न्यायाधीशः ... तुम्ही काही काम का केलं नाही, त्याचं उत्तर द्या.
ब्रॉड्स्कीः मी काम केलं. मी कविता रचल्या.

न्यायाधीशः ब्रॉड्स्की, दोन नोकऱ्यांच्या मध्ये फावला वेळ असताना तुम्ही इतर काही काम का केलं नाही याचा खुलासा दिलात तर बरं.
ब्रॉड्स्कीः मी कविता रचल्या. मी कामच केलं.

१९६४ साली झालेल्या दोन दीर्घ सुनावण्यांमध्ये२३ वर्षीय रशियन कवी लोसिफ (जोसेफ) अलेक्सांड्रोविच ब्रॉड्स्की आपल्या देशासाठी आणि आगामी पिढ्यांसाठी आपली कविता किती उपयोगी ठरणार आहे हे ठामपणे मांडत होता. या सुनावण्यांची अगदी तपशीलवार नोंद पत्रकार फ्रीडा व्हिग्डोरोव्हा हिने ठेवली आहे. न्यायाधीशांना त्याचा दावा पटला नाही आणि ब्रॉड्स्कीला पाच वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं. तसंच दुष्टभावनेने सामाजिक परजीवी आयुष्य जगत असल्याच्या आरोपाखाली सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली.

सरत्या वर्षात पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया – पारीने पूर्वीपेक्षा जास्त कविता प्रकाशित केल्या, वेगवेगळ्या गायकांची कला सादर केली, लोकगीतांचा नवा ठेवा पारीकडे आला आणि ओव्यांच्या संग्रहात भर घातली.

तर, कवितेला आम्ही इतकं महत्त्व का देतो? आणि कविता करणं हे खरंच काम असू शकतं का? का, ब्रॉड्स्कीचा छळ करणाऱ्यांच्या मताप्रमाणे कविता करणं म्हणजे सामाजिक परजीवी कृत्य आहे का?

एखाद्या कवीच्या कामाची वैधता, संदर्भ आणि मूल्य काय हा प्रश्न तत्त्वज्ञ आणि राजकारण्यांसाठी फार जुना आहे. अध्यापन विश्वातले आणि त्याबाहेर असणारे अनेक जण जग जाणून घेण्याच्या शास्त्रीय आणि पुराव्यांच्या कसोटीवर कस लागणाऱ्या पद्धतींना कवितेपेक्षा निश्चितच जास्त महत्त्व देतात. आणि म्हणूनच भारताच्या गावपाड्यांवरच्या पत्रकारितेच्या या जगात कविता, गीत-संगीताला दिलेलं विशेष स्थान आमच्यासाठी मोलाचं आहे.

पारीवर हरतऱ्हेच्या सर्जक, कल्पक अभिव्यक्तीसाठी विशेष जागा आहे. का? गोष्ट सांगण्याचे हे नवीन मार्ग तर आहेतच पण या प्रकारच्या लिहिण्यातून वेगळ्या गोष्टीही आपल्यापर्यंत पोचत असतात. गावपाड्यात राहणाऱ्या लोकांच्या जगण्याची नोंद घेतली जात असते. इतिहास किंवा पत्रकारितेच्या कक्षा पार करत स्वतःचा अनुभव आणि समाजाच्या सामूहिक संचिताची, स्मृतीची जोड या कल्पक लिखाणाला असते. आपल्या आताच्या काळात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घडामोडी लोकांच्या जगण्यामध्ये कशा गुंफलेल्या आहेत ते अशा लिखाणातून आपल्यापर्यंत पोचत असतं.

या वर्षी पारीने अनेक भाषांमध्ये कविता प्रकाशित केल्या – पंचमहाली भिली, इंग्रजी, हिंदी आणि बंगाली. व्यापक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमध्ये एक व्यक्ती कुठे आहे हे शोधणाऱ्या या कविता आपल्या आताच्या काळाच्या साक्षीदार आहेत. स्वतःच्या आकलनातून पुढे येणारी द्वंद्वं, ताणेबाणे शोधणारी गावावर फुली मारणारा आदिवासी ही कविता असो किंवा भाषेच्या पुरुषप्रधान रचनेवर आघात करणारी आणि विद्रोहासाठी नवी जमीन तयार करणारी Lives and languages hanging by a thread ही कविता असो. अन्नदाता आणि सरकार बहादुर या कवितेत दमन करणाऱ्या मायबाप सरकारचा खरा चेहरा पहायला मिळतो आणि एक पुस्‍तक आणि तीन शेजारी या कवितेत निर्भयपणे ऐतिहासिक आणि सामूहिक सत्याची पाठराखण केलेली आपण वाचू शकतो.

लिहिणं ही एक राजकीय कृती असते. जात्यावरची ओवी संग्रहातल्या ओव्या ऐकत असताना एक गोष्ट जाणवत राहते. ती म्हणजे ओवी रचत असताना बाया एकमेकींमधला भगिनीभाव जपतात पण एक प्रकारे एकमेकीच्या साथीने विद्रोहही करत असतात. आपल्या जगाचा अर्थ लावणाऱ्या, काळ, संस्कृती आणि भावनांचे अनेकानेक पैलू शब्दात मांडणाऱ्या या रचना आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या तीन हजारांहून जास्त बायांनी गायलेल्या, रचलेल्या एक लाखाहून जास्त ओव्यांचा हा विलक्षण संग्रह आहे. पारीवर यातल्या काही ओव्या या वर्षी प्रकाशित झाल्या.

पारीवरच्या वैविध्यपूर्ण संग्रहामध्ये या वर्षी एका नव्या बहुमाध्यमी संग्रहाची भर पडली. कच्छच्या रणातल्या गाण्यांचा संग्रह – कच्छच्या रणातली गाणी . कच्छ महिला विकास संगठन (केएमव्हीएस) यांच्यासोबत सुरू असलेल्या या प्रकल्पामध्ये प्रेम, आस, लग्न, भक्ती, मायभूमी, लिंगभावाची जाणीव, लोकशाही अधिकार, गमावण्याचं दुःख अशा विविध विषयांवरची गाणी गुंफण करून प्रकाशित केली जातात. ज्या भूमीत ही गाणी जन्मली तिथलं वैविध्य त्या गाण्यांमध्ये न येतं तरच नवल. एकूण ३४१ गाणी यात सादर होतील. गुजरातेतल्या ३०५ गायक-वादक-कलाकारांनी विविध वाद्यांचा, नादांचा वापर करून ही गाणी रेकॉर्ड केली आहेत. आणि या गाण्यांमध्ये प्राण ओतला आहे. मौखिक परंपरेचा उत्तम नमुना असलेली ही गाणी आता पारीवर जतन केली जातील.

पारीवरील या कविता किंवा रचना काय सांगतात? त्या सांगतात की कविता किंवा काव्य हे मूठभर उच्चभ्रूंची किंवा सुशिक्षितांची मक्तेदारी नाही. तसंच केवळ अलंकार, मात्रा आणि यमक म्हणजे कविता नाही. कविता आणि लोकगीतांमध्ये आम्ही कुठलाही भेद करत नाही. कारण हे दोन्ही रचणारे या देशातले सामान्य लोक, गडी-बाया आणि सगळेच या समृद्ध अशा रचनांचे निर्माते आणि वाहक असल्याचा पारीचा ठाम विश्वास आहे. कडूबाई खरात किंवा शाहीर दादू साळवे दलितांची, शोषितांची दुःखं आपल्या शब्दातून मांडतात. समानतेची, बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गात असताना ते सामान्य लोकांच्या राजकारणाचा शब्द आणि आवाज बनतात. शांतीपूरच्या लोंकापाडाचे सुकुमार बिस्वास शहाळी विकून गुजराण करतात. पण त्यांच्या गाण्यांमध्ये असतं गूढवादातली शहाणीव आणि १९७१ च्या बांग्लादेश युद्धानंतर शरणार्थी म्हणून इथल्या जगण्यातून आलेले अनुभव. पश्चिम बंगालच्या पिर्रामधले स्वातंत्र्यसैनिक लोक्खीकांतो महातो वयाच्या ९७ व्या वर्षी गोडसं गाणं गातात. सणवाराला गायल्या जाणाऱ्या या गाण्यांनी स्वातंत्र्यलढ्याला कशी ऊर्जा आणि बळ दिलं ते यातून सहज दिसून येतं.

कविता आणि गाणी केवळ शब्दांत लिहिली जातात का? कोण म्हणतं? पारीवर प्रकाशित होणाऱ्या आमच्या या कविता आणि गाण्यांमध्ये रंग भरण्याचं, त्यांना अधिक गहन अर्थ मिळवून देण्याचं काम अनेक चित्रकारांनी केलं आहे. प्रत्येकाची स्वतःची विशिष्ट शैली आहे आणि पारीवर प्रकाशित होणारी ही चित्रं आता या शब्दचित्रांचं अविभाज्य अंग आहेत.

पारीवर एखादी गोष्ट सांगितली जाते, त्यासोबत चित्र किंवा छायाचित्र असणारच. पण पारीवरची काही चित्रं फक्त सोबत येत नाहीत तर गोष्ट उकलून सांगण्याचं काम करतात. काही वेळा छायाचित्रांचा वापर करता येत नाही अशा वेळी चित्रं गोष्ट सांगतात आणि एका कहाणीत स्वतः चित्रकार असणारी लेखिका आपली गोष्ट चित्रांमधून सांगते. चित्रकारांच्या रेषा शब्दांच्या ओळींमध्ये प्राण फुंकतात आणि गोष्ट जिवंत होते.

ही गुंफण कशी होते त्याची छोटीशी झलक

लेखातील चित्रांसाठी रिचकिन संकलेचाने मोलाची मदत केली आहे. मनापासून आभार.

आम्ही करत असलेलं काम तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला पारीसाठी काही लिहायचं असेल, योगदान द्यायचं असेल तर [email protected] या ईमेलवर संपर्क साधा. मुक्त व स्वतंत्र पत्रकार, वार्ताहर, छायाचित्रकार, चित्रपटकर्ते, अनुवादक, संपादक, चित्रकार आणि संशोधकांचं स्वागत आहे.

पारी सेवाभावी संस्था आहे. बहुभाषी संग्रह आणि वार्तापत्र असणारी आमची वेबसाइट लोकांच्या देणग्या आणि आर्थिक मदतीवर विसंबून आहे. तुम्हाला पारीच्या कामाला हातभार लावायचा असेल तर DONATE या पानावर जाऊन सढळ हाताने मदत करा.

Pratishtha Pandya

پرتشٹھا پانڈیہ، پاری میں بطور سینئر ایڈیٹر کام کرتی ہیں، اور پاری کے تخلیقی تحریر والے شعبہ کی سربراہ ہیں۔ وہ پاری بھاشا ٹیم کی رکن ہیں اور گجراتی میں اسٹوریز کا ترجمہ اور ایڈیٹنگ کرتی ہیں۔ پرتشٹھا گجراتی اور انگریزی زبان کی شاعرہ بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Pratishtha Pandya
Joshua Bodhinetra

جوشوا بودھی نیتر پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) کے ہندوستانی زبانوں کے پروگرام، پاری بھاشا کے کانٹینٹ مینیجر ہیں۔ انہوں نے کولکاتا کی جادوپور یونیورسٹی سے تقابلی ادب میں ایم فل کیا ہے۔ وہ ایک کثیر لسانی شاعر، ترجمہ نگار، فن کے ناقد اور سماجی کارکن ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Joshua Bodhinetra
Archana Shukla

ارچنا شکلا، پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی کانٹینٹ ایڈیٹر ہیں۔ وہ پبلشنگ ٹیم کے ساتھ کام کرتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Archana Shukla
Illustration : Labani Jangi

لابنی جنگی مغربی بنگال کے ندیا ضلع سے ہیں اور سال ۲۰۲۰ سے پاری کی فیلو ہیں۔ وہ ایک ماہر پینٹر بھی ہیں، اور انہوں نے اس کی کوئی باقاعدہ تربیت نہیں حاصل کی ہے۔ وہ ’سنٹر فار اسٹڈیز اِن سوشل سائنسز‘، کولکاتا سے مزدوروں کی ہجرت کے ایشو پر پی ایچ ڈی لکھ رہی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Labani Jangi