१९९८ साली तुफान चाललेल्या अ बग्ज लाइफ या सिनेमाची पुढची गोष्ट असावी असं सगळं सुरू आहे. हॉलिवूडच्या या चित्रपटात अँट आयलंड किंवा मुंगी बेटावर आपल्या हजारो गोतांना वाचवण्यासाठी फ्लिक नावाची मुंगी शूर योद्ध्यांची भरती करत असते कारण पुढ्यात असतात शत्रू नाकतोडे.

भारतात अगदी प्रत्यक्षात हे सगळं जिथे घडतंय तिथे या दृश्यांमधल्या कलाकारांची संख्या खर्व-निखर्वांमध्ये जाते आणि त्यातले १.३ अब्ज मानवी जीव आहेत. छोटी शिंगं असणारे हल्लेखोर नाकतोडे – ज्यांना टोळ म्हणतात – ते या महिन्यात इथे आले, त्यांची संख्या लाखो-करोडोंमध्ये तर होतीच. आणि त्यांनी बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या जवळपास अडीच लाख एकरावरचं उभं पीक फस्त केलं असं देशाचे कृषी आयुक्त सांगतात.

हवेत विहार करणाऱ्या या हल्लेखोरांना देशांच्या सीमांची बंधनं नाहीत. पश्चिम आफ्रिका ते भारत अशा १ कोटी ६० लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात तब्बल ३० देशांमध्ये टोळांचं वास्तव्य असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेचं (FAO) म्हणणं आहे. आणि एखादी छोटी टोळधाड – एक चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेली, ज्यात ४ कोटी टोळ असू शकतात – ३५,००० माणसं, २० उंटं किंवा ६ हत्ती जेवढं खातील तितकं अन्न ते एका दिवसात फस्त करतात.

त्यामुळेच राष्ट्रीय टोळधाड इशारा संघटनेच्या सदस्यांमध्ये संरक्षण दल, कृषी, गृह विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान, नागरी उड्डाण आणि माहिती व दूरसंचार मंत्रालयातील व्यक्तींचा समावेश असावा.

पण, लाखो-करोडो कीटकांमधलं नैसर्गिक संतुलन बिघडून गेल्यामुळे जी दृश्यं आपल्याला पहायला मिळतायत त्यात एकटे टोळच खलनायक आहेत असं मात्र नाही. भारतामध्ये कीटकतज्ज्ञ, आणि आदिवासी व इतर शेतकरी या शत्रू कीटकांची यादी करतायतः असंख्य आणि कधी कधी तर परक्या प्रजातीही यात आहेत. काही भले कीटक – मित्र कीटक – जे अन्न उत्पादनात मदत करतात, तेही वातावरण बदलांमुळे त्यांच्या अधिवासांवर संक्रांत आली की शत्रूगोटात जाऊ शकतात.

Even the gentle Red-Breasted Jezebel butterflies (left) are creating a flutter as they float from the eastern to the western Himalayas, staking new territorial claims and unseating 'good guy' native species, while the 'bad guys' like the Schistocerca gregaria locust (right) proliferate too. (Photos taken in Rajasthan, May 2020)
PHOTO • Courtesy: Butterfly Research Centre, Bhimtal, Uttarakhand
Even the gentle Red-Breasted Jezebel butterflies (left) are creating a flutter as they float from the eastern to the western Himalayas, staking new territorial claims and unseating 'good guy' native species, while the 'bad guys' like the Schistocerca gregaria locust (right) proliferate too. (Photos taken in Rajasthan, May 2020)
PHOTO • Rajender Nagar

अगदी साधीभोळी हळदीकुंकू फुलपाखरं देखील (डावीकडे) पूर्व हिमालयातून पश्चिम हिमालयाच्या दिशेने सरकतयात, आणि तिथल्या भल्या, स्थानिक प्रजातींना हाकलून लावतायत. आणि टोळांसारखे गुंड तर वाढतच चाललेत. (छायाचित्र – राजस्थान, मे २०२०)

मुंग्यांच्या डझनभर प्रजाती आता किडी होऊ लागल्या आहेत. आवाज करणारे सिकाडा आता नवनवे प्रदेश पादाक्रांत करतायत, आपल्या धारदार तोंडाने फडशा पाडणारी वाळवी अंधाऱ्या जंगलांमधून बाहेर पडून चांगल्या लाकडावर हल्ला करतीये. मधमाशांची संख्या रोडावलीये आणि हंगाम सोडून भलत्याच वेळी चतुर दिसायला लागलेत. आणि असं सगळं होतं तेव्हा सगळ्याच प्राणीमात्रांची अन्नाची सुरक्षाच संकटात सापडते. अगदी साधीभोळी हळदीकुंकू (रेड ब्रेस्टेड जेझबेल) पूर्व हिमालयातून तरंगत पश्चिम हिमालयाच्या दिशेने निघालीयेत. तिथे जाऊन तिथल्या स्थानिक प्रजातींना ती हाकलून लावतायत. सगळ्या देशभर ही युद्धं झडतायत, शिंगं फुंकली जातायत.

स्थानिक कीटक कमी झाल्यामुळे मध्य भारतातल्या मध गोळा करणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. “असाही काळ होता जेव्हा आम्हाला कडे कपारींवर शेकड्यांनी पोळी दिसायची. आजकाल, ती सापडणं मुश्किल झालंय,” ४० वर्षीय भारिया आदिवासी असणारे ब्रिज किशन भारती सांगतात. ते मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

श्रीझोत गावातले मध गोळा करणारे त्यांच्यासह इतर जण – सगळेच दारिद्र्य रेषेच्या खालचे – जवळपासच्या कडेकपारीत जाऊन मध गोळा करतात आणि इथून २० किलोमीटरवर असणाऱ्या तामिया तालुक्यातल्या आठवडी बाजारात विकतात. दर वर्षी त्यांच्या दोन खेपा होतात, दोन्ही हंगामात (नोव्हेंबर-डिसेंबर आणि मे-जून). अनेक दिवस ते तिथेच मुक्काम करतात.

गेल्या दहा वर्षांत त्यांच्या मधाची किंमत १०० किलोला ६० रुपयांवरून ४०० रुपयांवर गेलीये. पण तितकंच नाहीये. ब्रिज किशन यांचा भाऊ, ३५ वर्षीय जय किशन म्हणतो त्याप्रमाणे, “पूर्वी आम्हाला एका खेपेला २५-३० क्विंटल मध मिळायचा. आता १० किलो मिळाला तरी नशीब. जंगलातली जांभूळ, बेहडा, आंबा आणि सालाची झाडंच कमी झालीयेत. वृक्ष कमी म्हणजे फुलोरा कमी. म्हणजे मधमाशा आणि इतर कीटकांसाठी अन्नही कमी.” अर्थात मध गोळा करणाऱ्यांचं उत्पन्नात घट.

Top row: 'Today, bee hives are difficult to find', say honey-hunters Brij Kishan Bharti (left) and Jai Kishan Bharti (right). Bottom left: 'We are seeing  new pests', says Lotan Rajbhopa. Bottom right: 'When bees are less, flowers and fruit will also be less', says Ranjit Singh
PHOTO • Priti David

वरच्या रांगेत: ‘आजकाल, मधाची पोळी मिळणं मुश्किल झालंय,’ मध गोळा करणारे ब्रिज किशन भारती (डावीकडे) आणि जय किशन भारती (उजवीकडे) सांगतात. खाली डावीकडेः ‘नव्याच किडी यायला लागल्या आहेत,’ लोटन राजभोपा सांगतात. खाली उजवीकडेः ‘मधमाश्या कमी असल्या की तेव्हा फुलं आणि फळं पण कमीच असणार,’ रणजीत सिंग सांगतात

फुलं कमी होतायत इतकीच काही चिंतेची बाब नाहीये. “आम्हाला जे दिसतंय त्याला म्हणतात – फेनॉलॉजिकल असिंक्रोनी – म्हणजे कीटक आणि फुलं यांच्यातलं असंतुलन,” बंगळुरुच्या नॅशनल सेंटर फॉर बायलॉजिकल सायन्सेसच्या डॉ. जयश्री रत्नम सांगतात. त्या संस्थेच्या वन्यजीव जीवशास्त्र आणि संवर्धन कार्यक्रमाच्या सहाय्यक संचालक आहेत. त्या सांगतात, “अनेक झाडांसाठी समशीतोष्ण प्रदेशांमध्ये वसंताची सुरुवात लवकर होतीये त्यामुळे फुलोरा लवकर यायला लागलाय. पण परागीभवन करणाऱ्या कीटकांनी मात्र त्यांच्या वेळापत्रकात मात्र दर वेळी हे बदल केलेच आहेत असं नाही. याचा अर्थ असा की या कीटकांना जे अन्न मिळायला पाहिजे ते त्यांना, जेव्हा हवं तेव्हा मिळत नाही. या सगळ्यांचा संबंध वातावरण बदलांशी जोडता येतो.”

आणि, जसं डॉ. रत्नम म्हणतात तसं, आपल्या अन्न सुरक्षेशी याचा थेट संबंध असला तरी “केसाळ प्राण्यांबद्दल जसं प्रेम वाटतं, तसं कीटकांविषयी फारसं काही दिसून येत नाही.”

*****

“माझ्या पेरुला फळ कमी लागलंय, आंबा आणि मोहाची तीच गत आहे. आचार झाडाला (चारोळी) सुद्धा गेल्या किती तरी वर्षांपासून फळ नाहीये,” रणजीत सिंग मर्शकोले, वय ५२ सांगतात. मध्य प्रदेशच्या होशंगाबाद जिल्ह्याच्या कटियादाना पाड्यावर ते राहतात. पिपरिया तहसिलमधल्या मातकुली गावात गोंड आदिवासी असणारे रणजीत सिंग आपल्या नऊ एकरात गहू आणि हरभरा घेतात.

“आता मधमाश्याच कमी झाल्या म्हणजे,” रणजीत सिंग म्हणतात, “फुलं आणि फळं पण कमीच होणार.”

आपल्याला मिळणारं अन्न हे खरं तर काही प्रमाणात या परागीभवनला हातभार लावणाऱ्या मुंग्या, मधमाश्या, माश्या, गांधीलमाश्या, ससाणी पतंग, फुलपाखरं, भुंगेरे आणि इतर कीटकांचे पंख, पाय, नांग्या आणि मिश्यांवर अवलंबून असतं. अन्न व कृषी संघटनेच्या वार्तापत्रानुसार , जगभरात जंगली माश्यांच्याच २०,००० हून जास्त प्रजाती आहेत. शिवाय इतर प्रजाती – पक्षी, वटवाघळं आणि इतर प्राणी – जे परागीभवन होण्यास हातभार लावतात. धान्य पिकांपैकी तब्बल ७५ टक्के तर जंगली वनस्पतींपैकी तब्बल ९० टक्के वनस्पती या अशा परागीभवनावर अवलंबून असतात. आणि जगभरात या बदलांचा परिणाम होत असलेल्या पिकांचं वार्षिक मूल्य २३५ ते ५७७ अब्ज डॉलर इतकं असल्याचं दिसून येतं.

आपल्याला मिळणारं अन्न मुंग्या, मधमाश्या, माश्या, गांधीलमाश्या, ससाणी पतंग, फुलपाखरं, भुंगेरे आणि इतर कीटकांचे पंख, पाय, नांग्या आणि मिश्यांवर अवलंबून असतं

व्हिडिओ पहाः ‘सगळी झाडं आणि वृक्ष वाढीसाठी कीटकांवरच अवलंबून असतात’

धान्यपिकांच्या परागीभवनामध्ये त्यांची भूमिका मोलाची आहेच, पण कीटक जंगलाचं स्वास्थ्यही जपतात. कसं? मेलेलं लाकूड, सांगाड्यांचं विघटन तेच करतायत, माती खाली वर करतात आणि बिया घेऊन येतात. भारतात जंगलांना लागून असलेल्या जवळ जवळ १,७०,००० गावांमध्ये राहणारे आदिवासी आणि इतर समाज जंगलातून सरपण आणि गौण वनोपज गोळा करतात, त्याचा घरासाठी वापर करतात किंवा बाजारात विकतात. शिवाय, देशातल्या ५४ कोटींच्या आसपास असलेलं पशुधनही चराईसाठी या जंगलांवरच अवलंबून आहे.

“जंगल मरायला लागलंय,” सत्तरीचे विजय सिंग आम्हाला सांगतात. म्हशी जवळच चारायला सोडून ते एका झाडाच्या सावलीत बसलेत. गोंड आदिवासी असलेल्या विजय सिंग यांची पिपरिया तहसिलातल्या सिंगानामा गावी ३० एकर जमीन आहे. त्यात ते गहू आणि हरभरा घेतात. गेली काही वर्षं त्यांनी जमीन पडक ठेवलीये. “एक तर मुसळधार पाऊस येतो आणि एका फटक्यात वाहून जातो, नाही तर मग जमीन ओलीसुद्धा होत नाही.” किड्यांना किती त्रास होतो हे त्यांनी पाहिलंय. “पाणीच नाहीये, मुंग्या त्यांचं घर तरी कुठे करणार?”

पिपरियाच्या पंचमढी छावणी क्षेत्रात ४५ वर्षीय नंदू लाल धुर्बे आम्हाला चक्राकार बामी [मुंगी आणि वाळवीच्या वारुळाचं स्थानिक नाव] दाखवतात. “बामी उभारायला मऊ माती आणि ओलावा लागतो. पण आजकाल भिजपाऊस पडतच नाही, गरम व्हायला लागलंय, त्यामुळे तुम्हाला चुकून एखादं दिसेल हे.

“आजकाल अवकाळी पाऊस किंवा थंडीमुळे – तेही खूपच जास्त किंवा अगदीच कमी - फुलं कोमेजून जातात,” धुर्बे सांगतात. ते गोंड आहेत आणि त्यांच्या भागाच्या परिसंस्थेचं गाढं ज्ञान त्यांच्याकडे आहे. ते उत्तम बागकाम करतात. “मग, फळाझाडांना फळ कमी लागतं, आणि कीटकांना अन्न कमी मिळतं.”

PHOTO • Priti David

नंदू लाल धुर्बे (डावीकडे) सांगतात की गरम आणि कोरड्या वातावरणामुळे आताशा ‘बामी’ किंवा वारुळं (मध्यभागी, मध्य प्रदेशातील जुन्नरदेव तहसिलात) क्वचितच पहायला मिळतात. ‘जंगल मरायला लागलंय,’ मध्य प्रदेशच्या पिपरिया तहसिलातले विजय सिंग सांगतात

सातपुडा रांगांमध्ये १,१०० मीटर उंचीवर वसलेलं पंचमढी अभयारण्यं असलेलं युनेस्कोने जाहीर केलेलं (बायोस्फियर रिझर्व्ह) आहे. पठारी प्रदेशांमधल्या उकाड्यापासून सुटका म्हणून वर्षभर या थंड हवेच्या ठिकाणी लोक येत असतात. पण, धुर्बे आणि विजय सिंग म्हणतात, आता इथेही उकाडा पारा चढायला लागलाय – आणि त्यांच्या मताला आधार आहे.

जागतिक तापमानवाढीबद्दल न्यू यॉर्क टाइम्सने सुरू केलेल्या एका संवादी पोर्टलवरची माहिती असं दाखवते की १९६० साली पिपरिया मध्ये तापमान ३२ अंशापर्यंत जाईल असे वर्षाकाठी १५७ दिवस होते. आज तोच आकडा वर्षातले २०१ दिवस इतका वाढला आहे.

शेतकरी आणि शास्त्रज्ञ, दोघांनाही दिसणाऱ्या या बदलांमुळे अनेक प्रजाती नष्ट होतायत, काही तर कायमच्या नाहिशा होतायत. अन्न व कृषी संघटनेच्या एका अहवालात इशारा देण्यात आलायः “जगभरात सध्या प्रजाती नष्ट होण्याचा दर सामान्य दरापेक्षा १०० ते १,००० पट जास्त आहे, कारण मानवाचा हस्तक्षेप.”

*****

“आज विकायला मुंग्याच मिळाल्या नाहीयेत,” छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातल्या छोटेडोंगर आठवडी बाजारात गोंड आदिवासी असणाऱ्या मुन्नीबाई कचलन आम्हाला सांगतात. पन्नाशीच्या मुन्नीबाई अगदी लहान असल्यापासून बस्तरच्या जंगलातून गवत आणि मुंग्या गोळा करतायत. त्या विधवा आहेत आणि त्यांना चार मुली आहेत. इथून नऊ किलोमीटरवर असलेल्या रोहताड गावात त्यांची दोन एकर जमीन आहे, जिथे हे कुटुंब पोटापुरती शेती करतात.

बाकी गरजेच्या वस्तू घेण्यासाठी लागणारे ५०-६० रुपये कमवण्यासाठी त्या बाजारात कुंच्यासाठी लागणारं गवत, मुंग्या आणि कधी कधी भात विकतात. त्या थोड्याशा मुंग्या विकतात. त्याचे २० रुपये मिळत असावेत. पण आम्ही त्यांना भेटलो त्या दिवशी त्यांच्याकडे तेवढ्याही मुंग्या नव्हत्या, फक्त गवताचा थोडा भारा होता.

Top left: The apis cerana indica or the 'bee', resting on the oleander plant. Top right: Oecophylla smaragdina, the weaver ant, making a nest using silk produced by its young one. Bottom left: Daphnis nerii, the hawk moth, emerges at night and helps in pollination. Bottom right: Just before the rains, the winged form female termite emerges and leaves the the colony to form a new colony. The small ones are the infertile soldiers who break down organic matter like dead trees. These termites are also food for some human communities who eat it for the high protein content
PHOTO • Yeshwanth H M ,  Abin Ghosh

वर डावीकडेः कण्हेरीच्या फांदीवरची मधमाशी (apis cerana indica) . वर उजवीकडेः लाल विणकर मुंगी (Oecophylla smaragdina ), आपल्या पिल्लांनी तयार केलेल्या रेशमापासून घरटं बनवतीये. खाली डावीकडेः ससाणी पतंग, रात्री बाहेर पडतो आणि परागीभवनासाठी मदत करतो. खाली उजवीकडेः पावसाळा सुरू होण्याच्या जरासं आधी पंख असलेली वाळवी नवीन वस्ती करण्यासाठी जुनं वारूळ सोडून बाहेर येते. छोटी वाळवी म्हणजे पिल्लं न होणाऱ्या सैनिक असतात त्या मेलेल्या झाडासारखा जैविक वस्तूंचं विघटन करतातय. काही मानवी समुदायांसाठी ही वाळवी प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत असल्याने त्यांच्या खाण्याचा हिस्सा आहेत

“आम्ही हलैंगी [लाल मुंग्या] खातो,” मुन्नीबाई सांगतात. “पूर्वी आम्हाला जंगलात सहज मुंग्या मिळायच्या. आता त्यांची संख्या फार म्हणजे फार कमी झालीये आणि असल्या तरी त्या आता उंच वृक्षांवर असतात – त्या गोळा करणं सोपं राहिलं नाहीये. मुंग्यांच्या मागे गेलेले गडी पडून जखमी व्हायची आम्हाला भीती वाटायला लागलीये.”

आपण आपल्या डोळ्यांनी कीटकांचा सर्वनाश पाहतोय. “कीटक ही प्रजात सगळ्या जीवसृष्टीच्या केंद्रस्थानी आहे. तेच गायब झाले, तर सगळा डोलारा कोसळेल,” एनसीबीएसमध्ये सहाय्यक प्राध्यापक असणारे डॉ. संजय साने सांगतात. मध्य प्रदेशातील पंचमढी आणि कर्नाटकातील अगुम्बे इथल्या क्षेत्र अभ्यास केंद्रांमध्ये ससाणी पतंगांवर निरीक्षण अभ्यास करतायत. “झाडझाडोरा, शेतीच्या पद्धती आणि तापमानातल्या बदलांमुळे सगळ्यात प्रकारच्या कीटकांची संख्या घटलीये. अख्खी प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.”

“कीटकांना तापमानात फारशी तफावत सहन होत नाही,” झूऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे (झेडएसआय) संचालक डॉ. कैलास चंद्रा सांगतात. “०.५ अंश सेल्सियस इतका बारीक बदल देखील त्यांच्या परिसंस्थेचं संतुलन बिघडवून त्यात कायमस्वरुपी बदल घडवून आणू शकतो.” गेल्या तीस वर्षांमध्ये भुंगेऱ्यांच्या संख्येत ७० टक्क्यांइतकी घट आल्याचं त्यांचं निरीक्षण आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) च्या लाल यादीत भुंगेरे, फुलपाखरं व चतुर ‘धोक्यात’ असल्याची नोंद आहे. “कीटकनाशकांचा बेसुमार वापर, त्यातून आता आपल्या मातीत आणि पाण्यात त्याचे अंश मिसळले गेले आहेत,” डॉ. चंद्रा सांगतात. “आणि त्यामुळे स्थानिक कीटक, पाणकिडे, इतरत्र न सापडणाऱ्या काही प्रजाती नष्ट झाल्या आहेत आणि आपल्याकडची किड्यांची जैवविविधताच संपुष्टात आली आहे.”

“जुन्या किडी गेल्या आणि आता नव्या पहायला मिळतायत,” ३५ वर्षीय लोटन राजभोपा सांगतो. तो मध्य प्रदेशातल्या तामिया तहसिलातल्या घातिया पाड्यावर राहणारा मवासी आदिवासी आहे. “ते इतक्या प्रचंड संख्येने धाड टाकतात की सगळं पीक फस्त करू शकतात. आम्ही तर त्यांचं नावही ठेवलंय – ‘भिन भिनी’ [असंख्य],” कुत्सितपणे तो म्हणतो. “आणि ही नवी कीड दुष्ट आहे, कीटकनाशक वापरलं तर त्यांची संख्या वाढतच जाते.”

Ant hills in the Satpura tiger reserve of MP. 'Deforestation and fragmentation coupled with climate change are leading to disturbed habitats', says Dr. Himender Bharti, India’s ‘Ant Man’
PHOTO • Priti David
Ant hills in the Satpura tiger reserve of MP. 'Deforestation and fragmentation coupled with climate change are leading to disturbed habitats', says Dr. Himender Bharti, India’s ‘Ant Man’
PHOTO • Priti David

मध्य प्रदेशातल्या सातपुडा व्याघ्र प्रकल्पातलं मुंग्यांचं वारूळ. ‘जंगलतोड तसंच जंगलांचे तुकडे पडत गेल्यामुळे, सोबत वातावरण बदलांचा परिणाम म्हणजे त्यांच्या अधिवासांना धक्का पोचला आहे,’ भारताचे ‘अँट मॅन’ डॉ. हिमेंदर भारती सांगतात

उत्तराखंडच्या भीमताल इथल्या फुलपाखरू संशोधन केंद्रात, संस्थापक ५५ वर्षीय पीटर स्मेटाचेक फार आधीपासूनच हिमालयातल्या तापमान वाढीबद्दल बोलतायत. त्यांच्या मते, या पर्वताच्या पश्चिमेकडच्या रांगांमध्ये दमटपणा आणि तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी हिवाळ्यात हवा कोरडी आणि गार असायची पण आता हिवाळा जास्त उबदार आणि ओला व्हायला लागला आहे. आणि त्यामुळे पश्चिम हिमालयातल्या फुलपाखरांच्या प्रजाती (ज्यांना उबदार आणि दमट वातावरणाची सवय आहे) आता पूर्वेकडे येऊन त्यांची वसाहती करू लागल्या आहेत.

पूथ्वीतलावरचा २.४ टक्के भूभाग असलेला भारत जैवविविधतेचं आगार आहे. या ग्रहावरच्या ७ ते ८ टक्के प्रजाती भारतात आढळतात. डिसेंबर २०१९ पर्यंत भारतातल्या कीटकांची संख्या ६५,४६६ इतकी असल्याचं झेडएसआयचे डॉ. चंद्रा सांगतात. अर्थात, “हा आकडाही तसा ठोकताळाच मानता येईल. खरी संख्या .पेक्षा ४-५ पट जास्त असणार. पण अनेक प्रजाती त्यांची गणना होण्याआधीच नामशेष होतील.”

*****

“जंगलतोड तसंच अधिवासांचे तुकडे पडत गेल्यामुळे, तसंच वातावरण बदलांचा परिणाम म्हणून त्यांच्या अधिवासांना धक्का पोचला आहे,” डॉ. हिमेंदर भारती सांगतात. भारताचे ‘अँट मॅन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱे डॉ. भारती पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठात उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आहेत. इतर कोणत्याही पृष्ठवंशीय प्राण्यांच्या तुलनेत तणावाला मुंग्या अधिक सूक्ष्मपणे प्रतिसाद देतात. आणि म्हणूनच एखाद्या भूभागातले आणि प्रजातींच्या वैविध्यातले बदल मोजण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.”

भारतातील मुंग्यांच्या ८२८ ग्राह्य मुख्य आणि उपप्रजातींची पहिली यादी करण्याचा मानही विद्यापीठात प्राणीशास्त्र आणि पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख असणाऱ्या डॉ. भारतींना जातो. ते आपल्याला इशारा देतात की “भक्षक किंवा आक्रामक प्रजाती बदलांशी झपाट्याने जुळवून घेऊ शकतात आणि त्या स्थानिक प्रजातींची जागा घेत आहेत. त्या सगळ्या क्षेत्रावर ताबा मिळवून ते काबीज करतील.”

Top left: 'I don’t have any ants to sell today', says Munnibai Kachlan (top left) at the Chhotedongar weekly haat. Top right: 'Last year, these phundi keeda ate up most of my paddy crop', says Parvati Bai of Pagara village. Bottom left: Kanchi Koil in the Niligirs talks about the fireflies of her childhood. Bottom right: Vishal Ram Markham, a buffalo herder in Chhattisgarh, says; 'he land and the jungle now belong to man'
PHOTO • Priti David

वर डावीकडेः ‘आज विकायला मुंग्याच मिळाल्या नाहीत,’ छोटेडोंगरच्या आठवडी बाजारात मुन्नीबाई कचलन सांगतात (वर डावीकडे). वर उजवीकडेः ‘गेल्या साली, या फुंदी किडीने माझा जवळपास सगळा भात फस्त केला,’ पगारा गावच्या पार्वती बाई सांगतात. खाली डावीकडेः निलगिरीत कांची कोळी लहानपणच्या काजव्यांच्या आठवणी सांगतात. खाली उजवीकडेः छत्तीसगडचे गुराखी, विशाल राम मरखम म्हणतात, ‘जमीन आणि जंगल आता माणसाच्या ताब्यात गेलंय’

दुष्टांचा विजय होतोय असं दिसतंय, पन्नाशीच्या मवासी आदिवासी पार्वती बाईंना तरी तसंच वाटतंय. होशंगाबादच्या पगारा या त्यांच्या पाड्यावर त्यांना भेटल्यावर त्या म्हणतात, “आजकाल आमच्या इथे ही ‘फुंदी कीड’ [अगदी बारीक अळ्या] यायला लागलीये. गेल्या साली त्यांनी माझा एका एकरातला जवळपास सगळा भात फस्त केला.” तेवढ्या एका हंगामात त्यांचं ९,००० रुपयांचं नुकसान झाल्याचा त्यांचा अंदाज आहे.

पार्वती बाईंपासून १००० किलोमीटरवर दक्षिणेकडे निलगिरी पर्वतरांगांमध्ये नवस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अनीता वर्गिस यांचं निरीक्षणः “हे असे बदल सगळ्यात आधी जाणवतात ते आदिवासी समुदायांना.” निलगिरीमध्ये काम करणाऱ्या कीस्टोन फौंडेशनच्या उप संचालक असणाऱ्या डॉ. वर्गिस सांगतात, “केरळमधल्या मध गोळा करणाऱ्यांच्या लक्षात आलं होतं की आशियाई मधमाशा जमिनीलगत नाही तर झाडांच्या फटींमध्ये पोळी बांधू लागल्या आहेत. आणि त्यांच्या निरीक्षणानुसार याचं कारण म्हणजे भक्षक अस्वलांच्या संख्येत वाढ आणि मातीचं वाढतं तापमान. पारंपरिक ज्ञान असणारे समुदाय आणि शास्त्रज्ञांनी एकमेकांशी संवाद साधण्याचा मार्ग शोधलाच पाहिजे.”

तिथे निलगिरीतच, कट्टुनायकन आदिवासी असणाऱ्या ६२ वर्षीय कांची कोळी आपल्या लहानपणच्या रात्री उजळून टाकणाऱ्या लखलख काजव्यांबद्दल बोलताना खूश होतात. “ मिनमिनी पूची (काजवे) झाडावर एखाज्या रथासारखे दिसायचे. मी लहान होते ना तेव्हा त्यांचे थवेच्या थवे यायचे आणि झाडं किती देखणी दिसायची. आजकाल ते दिसेनासे झालेत.”

पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये जाऊ. धमतरी जिल्ह्यातल्या जबर्रा जंगलात पन्नाशीचे गोंड शेतकरी विशाल राम मरकम खेदाने जंगलाचं मरण आल्याचं मांडतात. “जमीन आणि जंगल आता माणसाच्या ताब्यात गेलंय. आम्ही आगी लावतो, शेतात आणि पाण्यात डीएपी [डायअमोनियम फॉस्फेट] फवारतो. असं विषारी पाणी पिऊन दर वर्षी माझी ७-८ मोठी जनावरं मरतात. मासे, पक्षी जगू शकत नाहीत. तिथे छोटे कीटक कसे जिवंत राहतील?”

शीर्षक छायाचित्रः यशवंत एच. एम.

या  वार्तांकनासाठी मोहम्मद अरिफ खान, राजेंद्र कुमार महावीर, अनुप प्रकाश, डॉ. सविता चिब आणि भारत मेरुगु यांनी बहुमोल मदत केली, त्यांचे आभार. तसंच मनमोकळेपणे आपले विचार मांडल्याबद्दल न्यायवैद्यक क्षेत्रातल्या कीटकतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी भारती यांचेही आभार.

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Priti David

پریتی ڈیوڈ، پاری کی ایگزیکٹو ایڈیٹر ہیں۔ وہ جنگلات، آدیواسیوں اور معاش جیسے موضوعات پر لکھتی ہیں۔ پریتی، پاری کے ’ایجوکیشن‘ والے حصہ کی سربراہ بھی ہیں اور دیہی علاقوں کے مسائل کو کلاس روم اور نصاب تک پہنچانے کے لیے اسکولوں اور کالجوں کے ساتھ مل کر کام کرتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Priti David

پی سائی ناتھ ’پیپلز آرکائیو آف رورل انڈیا‘ کے بانی ایڈیٹر ہیں۔ وہ کئی دہائیوں تک دیہی ہندوستان کے رپورٹر رہے اور Everybody Loves a Good Drought اور The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom کے مصنف ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پی۔ سائی ناتھ
Series Editors : P. Sainath

پی سائی ناتھ ’پیپلز آرکائیو آف رورل انڈیا‘ کے بانی ایڈیٹر ہیں۔ وہ کئی دہائیوں تک دیہی ہندوستان کے رپورٹر رہے اور Everybody Loves a Good Drought اور The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom کے مصنف ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پی۔ سائی ناتھ
Series Editors : Sharmila Joshi

شرمیلا جوشی پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی سابق ایڈیٹوریل چیف ہیں، ساتھ ہی وہ ایک قلم کار، محقق اور عارضی ٹیچر بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز شرمیلا جوشی
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے