निशा जमिनीवर बसून जरा वारा घेतेय. जूनच्या उकाड्यात दुपारचं तापमान वाढलंय आणि वाळलेल्या पानांच्या नि तंबाखूच्या दर्पामुळे हवा जडही झालीय. “या आठवड्यात मी फक्त एवढ्याच विड्या बनवू शकले,’’ एका जुडीत १७ विड्या यानुसार आपण बांधून ठेवलेल्या अंदाजे ७०० विड्या दाखवत त्या सांगतात.

“त्यांची किंमत कदाचित १०० रुपयेसुद्धा होणार नाही,’’ निशा ही ३२ वर्षीय विडी कामगार आपल्या आठवड्याभराच्या कामाबद्दल सांगत असते. मध्य प्रदेशातल्या दमोह जिल्ह्यात एक हजार विडी वळल्या की १५० रुपये मिळतात.

दर बुधवारी आणि शुक्रवारी विडी कामगार त्यांनी बनवलेल्या विड्या घेऊन येतात आणि पुढच्या फेरीसाठी कच्चा माल घेऊन जातात. दमोह शहराच्या वेशीवर अनेक कारखाने आहेत. कारखाने आपापले ठेकेदार (कंत्राटदार) नेमतात. हे ठेकेदार प्रामुख्याने महिलांना कंत्राटावर काम देतात.

या स्त्रिया कच्चा माल उचलतात. कातरलेला तंबाखू तेंदूपत्त्यात गुंडाळून विड्या वळतात. मग बारीक धाग्यांनी गुंडाळून विड्यांचे सुबक कट्टे (बंडलं) बांधतात. घरच्या उत्पन्नाला थोडा हातभार लागावा म्हणून दैनंदिन घरगुती कामं उरकल्यावर त्या हे काम करतात. यांच्या कुटुंबाचं सरासरी मासिक उत्पन्न जातं १०-२० हजारांच्या आसपास. या पैशात ८ ते १० लोकांचं कुटुंब पोसायचं असतं. विड्या वळणाऱ्या बहुतेक स्त्रिया शेतमजूर आहेत किंवा अल्पभूधारक.

“पानांच्या शिरा फुगून बाहेर येईपर्यंत सुका तेंदूपत्ता पाण्यात भिजत ठेवावा लागतो. नंतर फार्मा (लोखंडी स्टेन्सिल) वापरून पानं कापायची आणि त्यांचे लहान आयताकृती तुकडे करायचे. मग त्यात जर्दा (सुगंधी तंबाखू) भरून विड्या वळायच्या,’’ निशा विडी वळण्याची पद्धत समजावून सांगते. प्रत्येक विडी रंगीत धाग्याने बांधावी लागते. हा धागा म्हणजे ज्या त्या ब्रँडची ओळख असते. कंपनी बदलते, त्यानुसार विडीच्या धाग्याचा रंग बदलतो.

त्यानंतर या विड्या ‘कारखान्या’मध्ये विकण्यासाठी आणल्या जातात. कारखाना म्हणजे विडी बनवणाऱ्या ब्रँडचं प्रक्रिया तसंच पॅकेजिंग केंद्र, आणि गोदाम. आपण वळलेल्या विड्या हे कामगार कंत्राटदाराला देतात. कंत्राटदार कामगारांना घेऊन कारखान्यात जातो किंवा विड्या ताब्यात घेऊन त्यांना थेट पैसे देतो. कारखान्यात विड्यांची वर्गवारी केली जाते. त्या भाजल्या जातात. मग पॅकिंग होऊन विड्यांची साठवणूक केली जाते.

PHOTO • Priti David
PHOTO • Kuhuo Bajaj

जवळपासच्या छिंदवाडा आणि इतर भागातली अनेक तेंदू जंगलं म्हणजे तेंदूपत्त्याचा समृद्ध स्रोत. तेंदूपत्ता हा विडी उत्पादनातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक – हा तंबाखूचं आवरण म्हणून (तंबाखू गुंडाळण्यासाठी) वापरला जातो. उजवीकडे: घरकामाच्या मधल्या वेळात विड्या वळण्याचं काम करणारी निशा

विड्या वळणाऱ्या इथल्या बहुतेक स्त्रिया मुस्लिम आहेत, पण इतर समाजातले लोकही उपजीविकेसाठी हे काम करताना दिसतात.

सिवनी, मंडला, सीहोर, रायसेन, सागर, जबलपूर, कटनी आणि छिंदवाडा या मध्य प्रदेशातल्या जिल्ह्यांतल्या अनेक तेंदूजंगलांच्या सान्निध्यात दमोहमधले जवळपास २५ कारखाने आहेत. ३१ टक्के वनक्षेत्र असलेली ही तेंदू जंगलं म्हणजे तेंदूपत्त्याचे समृद्ध स्रोत आहेत. तेंदूपत्ता हा विडी उत्पादनातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक – हा तंबाखूचं आवरण म्हणून (तंबाखू गुंडाळण्यासाठी) वापरला जातो.

*****

उन्हाळ्यातल्या एका उबदार दुपारी चमकदार रंगांचे सलवार कमीज घातलेल्या अर्धा डझन महिला आपण वळलेल्या विड्यांची मोजणी व्हायची वाट पाहत आहेत. त्यांच्या गप्पा आणि त्यांची ठेकेदाराशी चालू असलेली वादावादी अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जवळच्या मशिदीतून शुक्रवारच्या नमाजचा आवाज कानावर पडत राहतो. या महिला आपापलं ‘तसलास’ (वैशिष्ट्यपूर्ण लोखंडी भांडं) घेऊन बसलेल्या असतात. आठवड्याभराच्या मेहनतीतून त्यांनी वळलेल्या विड्या त्यात असतात.

अमीना (नाव बदललं आहे) मोजणीवर नाराज आहेत : “आणखी (विड्या) होत्या, पण वर्गवारी करताना ठेकेदाराने त्या नाकारल्या,’’ त्या सांगतात. या महिला स्वत:ला ‘विडी मजदूर’ (मजूर) म्हणवून घेतात. या कामासाठी लागणाऱ्या कष्टांच्या मानाने १००० विड्यांसाठी १५० रुपये मिळणं म्हणजे अन्याय आहे, असं या महिलांचं म्हणणं.

“त्यापेक्षा मी शिवणकाम सुरू करेन. त्यातून मला जास्त पैसे मिळतील,’’ जानू सांगतात. दमोहमध्ये राहणाऱ्या जानू पूर्वी विड्या वळायच्या. अर्थात, वयाच्या चौदाव्या वर्षी जेव्हा विड्या वळायला सुरुवात केली, तेव्हा “माझ्याकडे फारसं कौशल्यही नव्हतं की दुसरा कुठला पर्याय..,’’ जानू सांगतात.

PHOTO • Kuhuo Bajaj

सुगंधी तंबाखू , जर्दा (डावीकडे) तेंदूपत्त्यात गुंडाळून विडी (उजवीकडे) तयार केली जाते

तासन् तास वाकून विड्या वळल्यामुळे या कामगारांना पाठीच्या आणि मानेच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. हात जड होतात आणि त्यामुळे घरातली नेहमीची कामं करणंही अवघड होऊन बसतं. या महिलांना कोणतीही भरपाई किंवा वैद्यकीय मदत मिळत नाही. त्यांच्या कामाशी संबंधित अशा आजारांकडे कारखानदार पूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यांच्यातल्याच एकाने मला सांगितलं की, “या महिला तर फक्त घरी बसतात आणि विड्या वळतात.’’

त्यांच्या मते, “या महिला आठवड्याला ५०० रुपयांपर्यंत कमवू शकतात.’’ आणि घरखर्च भागवण्यासाठी हा एक चांगला ‘सौदा’ आहे असं त्यांना वाटतं. पण यांच्या अंदाजानुसार एखाद्या विडी कामगार महिलेला आठवड्याला ५०० रुपये जर मिळवायचे असतील तर? तर, एक कामगार महिला अख्ख्या महिन्यात मिळून जितक्या विड्या वळते तितक्या म्हणजे जवळपास ४००० विड्या तिला दर आठवड्याला वळाव्या लागतील.

ज्या महिलांशी बोललो आम्ही; त्या सगळ्यांनी आम्हाला त्यांना जाणवणाऱ्या शारीरिक ताणाबद्दल आणि त्यांना होणाऱ्या दुखापतींबद्दल सांगितलं. सतत ओली पानं वळून वळून आणि तंबाखूचा सतत संपर्क होऊन होऊन त्वचेच्या समस्याही उद्भवत राहतात. “हातांना अशा चिरा पडतात, व्रणही राहून जातात,’’ १० वर्षांच्या कामापायी हातावर पडलेल्या चिरा आणि फोड दाखवत एक कामगार महिला माझ्यासमोर हात पुढे करत सांगते.

सीमा (नाव बदललं आहे) ही आणखी एक विडी कामगार महिला. ती सांगते की, “झोपण्यापूर्वी माझ्या हातांवर मी बोरोलीन (एक प्रकारचं मलम) लावते. नाही लावलं तर, तंबाखू आणि ओल्या पानांच्या संपर्कात आल्यावर माझ्या तळहाताची सालं निघतात.’’ जवळपास चाळीशीत असलेली सीमा पुढे म्हणते, “मी तंबाखू खात नाही, पण त्याच्या नुसत्या वासानेही मला खोकला यायला लागायचा.’’ त्यामुळे १२-१३ वर्षांपूर्वी त्यांनी शेवटी हे विड्या वळणं थांबवलं आणि शहरात घरकाम करायला सुरुवात केली. त्यातून महिन्याला ती साधारण ४ हजार रुपयांपर्यंत कमावते.

रझिया (नाव बदललं आहे) बऱ्याच वर्षापासून म्हणजे अगदी आठवतंय तेव्हापासून विड्या वळतेय. तेंदूपत्त्याचं वजन करणाऱ्या ठेकेदाराला ती म्हणते : “अरे, कसली पानं देतोयस तू आम्हाला? या असल्या पानांच्या चांगल्या विड्या कशा वळू आम्ही? जेव्हा तपासाल ना मोजणीच्या वेळी; तेव्हा या सगळ्या विड्या नाकारणार तुम्ही...’’

PHOTO • Kuhuo Bajaj

विडी कामगार दर बुधवा री आणि शुक्रवारी तेंदूपत्ता आणि जर्दा हा कच्चा माल घेण्यासाठी कारखान्यात येतात

काळजीचं आणखी एक कारण असतं ते म्हणजे पावसाळा. “पावसाळ्याच्या चार महिन्यात वळलेल्या जवळजवळ सगळ्याच विड्या कचऱ्यात जाणार असं वाटतं.’’ ओल्या तेंदूपत्त्यात गुंडाळलेला तंबाखू नीट वाळू शकत नाही. मग विडी वाकते. आणि संपूर्ण बंडल खराब होतं. “पावसाळ्यात आमचे कपडे आम्ही जेमतेम वाळवू शकतो, पण काहीही करून आम्हाला विड्या वाळवाव्याच लागतात,’’ नाहीतर कमाई काहीच होत नाही यांची.

जेव्हा ठेकेदार विडी नाकारतो, तेव्हा मजुरीचा वेळ तर वाया जातोच शिवाय ती बनवण्यासाठी वापरल्या गेलेल्या कच्च्या मालाचे पैसेही त्यांच्या कमाईतून कापून घेतले जातात. “मोठ्ठीच्या मोठ्ठी रांग असायची मोजणीच्या दिवशी. कसाबसा जेव्हा आमचा नंबर लागायचा, तेव्हा ठेकेदार आम्ही वळून आणलेल्या विड्यांमधल्या अर्ध्या विड्या काढून टाकायचा,’’ विड्या मोजल्या जायच्या त्या दिवशीचं ते चिंतातुर वाट बघणं  जानूला आठवतं.

विडीची लांबी, जाडी, पानांचा आणि विडी वळण्याचा दर्जा अशा अनेक निकषांच्या आधारे विड्या  नाकारल्या जातात. “पानं ठिसूळ झाली आणि वळताना किंचित फाटली, किंवा जर धागा सैल बांधला गेला तर विडी नाकारली जाते,’’ साठीतल्या एक विडी मजूर सांगतात. नाकारलेल्या विड्या ठेकेदार स्वत:साठी ठेवतात आणि स्वस्त दरात विकतात, असं कामगारांचं म्हणणं. “पण आम्हाला ना त्या नाकारलेल्या विड्यांसाठी कुठला मोबदला मिळतो, ना त्या आम्हाला परत मिळतात...’’

*****

१९७७ साली केंद्र सरकारने विडी कामगार कल्याण निधी कायदा १९७६ अन्वये विडी बनवायचं काम करणाऱ्या सगळ्यांचं ‘विडी कार्ड’ काढायला सुरुवात केली. विडी कार्डचा मुख्य उद्देश म्हणजे विडी कामगारांची ओळख पटवणं. अर्थात त्या आधारे शासकीय रुग्णालयात मोफत उपचार, बाळंतपणातील लाभ, मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी रोख रक्कम, डोळ्यांची तपासणी व चष्मा, शाळकरी मुलांसाठी शिष्यवृत्ती, शालेय गणवेश अनुदान अशा अनेक शासकीय योजनांचा लाभ त्यांना घेता येतो. विडी व सिगार कामगार(रोजगार अटी) कायदा १९६६ नुसार त्यांना हे लाभ घेता येतात. ज्या विडी कामगारांकडे हे कार्ड आहे, ते प्रामुख्याने विशिष्ट दवाखान्यांमधून मोफत किंवा सवलतीच्या दरात औषधं मिळवण्यासाठी त्याचा वापर करतात.

दमोहच्या ३० वर्षीय विडी कार्डधारक खुशबू राज सांगतात, “फार काही नाही, पण आम्हाला किमान अंगदुखी, ताप यावरची औषधं तरी मिळतात.’’ गेली ११ वर्षं त्या विड्या वळण्याचं काम करत होत्या.  पण आता नुकत्याच त्या दमोह शहरातल्या एका छोट्या बांगड्याच्या दुकानात विक्री साहाय्यक म्हणून लागल्या आहेत.

PHOTO • Kuhuo Bajaj

विडी कार्ड द्वारे कामगारांची ओळख पटते

हे कार्ड अनेक फायद्यांचं आश्वासन देतं, परंतु विशिष्ट दवाखान्यांमधून विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात औषधं मिळवण्यासाठी बहुतेक विडी कामगार कार्डचा वापर करतात. हे कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेतही शोषण होऊ शकतं.

हे कार्ड मिळवण्यासाठी, “आम्हाला अधिकाऱ्याच्या समोर काही विड्या बनवून दाखवाव्या लागतात,’’ खुशबू सांगतात, “आम्हाला खरोखरच विडी कशी बनवायची हे माहितीये की आम्ही फक्त फायदे मिळवण्यासाठी बनावट कार्ड बनवतोय, हे ते सरकारी अधिकारी तपासतात.’’

“आम्ही जर आमचं कार्ड बनवलं तर ते निधी कापतात,’’ गैरप्रकारांबद्दल बोलण्यास कचरणारी एक महिला सांगत होती. हिच्यापाशी तिच्या जुन्या गावातलं विडी कार्ड आहे. मालक कामगारांकडून पैसे कापून घेतात आणि ते निधीसाठी वापरतात, हे मात्र या महिलेने आवर्जून सांगितलं.

१९७६च्या कायद्यानुसार सरकारही या कामगार कल्याण निधीत जेवढ्यास तेवढी रक्कम जमा करतं. कामगार एकतर नमूद केलेल्या काही योजनांच्या अंतर्गत हे पैसे काढू शकतात, किंवा दुसरं एखादं बरं काम मिळालं म्हणून विड्या वळणं बंद केलं तर त्यांना ठेवीची संपूर्ण रक्कम परत मिळते.

दोन महिन्यांपूर्वी खुशबू यांनी विडी वळणं बंद केलं, त्यांना निधीची रक्कम म्हणून तीन हजार रुपये मिळाले. काही कामगारांना हा निधी फायदेशीर वाटत असला, तरी अनेकांना त्यांच्या श्रमाचा तात्काळ आर्थिक मोबदला कमी मिळत असल्याचं दिसून येतंय. शिवाय भविष्यात निधीची रक्कम त्यांना परत मिळेलच याची शाश्वती वाटत नाही.

विडी कार्ड हे जरी फायदेशीर वाटत असलं तरी ते बनवण्याची प्रक्रिया असुरक्षित असून काहींच्या शोषणास कारणीभूत ठरू शकते. एकीने या संदर्भातला स्वत:चा अनुभव सांगितला - ती स्थानिक केंद्रात आपलं विडी कार्ड बनवण्यासाठी गेली होती आणि तिथल्या साहेबाने (अधिकाऱ्याने) तिचा लैंगिक छळ केला होता.

“त्याने माझ्यावर नजर फिरवली आणि मला ‘उद्या ये’ असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी तिथे जाताना मी माझ्या धाकट्या भावाला सोबत नेलं. ‘मी माझ्या धाकट्या भावाला सोबत का आणलंय?’ त्यांनी मला विचारलं. मी एकटीनंच यायला हवं होतं असं त्याने सूचित केलं,’’ ती सांगते.

जेव्हा तिने कार्ड बनवण्यास नकार दिला, तेव्हा तो चिडवल्यासारखं करत एकटक तिच्याकडे पाहत राहिला. “दुसऱ्या दिवशी मी त्या भागातून जात असताना त्याने पाहिलं, माझ्या नावाने बोंबा मारायला सुरुवात केली आणि तमाशा केला,’’ ती सांगते.

“मी भोळीभाबडी बाई आहे, असं समजू नका. तुमच्या घाणेरड्या हेतूंना बळी पडावं म्हणून मी इथं आलेली नाही. आणि जर तुम्ही हे असंच चालू ठेवलंत तर मी तुमची बदली करून टाकीन,’’ असं तिने त्याला सुनावलं होतं. घटना सांगताना तिची मूठ वळलेली असते आणि आवाज चढलेला असतो. “खूप धाडस एकवटावं लागलं होतं त्यावेळी,’’ ती सांगते, “बदली होण्याआधी इतर २-३ महिलांशीही तो असंच वागला होता.’’

*****

PHOTO • Kuhuo Bajaj
PHOTO • Kuhuo Bajaj

डावीकडे: वळून ठेवलेल्या विड्या पॅक करून विकण्यासाठी तयार आहे . उजवीकडे: पूर्वी विडी कामगार म्हणून काम केलेल्या अनिता (डावीकडे) आणि जैनवती (उजवीकडे) त्यांचा विडी व ण्याचा अनुभव सांगतात.

जेव्हा महिला आपला माल विकण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा त्या आपला नंबर कधी लागतो याची वाट बघत असताना आपलं हाताचं आणि पाठीचं दुखणं विसरून हास्यविनोदात रमतात. ‘आपण सगळ्याजणी एकाच समूहाचा भाग आहोत’ ही जाणीव अशा या आठवड्यातून दोनदा एकत्र येण्यातून त्यांच्यात निर्माण होते.

“आम्ही अशा एकत्र येतो, भेटतो तेव्हाची ही सगळी गंमत आणि बोलणं... यामुळे मला मस्त वाटतं. मला माझ्या घरातून बाहेर पडणं शक्य होतं,’’ असं काही महिला सांगतात.

वातावरण गप्पांनी भरून आणि भारून जातं – एखाद्या घरातलं ताजं कौटुंबिक नाट्य, मुलं किंवा नातवंडांच्या खोड्या आणि एकमेकींच्या तब्येतीबद्दल मनापासून वाटणारी चिंता – असं खूप काही या गप्पांमध्ये असतं. सकाळी आपली सून दूध काढत असताना तिचं चार वर्षांचं पोर कसं त्रास देत होतं आणि मग या आपल्या नातवाला गायीने कशी लाथ मारली ते सीमा सांगत असते... तर आणखी कुणी आपल्या शेजाऱ्याच्या मुलीच्या लग्नाबद्दलच्या ताज्यातवान्या गोष्टी...

पण जेव्हा त्या आपापल्या घराकडे निघतात, तेव्हा हातात पडलेल्या अत्यंत मर्यादित कमाईच्या जोरावर घरखर्च कसा भागवायचा या चिंतेपायी त्यांचा हसताखेळता आवाज विरत विरत जातो. पदरी पडलेली तुटपुंजी कमाई घेऊन या महिला जेव्हा परत जायला निघतात, तेव्हा आपले श्रम आणि आरोग्य पणाला लावून त्यांना करावा लागलेला हा सौदा अन्यायकारक वाटत राहतो.

आपण अनुभवलेल्या वेदना आणि समस्या सीमाला आठवतात : “पाठ, दंड, खांदे, हात... सगळं खूप दुखायचं. तुम्हाला दिसत असलेली ही बोटं तेव्हा विड्या वळताना सुजायची... गुळगुळीत व्हायची...’’

अडचणींनी वेढलेल्या आणि चिंतांनी ग्रासलेल्या असूनही मध्य प्रदेशातल्या या विडी कामगार महिला तुटपुंज्या मजुरीवर तगून राहण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातलीच एक जण म्हणते तसं, “काय करणार... नाइलाज आहे!’’

या कथेतील काही नाव बदलली आहेत.

Student Reporter : Kuhuo Bajaj

کوہو بجاج، اشوکا یونیورسٹی سے اکنامکس، فائنانس اور انٹرنیشنل رلیشنز میں گریجویشن کی تعلیم حاصل کر رہی ہیں۔ دیہی ہندوستان کی اسٹوریز کور کرنے میں ان کی دلچسپی ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Kuhuo Bajaj
Editor : PARI Desk

پاری ڈیسک ہمارے ادارتی کام کا بنیادی مرکز ہے۔ یہ ٹیم پورے ملک میں پھیلے نامہ نگاروں، محققین، فوٹوگرافرز، فلم سازوں اور ترجمہ نگاروں کے ساتھ مل کر کام کرتی ہے۔ ڈیسک پر موجود ہماری یہ ٹیم پاری کے ذریعہ شائع کردہ متن، ویڈیو، آڈیو اور تحقیقی رپورٹوں کی اشاعت میں مدد کرتی ہے اور ان کا بندوبست کرتی ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز PARI Desk
Translator : Amruta Walimbe

Amruta Walimbe is an independent journalist and editor with a long experience of working with many NGOs and media houses in Maharashtra. She is also a trained psychologist.

کے ذریعہ دیگر اسٹوریز Amruta Walimbe