ढुम-ढुम-ढुम...ढम-ढम-ढम...! शांतीनगर वस्तीतल्या सगळ्या गल्ल्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे असे आवाज येत असतात. इथे छोट्या ढोलक्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे ढोल बनतात. त्यांचे आवाज आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जातात. इरफान शेख या अशाच एक ढोलकी तयार करणाऱ्या कारागिरासोबत आम्ही चाललो होतो. मुंबईच्या उत्तरेकडच्या एका उपनगरातली ही स्थलांतरितांची वस्ती. इथल्या कारागिरांशी आमची तो गाठ घालून देणार होता.

इथले जवळपास सगळ्या कारागिरांचे पूर्वज उत्तर प्रदेशातल्या बाराबंकीचे. आज या व्यवसायात ५० जण तरी आहेत. “कुठेही बघा, आमच्याच बिरादरीचे लोक तुम्हाला या कामात गुंतलेले दिसतील,” इरफान अगदी अभिमानाने सांगतो. मुंबई किंवा राज्याच्या इतर भागात पोचणारे ढोलक इथेच बनतात असं तो अगदी खुशीत सांगतो.

व्हिडिओ पहाः ढोलक ‘इंजिनियर’

इरफान अगदी लहान असल्यापासून या व्यवसायात आहे. ढोलकीहून छोट्या आकाराचे हे ढोलक तयार करण्याची कला त्याच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून आहे. आणि ती काही सोपी नाही. इरफान आणि त्याच्या बिरादरीचे सगळेच कारागीर थेट उत्तर प्रदेशातून त्यांना लागणारं सगळं साहित्य घेऊन येतात. लाकूड, रस्स्या आणि रंगसुद्धा. “आम्हीच हे ढोलक तयार करतो. आम्हीच दुरुस्त करतो. आम्हीच याचे इंजिनियर आहोत म्हणा ना!” इरफान अगदी ताठ मानेने सांगतो.

इरफान फार कल्पक माणूस आहे. त्याने आपल्या वाद्यांमध्ये आफ्रिकन जेम्बेसुद्धा समाविष्ट केलाय. गोव्यामध्ये एक आफ्रिकन व्यक्ती जेम्बे वाजवत असताना त्याने पाहिलं. “किती मस्त वाद्य आहे ते. इथल्या लोकांनी ते पाहिलं नव्हतं,” तो सांगतो.

कल्पकता आणि कारागिरी तर आहे पण मिळावा तितका आदर आणि मान मात्र या व्यवसायात नाबी याची त्याला खंत वाटते. नफासुद्धा फार नाही. आज मुंबईतल्या या ढोलक कारागिरांना ऑनलाइन मिळणाऱ्या स्वस्त वाद्यांशी स्पर्धा करावी लागतीये. ऑनलाइन बाजारपेठेत आम्हाला हे सगळं स्वस्त मिळेल असं म्हणत गिऱ्हाईक भाव पाडून मागतं ही मोठी समस्या आहे.

“जे ढोलक वाजवतात, त्यांची काही घराणी, काही पंरपरा आहेत. आमच्या बिरादरीत आम्ही वाद्यं वाजवत नाही, फक्त विकतो,” इरफान सांगतो. या समुदायाच्या लोकांना धार्मिक बंधनांमुळे जी वाद्यं बनवतात ती वाजवण्याची परवानगी नाही. पण तरीही गणेशोत्सव किंवा दुर्गा पूजेदरम्यान वाजवली जाणारी ही वाद्यं ते बनवतायत.

PHOTO • Aayna
PHOTO • Aayna

इरफान शेख (डावीकडे) आणि त्याच्या वस्तीतले उत्तर प्रदेशातून स्थलांतरित झालेले हे कारागीर कित्येक पिढ्यांपासून ढोलक तयार करतायत. इरफानने आपल्या कामात अभिनव प्रयोग केले आहेत आणि जेम्बे हे आफ्रिकन तालवाद्य बनवलं आहे

PHOTO • Aayna
PHOTO • Aayna

ढोलक बनवणे आणि विकणे हेच काम इरफानने लहानपणापासून केलंय आणि ते त्याला मनापासून आवडतं. मात्र या धंद्यात नफा अजिबात नाही आणि तेच त्याच्यासाठी चिंतेचं मोठं कारण ठरतंय

या वस्तीतल्या किती तरी स्त्रियांना ढोलक वाजवून गायला आवडतं. मात्र धार्मिक बंधनांचा आदर राखत त्या ढोलक बनवतही नाही किंवा वाजवतही नाही.

“हे काम चांगलंय पण आता त्यात फारसा धंदा उरला नाहीये त्यामुळे त्यातला रस निघून चाललाय. नफा नाहीच. आजही काही नाहीये. काल मी रस्त्यावर फिरत होतो आणि आजही रस्त्यावरच फिरतोय,” इरफान म्हणतो.

Aayna

آینا، وژوئل اسٹوری ٹیلر اور فوٹوگرافر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Aayna
Editor : Pratishtha Pandya

پرتشٹھا پانڈیہ، پاری میں بطور سینئر ایڈیٹر کام کرتی ہیں، اور پاری کے تخلیقی تحریر والے شعبہ کی سربراہ ہیں۔ وہ پاری بھاشا ٹیم کی رکن ہیں اور گجراتی میں اسٹوریز کا ترجمہ اور ایڈیٹنگ کرتی ہیں۔ پرتشٹھا گجراتی اور انگریزی زبان کی شاعرہ بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Pratishtha Pandya
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے