आता कुठल्याही क्षणी देवी या पृथ्वीतलावर अवतरेल. अर्थात क्षणभरात त्याचा पोषाख परिधान करून झाला तर. “सात वाजले आहेत. रजत ज्युबिलीच्या गावकऱ्यांनो चादरी, साड्या आणि कापडं घेऊन या. आपल्याला कलाकारांसाठी खोली तयार करायची आहे. मनसा एलो मोर्ते [देवीचा पृथ्वीवर अवतार] हे पाला गान आता सुरूच होत आहे.” नाचगाण्याचा हा कार्यक्रम सुरू होण्याआधी सुरू असलेल्या या घोषणांनी सगळा आसमंत निनादून गेला होता. साउथ परगणा जिल्ह्याच्या गोसाबा तालुक्यातल्या रजत ज्युबिली गावातली सप्टेंबर महिन्यातली शांत नीरस संध्याकाळ या घोषणांनी एकदम जिवंत झाल्यासारखी वाटू लागली. आता रात्री नुसता जल्लोष आणि सोहळा असणार हे नक्की.
एक तासाभरातच कलाकारांची ‘ग्रीन रुम’ उभारण्यात आली आणि आता एकदम झकपक कपडे घातलेले कलाकार तिथे चेहऱ्याला रंग लावायला तयार झाले होते. कुणी चेहरा रंगवतंय, कुणी दागिने घालतंय तर कुणी अलिखित संवादांची उजळणी करतंय. नित्यानंद सरकार या चमूचे मुख्य आहेत. आज ते जरा गप्प गप्पच वाटतायत. हिरण्मय आणि प्रियांकाच्या लग्नात भेटलेले उत्फुल्ल सरकार आज कुठे गायब झालेत कळत नाही. आज संध्याकाळच्या पाला गानमधल्या इतर कलाकारांशी ते माझी ओळख करून देतात.
पाला गान हे मंगल काव्यावर आधारित संगीत नाटक आहे. एका लोकप्रिय देवीचं गुणगान करणारं असं हे काव्य आहे. देशभरात ज्याचं पूजन केलं जातं अशा शंकरासारख्या देवासाठी ही पदं गायली जातात पण जास्त करून बंगालमधल्या धर्म ठाकूर, मा मनसा – नागदेवी, शितळा – देवीरोगाची देवी आणि बोनो बीबी – वनदेवता अशा स्थानिक दैवतांच्या पूजेत त्यांचा अधिक समावेश असतो. सुंदरबनमधल्या बेटाबेटावर फिरत कलाकारांचे जत्थे वर्षभर विविध ठिकाणी आपले कार्यक्रम सादर करत असतात.
मनसा पाला गान पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारच्या विविध भागात सादर केलं जातं. ते ज्या काव्यावर आधारित आहे ते मनसा मंगल काव्य अगदी १३ व्या शतकातलं असल्याचा काहींचा कयास आहे. मुळात हे काव्य देखील विविध लोककथांवर आणि मिथकांवर आधारित असल्याचं म्हणतात. बंगालमध्ये साउथ २४ परगण्यातल्या तसंच बांकुडा, बिरभूम आणि पुरुलिया जिल्ह्यातल्या दलित समुदायांमध्ये ही लाडकी देवी आहे. दर वर्षी विश्वकर्मा पूजेच्या दिवशी (या वर्षी १७ सप्टेंबर) सुंदरबनच्या भारतातल्या क्षेत्रातली बरीच कुटुंबं नागदेवतेची पूजा करतात आणि पाला गान सादर करतात.
मनसा देवीला या गाण्यांमधून आणि त्याच्यात गुंफलेल्या विधींमधून बोलावणं धाडलं जातं. सुंदरबनच्या लोकांचं बेटावरच्या विषारी सापांपासून रक्षण करण्यासाठी तिला विनवण्या केल्या जातात आणि त्यातूनच तिची शक्ती काय आहे त्याचं वर्णन केलं जातं. या परिसरात सापांच्या एकूण ३० प्रजाती आढळतात. आणि त्यातल्या किंग कोब्रा किंवा नागराजासारख्या काही सगळ्यात जहरी आहेत. या भागात सर्पदंशाने मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असले तरी त्याबद्दल फारशी वाच्यता केली जात नाही.
आजचं नाटक होतं चांद सदागार या एका श्रीमंत शिवभक्ताबद्दल. मनसा देवी हीच सर्वश्रेष्ठ देवी आहे हे काही तो मान्य करत नसतो. त्याची ही गोष्ट. त्याच्या या उद्धट वागणुकीसाठी त्याला धडा शिकवायचा या इराद्याने मनसा समुद्रातलं त्याचं जहाज नष्ट करते, त्याच्या सात मुलांचा सर्पदंशाद्वारे जीव घेते आणि आठवा मुलगा लखिंदर याला तर त्याच्या लग्नाच्या दिवशीच रात्री मारून टाकते. आपल्या पतीच्या निधनाने शोकाकुल झालेली त्याची पत्नी बेहुला त्याच्या मृतदेहासोबत स्वर्गात पोचते आणि त्याचं आयुष्य मागून घेते. तिथे इंद्रदेव तिला सांगतात की तू चांद सदागारचं मन वळव आणि त्याला मनसा देवीची उपासना करायला सांग. चांद सदागार मान्य करतो पण आपल्या काही अटीशर्ती घालतो. तो मनसा देवीला फुलं वाहील पण ती केवळ डाव्या हाताने. त्याचा उजवा आणि शुभ मानला जाणारा हात शंकराच्या पूजेसाठी असेल. मनसा देवी हे मान्य करते आणि लखिंदरला परत जिवंत करते. चांद सदागारचं सगळं वैभवही त्याला परत मिळवून देते.
मनसा देवीची भूमिका करणारे नित्यानंद शेतकरी आहेत. गेल्या २५ वर्षांपासून पाला गान सादर करणारे ५३ वर्षीय नित्यानंद पाला गानच्या अनेक मंडळींबरोबर काम करतात. “२०१९ पासूनच आमची हालत बिघडायला लागली होती,” ते सांगतात. “या वर्षीसुद्धा महासाथीमुळे आम्हाला फार कुणाकडून बोलावणं आलं नाहीये. आजवर इतक्या कमी सुपाऱ्या कधीच मिळाल्या नव्हत्या. एरवी आम्ही महिन्याला ४ ते ५ प्रयोग करायचो. पण यावर्षी फक्त दोन.” आणि जितके प्रयोग कमी तितकी कमाई देखील कमी. “पूर्वी प्रत्येक प्रयोगाचे आम्हा कलाकारांना ८००-९०० रुपये तरी मिळायचे. आता तीच कमाई ४००-५०० वर आलीये.”
नित्यानंद यांच्या शेजारी बसलेले बनमाली ब्यापारी त्यांच्याच गटात आहेत. गावपाड्यात नाटक सादर करणं किती अवघड आहे ते बनमाली सांगू लागतात. कलाकारांसाठी ग्रीन रुम नाही, धड रंगमंच नाही, ध्वनी आणि प्रकाशाची पण नीटशी सोय नाही. अगदी संडाससारख्या साध्या सोयीदेखील नसल्याचं ते सांगतात. “नाटक ४-५ तास चालतं. आणि नाटक पण सरळ साधं नसतं. आम्ही आमचा जीव ओतून काम करतो. केवळ पैसा मिळवावा म्हणून नाही,” ते म्हणतात. या नाटकात ते दोन भूमिका करतात. एक कालनागिनी सर्पिणीची, जी लखिंदरला मारते आणि दुसरी भूमिका म्हणजे भार हे विनोदी पात्र. अतिशय चित्तथरारय अशा या नाटकामध्ये या पात्राचं काम म्हणजे जरासा विसावा.
वादक वाद्यं वाजवू लागतात. आता प्रयोग सुरू होणार याची ही नांदी. नित्यानंद आणि इतर पुरुष कलाकारांचा चमू वेशभूषा आणि रंगभूषा करून थेट मंचावर जातात. नाटकाची सुरुवात मनसा देवीचे आणि गावातल्या जुन्या जाणत्या मंडळींचे आशीर्वाद मागणारी एक नांदीवजा प्रार्थना म्हणून होते. नाटक सुरू असतं तेव्हा पूर्ण वेळ प्रेक्षक मंतरल्यासारखे डोळे मंचावर खिळवून सगळं बघत असतात. त्यांच्याच रोजच्या बोलाचालीतली ही माणसं एका दैवी नाट्यातली अचंबित करणारी पात्रं रंगवताना पाहत राहतात. यातले कुणीही व्यावसायिक कलाकार नाहीत. हे सगळे जण शेतकरी, शेतमजूर किंवा कामासाठी हंगामी स्थलांतर करणारे मजूर आहेत.
नित्यानंद यांचं सहा जणांचं कुटुंब आहे. “या वर्षी यास चक्रीवादळामुळे माझं सगळं उत्पन्न पाण्यात गेलं आहे,” ते म्हणतात. “माझ्या जमिनीत खारं पाणी शिरलंय आणि आता मुसळधार पाऊस पडतोय. माझे सगळे साथीदार देखील शेती करतात किंवा इतर काही कामं. त्यांच्यापुढेही अडचणींचा डोंगर उभा आहे. एकच चांगली गोष्ट म्हणजे मला शासनाकडून दर महिन्याला १००० रुपये मिळतायत [लोकप्रसार प्रकल्प या राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत म्हाताऱ्या आणि तरुण लोककलावंतांना मासिक पेन्शन किंवा एकरकमी भत्ता दिला जातो.]”
तरुण पिढीतली मुलं काही पाला गान सादर करण्यास फारशी उत्सुक नाहीत. नित्यानंद यांचा मुलगाही नाही. लाहिरीपूर पंचायतीत येणाऱ्या किती तरी गावातले तरुण बाहेरच्या राज्यात बांधकामावर किंवा शेतात मजुरी करण्यासाठी म्हणून स्थलांतर करतात. “सगळी संस्कृती बदलायला लागलीये. पुढच्या ३-५ वर्षात ही कला नाहिशी सुद्धा होईल, कोण जाणे,” नित्यानंद म्हणतात.
“लोकांच्या आवडीसुद्धा बदलत चालल्या आहेत. पारंपरिक कलाप्रकारांपेक्षा मोबाइलवरचे करमणुकीचे कार्यक्रम लोकांना आवडायला लागलेत,” याच नाटकमंडळीतले अंदाजे चाळिशीचे बिस्वजीत मंडल म्हणतात.
कित्येक तास त्यांचं नाटक पाहून झालंय, त्यांच्याशी गप्पा मारून झाल्या आहेत. आता त्यांचा निरोप घेण्याची वेळ येऊन ठेपली. मी निघणार तितक्यात नित्यानंद हाक मारून म्हणतात, “हिवाळ्यात परत या नक्की. आम्ही मा बोन बीबी पाला गान सादर करणार आहोत. तुम्हाला कदाचित तेही कॅमेऱ्यात टिपायला आवडेल. मला तर भीती आहे की भविष्यात लोकांना फक्त इतिहासाच्या पुस्तकांमध्येच या कलेविषयी वाचायला मिळेल.”