरवर असलेल्या बगाहा उपविभागीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयातल्या डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं.
“वाघानं त्याचा उजवा हात, पाठ आणि पोट खाल्लं होतं,” चंदादेवी म्हणाली.
वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाकडून प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते. ही नुकसानभरपाई अभयारण्याजवळच्या भागात राहणाऱ्या आणि प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू किंवा जखमी झालेल्या व्यक्तींना दिली जाते. अभयारण्यातल्या प्राण्यांच्या अधिवासात राहणाऱ्या लोकांना भरपाई दिली जात नाही. या भागात माणसांच्या वावरण्यावर बंदी आहे. वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाचा अंतर्गत भाग ५९८.४५ चौरस किलोमीटरचा आहे आणि बफर क्षेत्र ३००.९३ चौरस किलोमीटरचं आहे.
“व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत भागाची सीमा स्पष्ट करणाऱ्या कोणत्याही ठळक खुणा नाहीत. त्यामुळे अंतर्गत भाग कुठून सुरू होतो हे लोकांना माहितीच नाही,” असं जुनैदनं सांगितलं. जुनैद गेली तीस वर्ष वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पातल्या वाघांचा मागोवा घेऊन त्याची नोंद करण्याचं काम करतो. लोक चुकून प्रकल्पाच्या अंतर्गत भागात येतात असं तो म्हणाला.
“१३ वर्षांच्या राजकुमारला वाघानं अभयारण्याच्या अंतर्गत भागात ओढून नेलं आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी बदलल्या,” असं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. वन विभागाचे अधिकारी म्हणाले की, त्याचा मृतदेह अभयारण्याच्या अंतर्गत भागात मिळाला. “आम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागू नये म्हणून माझ्या मुलाची अभयारण्याच्या अंतर्गत भागातली छायाचित्रं आणि ध्वनीचित्रफिती समाज माध्यमांवर पसरवली जात आहेत,” असं लक्ष्मणनं सांगितलं.