घराच्या जराशा सावलीत खुर्ची टाकून गोमा रामा हजारे नुसते बसून राहिले होते. गावातल्या ओसाड रस्त्यावर नजर लावून. वेळ काढत.

अधून मधून त्यांची विचारपूस करायला येणाऱ्यांशी काही बोलायचं, नाही तर परत एकटेच. आठवडाभरापूर्वी त्यांच्या पत्नीचा आजारपणात मृत्यू झाला. त्यानंतर कुणी ना कुणी येऊन त्यांची हालहवाल विचारून जातं.

एप्रिल निम्मा सरलाय. तिन्ही सांजा व्हायची वेळ आहे. ५ वाजलेत. हवेत प्रचंड गरमा आहे. गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातल्या पळसगावमध्ये आम्ही आहोत. बांबू आणि सागाच्या गर्द वनात लपलेलं हे छोटं गाव. गावात सन्नाटा पसरलाय. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काही दिवसांत मतदान होणारे. सध्याचे विद्यमान खासदार भाजपाचे अशोक नेते पुन्हा एकदा निवडणुकीला उभे आहेत. पण गावात कसलाही उत्साह नाही. असली तर चिंताच आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून गोमादादांच्या हाताला काम नाहीये. खरं तर या काळात साठी पार केलेले दादा आणि त्यांच्यासारखे अनेक जण जंगलात मोहाची फुलं, तेंदूपत्ता गोळा करत असतात. बांबू कापणं किंवा शेतातली इतर कामंही सुरू असतात.

“पण या वर्षी नाहीच,” गोमा दादा म्हणतात. “जीव कोण धोक्यात घालेल?”

“सगळे घरात बसून आहेत,” ते सांगतात. दिवसभर अंगाची लाही लाही होते. बाहेर पडणं शक्य नाही. गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक गावांना अशा संचारबंदीची खरं तर सवय आहे. गेल्या चार दशकांपासून इथे सशस्त्र माओवादी आणि सुरक्षा दल आणि पोलिसांमधला संघर्ष सुरू आहे. पण या वेळी पाहुणे भलतेच कुणी आहेत. आणि त्यांच्यामुळे जीव आणि जीविका दोन्हीला अगदी थेट धोका निर्माण झालाय.

पळसगावच्या आसपास २३ जंगली हत्तींचा एक कळप वस्तीला आलाय. त्यात जास्त करून हत्तिणी आणि त्यांची पिल्लं आहेत.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

महाराष्ट्रातल्या पळसगावजवळ जंगली हत्तींचा कळप वनात वस्तीला आल्यामुले गोमा रामा हजारे (डावीकडे) यांना आपल्या कामावर पाणी सोडावं लागलं आहे. २०२४ च्या लोकसभा मतदानाची तारीख जवळ आली असली तरी या गावाला मात्र कुणाला निवडून द्यायचं यापेक्षा त्या जंगली हत्तींची चिंता जास्त सतावत आहे. हत्तींच्या भीतीने उन्हाळ्यातलं महुआ आणि तेंदू गोळा करण्याचं काम बंद झालंय आणि प्रत्येक कुटुंबाला २५,००० रुपयांचा घाटा झाला आहे

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

डावीकडेः गोमा दादा पळसगावच्या ओसाड रस्त्यावरून चालत निघाले आहेत. उजवीकडेः एप्रिलच्या मध्यावर सूर्य आग ओकत होता आणि गावात पूर्ण सन्नाटा पसरला होता. काही घरांबाहेर मोहाची फुलं सुकत घातली होती. जवळपासच्या शेतशिवारातल्या झाडांची ही फुलं. एरवी या वेळी अख्ख्या गावात मोहाची फुलं आणि तेंदूपत्ता पहायला मिळतो. या वर्षी मात्र नाही

गेल्या महिन्याभरापासून छत्तीसगडच्या उत्तरेतून आलेला हा हत्तींचा कळप इथल्या झुडपांवर, जंगलातल्या बांबूवर आणि भातपिकावर यथेच्छ ताव मारतोय. गावकरी आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा जीव मात्र टांगणीला लागलाय. सुमारे चार वर्षांपूर्वी हा कळप महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामध्ये अवतरला आहे. त्यांचा नैसर्गिक अधिवास आणि संचाराच्या मार्गांचं जंगलतोडीमुळे मोठं नुकसान झाल्याने त्यांनी स्थलांतर केलं आहे.

महाराष्ट्रातले गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर आणि छत्तीसगडचा बस्तर जिल्हा हा सगळा प्रांत पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. इथे मुक्तपणे फिरणारा हा कळप एखाद्या मोठ्या कळपापासून वेगळा झालाय. महाराष्ट्राच्या वन्यवैभवामध्ये त्यांनी भरच घातलीये खरं तर.

गडचिरोलीच्या दक्षिणेकडच्या भागात वनखात्याने दळणवळणासाठी काही हत्तींनी प्रशिक्षित केलं आहे. मात्र पूर्वेकडच्या या भागात मात्र जंगली हत्तींचं आगमन तब्बल दीडशे किंवा जास्त वर्षांनी झालं असावं. सह्याद्रीच्या पश्चिम घाटांमध्ये मात्र त्यांचं वास्तव्य नवं नाही.

वनखात्याने माना आणि गोंड आदिवासींचं बाहुल्य असणाऱ्या या गावातल्या लोकांना हे हत्ती दुसरीकडे निघून जात नाहीत तोवर घरीच रहा असा इशारा दिला आहे. आणि त्यामुळेच १४०० लोकसंख्येच्या या गावातले आणि जवळच्या विहीरगावसारख्या गावांमधल्या छोट्या शेतकऱ्यांना आणि भूमीहीन आदिवासींना वनांमधून होणाऱ्या आपल्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलं आहे.

पिकांचं नुकसान झालं तर वनखात्याकडून त्याची तात्काळ भरपाई होते पण वनोपज गोळा करता आलं नाही म्हणून होणाऱ्या नुकसानीसाठी अशी कसलीही भरपाई मिळत नाही.

“उन्हाळ्यात आमचं घर मोह आणि तेंदूवर चालतं,” गोमा दादा सांगतात.

खात्रीचं उत्पन्न हातचं गेल्यानंतर आता पळसगावच्या गावकरी आता हे जंगली गजराज कधी पुढच्या वाटेला लागतायत आणि त्यांना काम करू देतायत याचीच वाट पाहत बसलेत.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

डावीकडेः हत्ती इथून निघून जाईपर्यंत पळसगावच्या रहिवाशांनी घराबाहेर पडू नये असा इशारा वनखात्याने दिला आहे. उजवीकडेः गेल्या साली फुलचंद वाघेडे यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. हत्तींनी त्यांच्या तीन एकरातलं पीक तुडवून टाकलं होतं

“गेली तीन वर्षं उन्हाळ्यात हा कळप छत्तीसगडमध्ये गेला होता. पण यंदा नाही,” गडचिरोलीचे मुख्य वन संरक्षक, एस. रमेशकुमार सांगतात. “कदाचित कळपातल्या एखाद्या हत्तिणीला नुकतंच पिलू झालं असावं.”

या कळपात काही छोटी पिलं आहेत. हत्ती मातृसत्ताक आहेत.

गेल्या वर्षी (२०२३) याच हत्तींनी शेजारच्याच गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या नांगलडोह या ११ उंबऱ्याच्या पाड्याची पूर्ण धूळधाण केली होती. पळसगावहून १०० किलोमीटरवर असलेला हा पाडा अगदी घनदाट जंगलात आहे. हत्तींनी काही दिवस तिथेच मुक्काम केला होता.

“त्या रात्री हत्ती उधळले आणि त्यांच्या हल्ल्यात एकही घर वाचलं नाही,” विजय मडावी सांगतो. तिथले सगळे रहिवासी आता भारनोली गावाजवळची रिकामी जागा ताब्यात घेऊन तिथे वस्ती करून राहिले आहेत. “मध्यरात्रीच त्यांनी हल्ला केला,” तो सांगतो.

त्या रात्री नांगलडोहच्या लोकांची सुटका करून त्यांना भारनोलीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हलवण्यात आलं. २०२३ चा अख्खा उन्हाळा लोकांनी तिथेच काढला. पण सुट्ट्या संपल्यावर शाळा परत सुरू झाल्यावर त्यांनी गावाच्या वेशीबाहेरची थोडी वनजमीन साफ करून घेतली आणि तात्पुरती घरं उभारली. तिथा ना वीज, ना पाणी. काही मैल चालत जाऊन बाया शेतातल्या विहिरीवरून पाणी भरून आणतायत. पण पूर्वी झुडपाचं जंगलं साफ करून तिथे कसत असलेली आपली शेतं मात्र त्यांच्यापाशी आता नाहीत.

“आम्हाला आमचं स्वतःचं घरं कधी मिळायचं?” उषा होली विचारते. पुनर्वसन आणि कायमचं घर हीच इथल्या लोकांची मागणी आहे.

या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हत्तींचा मुक्त संचार सुरू आहे आणि शेतकऱ्यांचं मात्र पिकाचं नुकसान होतंय. या भागात ही समस्या याआधी कधीही आली नव्हती.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

गेल्या उन्हाळ्यात (२०२३) गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या नांगलडोहमध्ये हत्तींनी सगळ्या घरांची धूळधाण केली. त्यानंतर तिथल्या ११ कुटुंबांनी भारनोली गावाबाहेरच्या वनजमिनीवर तात्पुरती घरं उभारली आहेत. राज्य शासनाकडून पुनर्वसन आणि नुकसान भरपाई मिळावी हीच त्यांची अपेक्षा आहे

गडचिरोलीच्या उत्तरेकडे आलेल्या जंगली हत्तींच्या कळपाचा मुकाबला करायला हे काही साधंसुधं काम नाही. रमेशकुमार म्हणतात की भारताच्या उत्तरेकडच्या जंगलांमध्ये हत्तींची संख्या प्रचंड आहे, त्या मानाने दक्षिणेकडे ही विरळ होत जाते. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पिकांची नासधूस. जंगली हत्ती संध्याकाळच्या वेळेत बाहेर पडतात आणि उभी पिकं तुडवतात. खातीलच असं काही नाही.

वनखात्याचा तात्काळ प्रतिसाद आणि तपास गट आहे तसंच ड्रोन आणि उष्णतेचा माग काढणाऱ्या कॅमेऱ्यांचा वापर करून या कळपावर अहोरात्र लक्ष ठेवणारे गटसुद्धा आहेत. हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवत ते गावकऱ्यांना वेळीच सावध करत असतात जेणेकरून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये.

संध्याकाळ झाली की नीतीन माने आपल्या पाच सोबत्यांसोबत रात्रीच्या गस्तीसाठी हल्ला गँगमध्ये सामील होतो. त्याची पळसगावात सात एकर शेती आहे. वनरक्षक योगेश पांडारामच्या नेतृत्वाखाली ही गँग जंगलात हत्तींचा माग काढते. जंगली हत्ती हाताळण्यात एकदम तरबेज असलेल्या या हल्ला गँग पश्चिम बंगालमधून इथे बोलावण्यात आल्या आहेत. ते स्थानिक वन कर्मचारी आणि गावातल्या तरुणांना कळपाचा मुकाबला कसा करायचा याचं प्रशिक्षण देतात. त्यांच्याकडे दोन ड्रोन आहेत आणि ते हवेतून हत्तींवर नजर ठेवून असतात, नीतीन सांगतो. त्यांचं ठिकाण सापडलं की त्यांना वेढा घालत त्यांच्यासोबत चालत राहतात.

“हत्तींना हाकलायला गावातल्या काही मुलांना हल्ला गँगमध्ये घेतलंय,” पळसगावच्या सरपंच जयश्री दढमल सांगतात. त्या माना आदिवासी आहेत. “पण मलाच डोकेदुखी होऊन बसलीये. हत्तींची तक्रार घेऊन लोक माझ्याकडे येऊन राहिलेत आणि त्यांचा राग माझ्यावर काढून राहिलेत,” त्या म्हणतात. “आता हत्ती आले त्याला मी काय करणार?”

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

डावीकडेः पळसगावचे तरुण शेतकरी नीतीन माने हत्तींना हाकलण्यासाठी वनखात्याने बोलावलेल्या हल्ला गँगचे सदस्य आहेत. ड्रोनच्या मदतीने ते हत्तींवर लक्ष ठेवतात आणि गावात शिरण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यांना हाकलून लावतात. उजवीकडेः रात्रीच्या गस्तीसाठी सज्ज असलेले वनखात्याचे अधिकारी आणि हल्ला गँगचे सदस्य

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

पळसगावच्या सरपंच जयश्री दढमळ आपल्या शेतातून मोहफुलं गोळा करून आणतात पण त्यांना जंगलात जाणं शक्य नाही. जंगली हत्तींमुळे तिथली फुलं गोळाच करता येत नाहीयेत

आता अशी कोंडी झालीये की पळसगावमध्ये जरी सगळं पूर्वपदावर आलं तरी आसपासच्या ज्या गावांमध्ये हत्ती जाणार तिथे हाच सगळा प्रकार सुरू होणार. वनखात्याचे अधिकारी सरळ म्हणतात की आता या गावांनी हत्तींसोबत राहण्याची सवय करून घ्यायला हवी आणि नव्याने काही गोष्टी शिकून घ्यायला हव्यात.

जयश्रीताईंना लोकांचं दुःख कळतं कारण या वर्षी त्यांना स्वतःला देखील जंगलातून मोहाची फुलं गोळा करता आली नाहीयेत. “आता हत्तींमुळे तेंदूपत्ता सुद्धा गोळा करता येणार नाही कदाचित,” त्या म्हणतात. दोन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक कुटुंबाचं किमान २५,००० रुपयांचं नुकसान होणार असल्याचं त्या सांगतात.

“पहिलेच महागाई डोक्यावर आहे, आता हत्ती आले. का करावं आम्ही?” गोमा दादा विचारतात.

आणि याला साधं सोपं उत्तर नाही. असले तर प्रश्नच आहेत.

आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न संसदेत कोण जाणार हा नसून, जंगलातून कोण निघून जाणार हा आहे.

(अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान झालं आणि एकूण ७१.८८ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे).

Jaideep Hardikar

جے دیپ ہرڈیکر ناگپور میں مقیم صحافی اور قلم کار، اور پاری کے کور ٹیم ممبر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز جے دیپ ہرڈیکر
Editor : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے