लग्नानंतर रीना परतेती यांनी जेव्हा पहिल्यांदा लोनादेई गावातल्या आपल्या सासरी पाऊल ठेवलं, तेव्हा त्या थक्कच झाल्या.
"घरातील लहान मुलंही माझ्या मातृभाषेत (गोंडी) अस्खलितपणे बोलू शकत होती," त्या आपली एक आठवण सांगतात. दुसरीकडे, ३४ वर्षीय आदिवासी शेतकरी रीनालागोंड समुदायाची ही भाषा फारशी समजत नव्हती, कारण "माझ्या (मोया) गावात कोणीच गोंडी बोलत नसे."
लोनादेई गावातील सुमारे ८० टक्के लोकसंख्या गोंड आदिवासींची आहे. त्या सांगतात, “गोंड समुदायाचे नसलेले लोकही इथे ही भाषा उत्तम रितीने बोलतात.”
रीनाचे पुतणे आणि भाचे तिची थट्टा करत म्हणायचे, "मामी को गोंडी बोलते नहीं आती, चाची को गोंडी बोलते नहीं आती (काकूला/मामीला गोंडी बोलता येत नाही)!" त्या प्रसंगाची आठवण काढत त्या हसतात आणि पुढे म्हणतात, "सुरुवातीला जरी माझी जीभ खूप अडखळली, तरी हळूहळू मी त्यांच्याशी माझ्या मातृभाषेत बोलायला लागले."
गोंडी ही एक द्राविडी भाषा असून एकेकाळी ती केवळ मध्य प्रदेशातच नव्हे, तर मध्य भारताच्या इतर भागांतही मोठ्या प्रमाणावर बोलली जात असे. आज युनेस्कोने (UNESCO) या भाषेचा समावेश 'धोक्यात असलेल्या' भाषांच्या यादीत केला आहे. गोंड समुदाय हा राज्यातील सर्वात मोठ्या आदिवासी समुदायांपैकी एक असूनही त्यांची भाषा धोक्यात आली आहे.
















