शांतीलाल, शांतू, तिन्योः नावं तीन, व्यक्ती एक. आपण चौथं नाव निवडू या. सबरकांठा जिल्ह्याच्या वडाली गावाच्या भाषेत त्याचं नाव होईल शोंतू. तर हा आहे शोंतू.

हा एक विलक्षण असामी आहे. असामान्य, एकमेव, विख्यात अशा अर्थाने नाही बरं. तर सत्यप्रिय, गरीब, दलित असल्याने चिकाटी असलेला, हाल काढणारा आणि गोंधळलेला. कधी कधी तर असा कुणी व्यक्ती आहे का नाही असा प्रश्न पडावा. आणि कधी एखाद्या अतिसामान्य माणसाचं टिचकीभर अस्तित्व असतं तितकाच तो असतो.

सहा माणसांच्या कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला - आई-वडील, मोठा भाऊ आणि दोघी बहिणी (एक त्याच्याहून धाकटी) - अत्यंत हलाखीत. कुटुंबाच्या वाढत्या गरजांना कायम चाप लागलेले. आई-वडील आणि मोठी दोघं भावंडं दोन वेळचं जेवण मिळेल इतकं कमावत होते. वडील एका मेटॅडोअरने माल वाहतूक करायचे. कधीही जादा कुणी भाडं घ्यायचे नाहीत. त्यामुळे  वरची काहीही कमाई व्हायची नाही. आई रोजंदारीवर कामाला जायची. तिला कधी काम मिळायचं, कधी नाही. वडील दारूडे नव्हते आणि त्यामुळे घरात फार काही गोंधळ नसायचा हीच मोठी कृपा होती. शोंतूला मात्र हे फार उशीरा उमगलं.

तो वडालीच्या शारदा हायस्कूलमध्ये नववीत शिकत होता तेव्हा त्याच्या गावी सर्कस आली होती. पण तिकिटं महाग होती. शाळेतल्या विद्यार्थ्यांना मात्र पाच रुपयांत जाता येणार होतं. शोंतूकडे शाळेत नेण्यासाठी एक कवडीही नव्हती. “उभा रहा,” शिक्षिका म्हणाल्या. “बेटा, तू पैसे का नाही आणलेस?” त्यांचा आवाज प्रेमळ वाटला. “बाई, माझे वडील आजारी आहेत आणि कपाशीच्या जिनिंग कारखान्यातून आईला तिची मजुरी अजून मिळाली नाहीये,” शोंतूला रडू फुटलं.

दुसऱ्या दिवशी त्याच्या वर्गातल्या कुसुम पठाणने त्याला १० रुपये दिले, ‘रमझानच्या काळात दुवा मिळावी म्हणून’. दुसऱ्या दिवशी तिने त्याला विचारलं, “मी तुला पैसे दिले होते, त्याचं तू काय केलंस?” शोंतू फार प्रामाणिक होता. “पाच रुपये मी सर्कसच्या तिकिटासाठी खर्चले आणि उरलेले पाच घरी लागतील म्हणून दिले.” कुसुम, रमझान, शोंतू आणि सर्कस - साजिरं जग होतं ते.

तो अकरावीत होता तेव्हा त्यांचं चिखलमातीचं घर पाडून त्या जागी सिमेंट-विटांचं बांधकाम करावं लागणार होतं. गिलावा वगैरे काहीच नाही. परवडणारच नव्हता. एक गवंडी नेमला होता. आणि बाकी सगळं काम घरच्यांनी मिळूनच केलं होतं. यामध्ये इतका सगळा वेळ गेला की थेट वार्षिक परीक्षाच जवळ येऊन ठेपली. त्याची उपस्थिती कमी भरली. मुख्याध्यापकांना भेटून, विनवण्या केल्यानंतर शोंतूला परीक्षा देण्याची परवानगी मिळाली.

तर तो बारावीत गेला आणि आता मात्र चांगला अभ्यास करायचा त्याने निर्धार केला. शोंतूने तयारी पण जोरदार केली पण त्याची आई आजारी पडली. तिचा आजार अगदी झपाट्याने बळावला. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अगदी आधी त्याची आई गेली. ही वेदना, आईचं जाणं जेमतेम १८ वर्षांच्या शोंतूच्या अगदी जिव्हारी लागलं. परीक्षा अगदी समोर येऊन ठेपलीये त्याचा ताणही जाणवत होता, पण कितीही प्रयत्न केले तरी फायदा काही झाला नाही. त्याला ६५ टक्के मिळाले. पुढे अभ्यास करावा हा विचार सोडून द्यावा असं शोंतूला वाटायला लागलं.

त्याला वाचायला फार आवडायचं त्यामुळे तो गावातल्या सार्वजनिक वाचनालयात जायला लागला. घरी पुस्तकं आणू लागला. त्याची ही आवड पाहून त्याच्या एका मित्राने वडाली कला महाविद्यालयात प्रवेश घे आणि इतिहास विषयात पदवी घे असं त्याला सुचवलं. “तुला भारी भारी पुस्तकं वाचायला मिळतील,” तो म्हणाला. शोंतूने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण तो फक्त पुस्तकं आणायला आणि परत करायला तेवढा तिथे जायचा. बाकी दिवसभर तो कॉटन जिनिंग मिलमध्ये काम करायचा. संध्याकाळी पुस्तकं वाचायचा आणि हो इथेतिथे मजामस्ती सुद्धा करायचा. त्याला बीएच्या पहिल्या वर्षी ६३ टक्के गुण मिळाले.

त्याच्या शिक्षकांनी त्याचा निकाल पाहिला आणि त्यांनी कॉलेजला नियमित येण्याची विनंती केली. शोंतूला अभ्यास आवडू लागला. तो आता तिसऱ्या वर्षात होता. उत्तम वाचनकौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्याला गुणवत्ता प्रमाणपत्र देण्याचा वडाली कॉेलजने निर्णय घेतला होता. आणि ते शोंतूलाच मिळालं.

PHOTO • Shantilal Parmar
PHOTO • Shantilal Parmar

फोटोमध्ये समोर असलेल्या घरी वरच्या मजल्यावर शोंतू सध्या राहतो. शोंतू अकरावीत असताना याचं घराचं बांधकाम केलं होतं. आता जो गिलावा दिसतोय तो लागायला मात्र मध्ये बराच काळ गेला

त्यानंतर त्याने एमएसाठी शेजारच्याच मेहसाना जिल्ह्याच्या विसनगरमध्ये शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी त्याला बीएच्या अंतिम परीक्षेत ६० टक्के गुण मिळणं गरजेचं होतं. आणि तसे ते त्याला मिळाले देखील. पण पुढच्या वर्षी मात्र त्याला वसतिगृह सोडावं लागलं. कारण एमएच्या पहिल्या वर्षात त्याला ५९ टक्के गुण मिळाले. गरजेपेक्षा एक टक्का कमी.

मग रोज वडाली ते विसनगर असा त्याचा दीड तासांचा प्रवास सुरू झाला. त्या वर्षी दिवाळीनंतर त्याच्या वडलांना कसलंच काम मिळालं नव्हतं. त्यांनी टेम्पोसाठी बँकेकडून कर्ज घेतलं होतं ते फेडणं तर दूरच त्यांना पोटभर जेवण मिळणं देखील मुश्किल झालं होतं. त्याचा मोठा भाऊ राजू शिवणकाम करून घरखर्च भागवायला हातभार लावत होता. आपल्या भावापुढे हात पसरणं दिवसेंदिवस शोंतूला अगदी नकोसं झालं होतं. त्यामुळे परत एकदा शोंतूचं कॉलेज बुडायला लागलं.

त्याने बाजारात काम करायला सुरुवात केली. कापूस गोण्यांमध्ये भरून त्या ट्रकमध्ये लादण्याचं काम होतं. दिवसाचे १०० - २०० रुपये मिळायचे. त्या वर्षी मार्च महिन्यात त्याची उपस्थिती कमी भरली आणि त्याला परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली. पण काही मित्रांनी थोडी मध्यस्थी केली आणि तो ५८.३८ टक्के गुणांनी परीक्षा उत्तीर्ण झाला. शोंतूला एम फिल करण्याची इच्छा होती. पण आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत याची त्याच्या मनात फार भीती होती.

वर्षभर त्याने शिक्षणातून खंड घेतला आणि त्यानंतर आवश्यक ते अर्ज भरून त्याने विसनगरच्या शासकीय बी एड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. राजूभाईंनी त्याला लागेल म्हणून ७,००० रुपये कर्ज काढलं. तीन टक्के व्याजावर. त्यातले ३,५०० रुपये प्रवेश शुल्क आणि वरचे २,५०० संगणक या सक्तीच्या विषयासाठी भरावे लागले. शोंतूकडे केवळ १,००० रुपये शिल्लक राहिले होते. त्यातून बाकी खर्च भागवावा लागणार होता. शिक्षणासाठी वडाली ते विसनगर असा प्रवास करण्याचं हे त्याचं तिसरं वर्ष होतं.

शिक्षण सुरू असलं तरी त्याच्या मनात सतत त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणी घर करून असायच्या. एकदा तर तो राजूभाईंना म्हणाला सुद्धा की मी शिक्षण सोडून देतो म्हणून. पण त्याचा मोठा भाऊ म्हणाला, “पैशाची चणचण असणारच आहे. त्यात भागवायची सवय कर. घरची चिंता सोड आणि अभ्यासावर लक्ष दे. बघ, हे दिवस कसे चुटकीसरशी निघून जातील. आणि भगवंताची कृपा असेल तर तुला बीएड केल्यानंतर नोकरीसुद्धा मिळेल.” मोठ्या भावाच्या या बोलांनी शोंतूच्या मनात पुन्हा आशा जागृत झाली. आणि मग त्या वर्षीच्या उन्हाळ्यात शोंतूच्या शिक्षणाची गाडी हळू हळू पुढे जात राहिली.

त्यानंतरच्या हिवाळ्यात त्याचे वडील आजारी पडले. आणि त्यांच्या त्या आजारपणात घरची सगळी पुंजी आणि कमाई खर्च झाली. आपल्या शिक्षणाच्या खर्चाचा सगळा बोजा एकट्या राजूभाईंच्या खांद्यावर आहे ही भावना शोंतूला आतून खात होती. बीएड करताना त्याला एक गोष्ट पक्की समजली होती की शिक्षण म्हणजे खर्च. कुणासोबत शिकत शिकत नोकरी करायची आणि सर्व शिक्षा अभियानासोबत काम करायचं तर १० दिवस विसनगर तालुक्यातल्या बोकरवाडा आणि भांडु गावी जायला लागायचं. खायची सोय बोकरवाडा प्राथमिक शाळेतर्फे केली जायची पण राहण्याचा खर्चाची नवीच अडचण समोर आली होती.राजूभाईंना आणखी त्रास द्यायचा नाही असं त्याने ठरवलं होतं. म्हणून त्याने कॉलेजच्या ऑफसमध्ये काम करणाऱ्या महेंद्र सिंह ठाकोर यांच्याकडून ३०० रुपये उसने घेतले.

“आम्ही गावातल्या एका पुजाऱ्याला विचारलं. तो आमच्यासाठी स्वयंपाक करून देतो म्हणाला. ताटामागे २५ रुपये पडतील म्हणाला. आम्ही त्या पुजाऱ्याच्या धरी चार दिवस जेवलो. मी आठवड्यातले दोन दिवस उपास धरायचो. त्यातनं ५० रुपये वाचायचे,” शोंतू सांगतो. त्यानंतर पाच दिवस शेजारच्या भांडू गावी जायला लागायचं. तिथे राहण्याची कसलीच सोय नव्हती. त्यामुळे बोरकवडाहून येऊन जाऊन काम करावं लागत होतं. त्यात रोज १० रुपये खर्चाची भर पडायची. मग शोंतूने महेंद्र सिंह यांच्याकडून आणखी २०० रुपये उसने घेतले.

जेवायची सोय भांडूच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात केली होती. तिथेही ताटाचे २५ रुपये पडायचे. शोंतूने आणखी दोन दिवस उपास धरला. मित्रमंडळींना काही हे आवडायचं नाही. त्यांच्यातल्या एकाने सुचवलं, “शोंतीलाल, आम्ही सगळ्यांनी आगाऊ पैसे भरलेत. तूच एकटा जेवण झालं की पैसे देतोस. आम्ही सगळे जेवण करून निघालो की आम्हाला काही कुणी पैसे मागत नाही. तू असं कर, आमच्यासोबत बस आणि आमच्यासोबतच बाहेर पड!” शोंतूने मग तसंच केलं. “मी त्यांचं ऐकलं आणि पुढचे काही दिवस पैसे न देताच जेवलो,” शोंतू सांगतो.

पण त्याला काही हे फार पसंत नव्हतं. आणि इतकं सगळं करूनही त्याला एच. के. पटेल सरांकडून आणखी ५०० रुपये उसने घ्यावे लागले होते. “माझी स्कॉलरशिप आली ना की मी हे परत करेन,” तो म्हणाला होता. दिवसागणिक खर्चाचा आकडा वाढतच होता. भांडूच्या शाळेतल्या शिक्षकांसाठी नाष्टापाणी द्यायला लागलं होतं.

एक दिवस एच के पटेल सरांनी त्याला स्टाफ रुममध्ये बोलावलं. “तुझे वडील बरेच आजारी आहेत,” असं म्हणत त्यांनी त्याच्या हातात १०० रुपयांची नोट ठेवली. “जा, लगेच गावी जा.” शोंतू घरी पोचला तर “सगळे माझ्यासाठीच थांबले होते,” तो सांगतो. “मला चेहरा दाखवला आणि त्यांनी पुढची सगळी तयारी सुरू केली.” त्यांच्या कुटुंबासमोर मोठंच संकट आ वासून उभं होतं. आई-वडलांपैकी कुणी गेलं तर १२ वा दिवस करावाच लागतो, तशी रीतच होती. पण त्यासाठी ४०,००० रुपये खर्च होणार होते.

PHOTO • Shantilal Parmar
PHOTO • Shantilal Parmar

शोंतूला अगदी पाठ झालेले हे रस्ते किंवा रस्त्याच्या टोकाला असलेलं हे घर. इथनंच तो रोज शाळेत जायचा. नंतर वडाली ते विसनगर किंवा विजयनगर आणि परतीचा हाच रस्ता होता

आई वारली तेव्हा काही बारावा करता आला नव्हता. त्यामुळे यावेळी काही त्यांची सुटका नव्हती. त्यांच्या समाजाची बैठक झाली. काही वरिष्ठांनी सूट मिळावी अशी विनंती केली. “दोघं मुलं अजून तरुण आहेत. एकाचं शिक्षण सुरू आहे आणि दुसरा सगळं घर चालवतोय. एकाच्या शिरावर सगळी आर्थिक जबाबदारी असल्याने त्यांना काही हा खर्च पेलणार नाही,” ते म्हणाले. आणि अखेर मोठ्या खर्चातून त्या दोघांची सुटका झाली.

शोंतूने ७६ टक्के मिळवून बीएड पूर्ण केलं. तो नोकरी शोधायला लागला. पावसाळा आला आणि राजूभाईंचं उत्पन्न जरासं घटलं. “मी नोकरीचं स्वप्न पाहणं सोडून दिलं आणि शेतात कामाला जायला लागलो,” शोंतू सांगतो. अलिकडे अनेक नवी स्वयं अर्थसहाय्यित बीएड महाविद्यालयं सुरू झाली होती. मात्र तिथे शिक्षकाची नोकरी मिळवायची तर जास्त गुण गरजेचे होते. तिथल्या अर्जदारांसमोर त्याचा काय निभाव लागणार? शिवाय या सगळ्या नोकऱ्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला होता. त्या सगळ्याने शोंतू फार व्यथित झाला.

कालांतराने त्याने ठरवलं की वेगळं काही करून पहावं. त्याने संगणक शिकायचं ठरवलं. सबरकांथा जिल्ह्यातल्या विजयनगरमधल्या पीजीडीसीए टेक्निकल कॉलेजमधून त्याने एक वर्षाच्या डिप्लोमासाठी अर्ज केला. त्याचं नाव गुणवत्ता यादीतही लागलं. पण फी भरण्यासाठी शोंतूकडे पैसेच नव्हते.

वडालीहून दोन किलोमीटरवर कोठीकंपामध्ये त्याची भेट चिंतन मेहतांशी झाली. ते कॉलेजच्या विश्वस्तांशी बोलले आणि शोंतूला मिळणाऱ्या स्कॉलरशिपमधून फी वळती करून घ्यायची विनंती केली. दुसऱ्या दिवशी शोंतू विजयनगरला गेला. पण कॉलेजच्या कारकुनाने सपशेल नकार दिला. “इथला सगळा कारभार आम्ही पाहतो, समजलं?” तो म्हणाला. प्रवेश मिळाल्यानंतरही सलग तीन दिवस फी न भरल्यामुळे त्याचं नाव गुणवत्ता यादीतून कमी करण्यात आलं.

पण तरीही शोंतूने आशा सोडली नव्हती. त्या कारकुनाकडूनच त्याला समजलं होतं की या कॉलेजने त्यांच्याकडच्या जागा वाढवून मिळाव्यात असा प्रस्ताव दिला आहे. त्या जागांना मान्यता मिळेपर्यंत वर्गात बसू देण्याची त्याने परवानगी मागितली. त्याला परवानगी मिळाली. प्रवेश नक्की झालेला नसतानाही वडाली ते विजयनगर असा पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला - आणि त्यासोबत रोजचा ५० रुपये तिकिटखर्चसुद्धा. खूपदा विनवण्या केल्यानंतर ऑफिसमधल्या कारकुनाने सार्वजनिक बसमध्ये सवलतीत पास मिळण्याच्या अर्जावर शिक्का दिला. या कोर्समध्ये आपला प्रवेश निश्चित होईल या आशेवर शोंतू दीड महिना वर्गांना जात राहिला. पण कॉलेजला जादा वर्गांची मान्यता मिळालीच नाही. ज्या दिवशी त्याला हे समजलं, त्याने वर्गांना जाणं थांबवलं.

पुन्हा एकदा शोंतूने शेतात मजुरी करायला सुरुवात केली. मोराद गावी एक महिना शेतात काम केल्यानंतर त्याने राजूभाईंबरोबर शिलाईकामाला सुरुवात केली. वडाली गावातल्या रेपडीमाँ मंदिराजवळच्या रस्त्याकडेला त्यांचं छोटंसं दुकान होतं. त्यानंतर पौर्णिमेच्या तीन दिवस आधी शोंतूला अचानक त्याचा दोस्त शशिकांत भेटला. “शांतीलाल, पीजीडीसीएच्या कोर्समध्ये काय शिकवतायत ते समजतच नाही म्हणून बऱ्याच मुलांनी तो कोर्स सोडलाय. आता विद्यार्थ्यांची संख्याच कमी झालीये. तुला कदाचित तिथे परत प्रवेश मिळू शकेल,” शशिकांत म्हणाला.

दुसऱ्याच दिवशी शोंतू परत एकदा विजयनगरला गेला आणि त्या क्लार्कला भेटला. त्याने फी भरायला लागेल असं सांगितलं. राजूभाईंसोबत काम करून कमावलेले १,००० रुपये शोंतूने भरले. “उरलेले २,५०० रुपये मी कसंही करून दिवाळीपर्यंत भरतो,” तो म्हणाला. त्याला प्रवेश मिळाला.

हे सगळं झाल्यानंतर पंधरा दिवसांतच पहिली चाचणी परीक्षा आली. शोंतू नापास झाला. कारण त्याला कसलाच सराव करता आला नव्हता. कोर्सला फार उशीरा प्रवेश घेतलायस, आता उगाच पैसे वाया घालवू नको असा शिक्षकांचा सल्ला होता. ती परीक्षा पास होणं अवघड आहे असंही ते म्हणाले. पण शोंतूने आशा सोडली नाही. वडालीचे हिमांशु भावसार आणि गजेंद्र सोलंकी तसंच इदरच्या शशिकांत परमार यांनी त्याचा बुडालेला अभ्यास भरून काढायला खूप मदत केली. पहिल्या सत्र परीक्षेमध्ये त्याला ५० टक्के गुण मिळाले. त्याच्या शिक्षकांचा तर विश्वासच बसत नव्हता.


PHOTO • Labani Jangi

शोंतू नापास झाला. कारण त्याला कसलाच सराव करता आला नव्हता. उगाच पैसे वाया घालवू नको असा शिक्षकांचा सल्ला होता. परीक्षा पास होणं अवघड आहे असंही ते म्हणाले. पण शोंतूने आशा सोडली नाही

दुसऱ्या सत्राचं शुल्क ९,३०० रुपये होते. आधीच्या सत्रातले ५,२०० धरून एकूण १४,५०० रुपये शुल्क भरायला लागणार होतं. त्याच्यासाठी एवढे पैसे भरणं अशक्य होतं. विनवण्या करून, कुणाकुणाच्या शिफारशींमुळे दुसऱ्या सत्राच्या अंतिम परीक्षेपर्यंत शोंतूला वेळ मिळाला. पण आता तर फी भरायलाच लागणार होती. तो हबकून गेला होता. यातून कसा मार्ग काढायचा हेच त्याला कळत नव्हतं. अखेर, एकच आशा होती. शिष्यवृत्तीची.

तो कारकुनाला जाऊन भेटला आणि त्याची शिष्यवृत्ती येईल तेव्हा त्यातून फी वळती करून घ्या अशी पुन्हा एकदा विनंती केली. एका अटीवर तो राजी झाला. शोंतूला देना बँकेच्या विजयनगर शाखेत खातं काढावं लागणार होतं. आणि त्या खात्याचा सही केलेला कोरा चेक तारण म्हणून ठेवायचा. पण नवीन खातं काढण्यासाठी लागणारे ५०० रुपये देखील शोंतूकडे नव्हते.

पण बँक ऑफ बडोदामध्ये त्याचं एक खातं होतं. पण त्यात फक्त ७०० रुपये होते. त्यामुळे बँकेने चेकबुक द्यायला नकार दिला. त्याने त्याच्या ओळखीच्या एकांना आपली कैफियत सांगितली. ते होते रमेशभाई सोलंकी. रमेशभाईंनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आपल्या खात्याचा सही केलेला एक कोरा चेक त्याला दिला. शोंतूने तो चेक कॉलेजमध्ये जमा केला, तेव्हा कुठे त्याला परीक्षा द्यायची परवानगी मिळाली.

उत्तर गुजरातच्या हेमचंद्राचार्य विद्यापीठाने घेतलेल्या या अंतिम परीक्षेत त्याला ५८ टक्के गुण मिळाले. पण गुणपत्रक मात्र त्याला शेवटपर्यंत मिळालं नाही.

शोंतूने एका नोकरीसाठी अर्ज केला. पत्र येण्याआधी आपलं गुणपत्रक येईल या आशेवर. पण ते काही आलंच नाही. शिष्यवृत्ती मंजूर होऊन, कॉलेजची फी वळती होत नाही तोपर्यंत गुणपत्रक देण्यात आलं नव्हतं. शोंतू मुलाखतीला गेलाच नाही कारण त्याच्याकडे आवश्यक असलेली गुणपत्रिकेची मूळ प्रतच नव्हती.

सबरकांथामधील इदरमध्ये नव्याने सुरू झालेल्या आयटीआय कॉलेजमध्ये तो महिना २,५०० पगारावर कामाला लागला. तिथेही महिन्याच्या आत गुणपत्रिका आणून देण्याची अट होतीच. महिना उलटला तरीही त्याच्या हातात गुणपत्रिका आलेली नव्हती. त्याने समाज कल्याण विभागात चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की शिष्यवृत्तीची रक्कम कॉलेजला कधीच पाठवून देण्यात आली होती. शोंतू विजयनगरला गेला आणि कारकुनाला भेटला. त्याने रक्कम आल्याचं मान्य केलं पण कॉलेजने मान्यता दिल्याशिवाय त्यातून फी वर्ग करता येणार नव्हती. आणि फी वळती झाल्याशिवाय त्याला गुणपत्रिका देता येत नव्हती.

रमेशभाईंनी दिलेला कोरा चेक परत करा असं शोंतूने सांगितल्यावर, “मिळेल तुला,” असं उडवाउडवीचं उत्तर देत परत इथे येऊ नको असं कारकुनाने त्याला सांगितलं. “फोन करून मला तुझा खाते क्रमांक सांग,” असंही तो म्हणाला. दिवाळी आणि नवीन वर्षाच्या मधल्या एका वारी शोंतूने त्याला फोन केला. “तुझं खातं कोणत्या बँकेत आहे?” त्याने विचारलं. “बरोडा बँकेत,” शोंतू म्हणला. “सगळ्यात आधी तुला देना बँकेत खातं काढावंं लागेल,” कारकुनाने सांगितलं.

अखेर, जून २०२१ मध्ये शोंतूला सर्व शिक्षा अभियानामध्ये काम मिळालंय सबरकांथा जिल्ह्यात बीआरसी भवन खेडब्रह्म मध्ये ११ महिन्यांच्या कंत्राटी पदावर. तो सध्या तिथे डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई असं काम करतोय. त्याला महिन्याला १०,५०० रुपये पगार मिळत आहे.

लेखकाच्या माटी या गुजराती लेखसंग्रहातील लेखनावर ही कहाणी आधारित आहे.

मूळ गुजरातीतून इंग्रजी अनुवादः सरवत फातेमा

Umesh Solanki

اُمیش سولنکی، احمد آباد میں مقیم فوٹوگرافر، دستاویزی فلم ساز اور مصنف ہیں۔ انہوں نے صحافت میں ماسٹرز کی ڈگری حاصل کی ہے، اور انہیں خانہ بدوش زندگی پسند ہے۔ ان کے تین شعری مجموعے، ایک منظوم ناول، ایک نثری ناول اور ایک تخلیقی غیرافسانوی مجموعہ منظرعام پر آ چکے ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Umesh Solanki
Illustration : Labani Jangi

لابنی جنگی مغربی بنگال کے ندیا ضلع سے ہیں اور سال ۲۰۲۰ سے پاری کی فیلو ہیں۔ وہ ایک ماہر پینٹر بھی ہیں، اور انہوں نے اس کی کوئی باقاعدہ تربیت نہیں حاصل کی ہے۔ وہ ’سنٹر فار اسٹڈیز اِن سوشل سائنسز‘، کولکاتا سے مزدوروں کی ہجرت کے ایشو پر پی ایچ ڈی لکھ رہی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Labani Jangi
Editor : Pratishtha Pandya

پرتشٹھا پانڈیہ، پاری میں بطور سینئر ایڈیٹر کام کرتی ہیں، اور پاری کے تخلیقی تحریر والے شعبہ کی سربراہ ہیں۔ وہ پاری بھاشا ٹیم کی رکن ہیں اور گجراتی میں اسٹوریز کا ترجمہ اور ایڈیٹنگ کرتی ہیں۔ پرتشٹھا گجراتی اور انگریزی زبان کی شاعرہ بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Pratishtha Pandya