पण गोंडीची अशी परिस्थिती नेहमीच नव्हती.
गोंडी भाषा अभ्यासक मोतीराम कांगलींच्या भाषा संशोधन व प्रकाशन केंद्राच्या वेबसाइटवर मांडलेल्या मतानुसार गोंडी ही एकेकाळच्या गोंडवाना साम्राज्याची राज्यभाषा होती आणि तिला स्वतःची लिपी, व्याकरण, भाषाव्युत्पत्ती तर होतीच, पण गोंडी भाषेत साहित्य पण लिहिले जात होते, जे आजही उपलब्ध आहे.
कधीकाळी गोंडी मध्यप्रदेशच्या बहुतांश भागात बोलली जायची. “आम्ही गौरा देवीचे वंशज आहोत, म्हणूनच आमचं नाव गोंड पडलं.” छिंदवाडामधील गोंड सामाजिक कार्यकर्ते रामनाथ उइके सांगतात. पण आताच्या काळात गोंड आदिवासींच्या वारसा आणि इतिहासाचा सन्मान म्हणून रेल्वे स्थानकाला गोंड राणी कमलापती हिचं नाव देण्याशिवाय काही नाही.
गोंड भाषा हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता गोंडी केवळ घरातच बोलली जाते, बाहेर गोंड समाज हिंदी बोलणं पसंत करतो. त्यातही वृद्ध माणसं गोंडी बोलतात, तरुण मात्र गोंडी शिकण्यात आणि बोलण्यात फारसं स्वारस्य दाखवत नाहीत. यामागे गोंडी न बोलणाऱ्या लोकांचा गैरसमज व त्यामुळे अवहेलना होईल ही भीती आहे.
लोनादेईमध्ये राहणाऱ्या प्रार्थनाचे शेतकरी वडील मंतराम घरी मुलांशी गोंडीमध्ये बोलतात, पण बाहेर मात्र एकमेकांशी सुद्धा हिंदीमधे बोलतात. “गोंडी न समजणारे लोक आमची खिल्ली उडवतात कधी कधी भाषा न समजल्यामुळे गैरसमज देखील होतात.” मंतराम सांगतात.
“हल्लीच मी माझ्या मुलगा पृथ्वीराजला भेटायला त्याच्या रहिवासी शाळेत गेलो होतो. मी त्याच्याशी गोंडीत बोलायला सुरुवात केली, तर बाकीचे विद्यार्थी आणि शिक्षक हसायला लागले. मला खूप लाजिरवाणं झालं. माझा मुलगा तर म्हणाला तुम्ही शाळेत येऊ नका. घरी वाट्टेल तेवढी गोंडी बोला.” मंतराम सांगतो.
गोंड समाजाचे लोक जास्त असून सुद्धा लोनादेईमध्ये गोंडी भाषा अस्तित्वासाठी झगडत आहे. रामनाथ यांच्या म्हणण्यानुसार लोनादेईमधील परिस्थिती ही पूर्ण जिल्ह्याच्या समस्येचा एक भाग आहे. “छिंदवाडामध्ये गोंड समाजाला खालच्या जातीचे समजले जाते. त्यामुळेच लोक गोंडी बोलायला कचरतात कारण त्यांना बाकीचे लोक आपल्याला भाषेवरून कनिष्ठ समजतील ही भीती वाटते. मग फक्त एकमेकांतच गोंडी बोलतात.”
रामनाथच्या म्हणण्यानुसार शालेय अभ्यासक्रमात देखील गोंडी भाषेला सापत्न वागणूक दिली जाते. त्यामुळे मुले गोंडीपासून अजून दूर जात आहे. ते अतारवाडा विभागातील त्यांच्या गावातील शाळेमध्ये गोंड मुलांना कसे भाषेवरून खिजवले जायचे हे चांगले लक्षात आहे.
उच्चवर्णीय शिक्षक गोंड मुलांना वेगळे बसवायचे. “बरं यावरच ते थांबायचे नाहीत. मला आठवतंय मी दहावीत असताना एकदा शर्मा सरांनी दोन गोंड मुलांना खूप मारलं होतं. मारता मारता ते म्हणत होते की मी कितीही शिकवलं तरीही तुम्ही गोंड शिकू शकणार नाही. त्यानंतर ती मुले परत शाळेत आलीच नाहीत.”