कधी काळी तो या राजाचं दुसरं मन होता. त्याचा सवंगडी आणि सल्लागार. प्रेमाच्या, खाण्याचपिण्याच्या गप्पा चालत त्यांच्या. आणि तो दरबाराचा आत्मा होता. मग आता त्याच्या हातून असं काय पातक घडलं? आणि कधी? तुरुंगाच्या काळकोठडीत विदूषक राजाशी आपलं काय बिनसलं त्याचा धांडोळा घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. महामहिम राजेसाहेबांना नक्की काय खुपलं बरं? त्यांनी किमान काय ते सांगायला पाहिजे का नको? आता इतका दुरावा आला का? आपल्या नशिबाच्या या फेऱ्यावर त्याला हसू देखील येत नव्हतं.

पण देशाच्या राजधानीची हवा फार वेगात पालटलीये. प्लेटोचं रिपब्लिक असो, ओशनिया किंवा भारत, काही फरक पडत नाही. एकच गोष्ट चालते, ती म्हणजे राजाचं फर्मान. कुठेही, कुणीही आणि कसंही हसता कामा नये. प्रहसन, विडंबन, विनोद, हास्यचित्रं किंवा वात्रटिका आणि शाब्दिक चातुर्य असलेल्या कशालाही परवानगी नाही म्हणजे नाही.

काही मोजक्या देवांचा आणि देशप्रेमी नायकांचा उदोउदो करणाऱ्या महाकाव्यांना (हास्यपोलिसांनी तपासून प्रमाणित केलेल्या) आणि राज्याने प्रायजित केलेले इतिहास आणि खऱ्याखुऱ्या नेत्यांची आत्मचरित्रं तेवढी वाचली जावीत. मनाला उत्फुल्ल करणारं किंवा रोमांचित करणारं असं काहीही खपवून घेतलं जाणार नाही. हसणं हा मूर्खांचा खेळ आहे – न्यायालयं, संसदेची सभागृहं, नाट्यगृहं, पुस्तकं, टीव्ही, छायाचित्रं, अगदी मुलांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटता नये...

प्रतिष्ठा पंड्या यांच्या स्वरात ही कविता ऐका

कवितेचं शीर्षकः हसण्याच्या नावानं...

गावात अंधार दाटून येतो –
उधळलेला बैल जसा,
आई डॉक्टरांना फोन करते.
“कसल्या तरी वाइटाने, भयंकर
शक्तीने माझ्या बाळाला धरलंय.”
डॉक्टर दचकतात.
आकाशात गडगडतं.
“त्याचे ओठ उघडे आहेत, विलग,
गालाचे स्नायू  - वर गेलेत
आणि दात दिसतायत
पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याच्या कळ्यांसारखे.”

भीतीने डॉक्टरांची गाळण उडते.
“हास्य पोलिसांना सांगावा धाडा,” ते म्हणतात.
“राजाला खबर पाठवा,” ते म्हणतात.
खंगलेली, दुर्मुखलेली आई रडू लागते.
रडणार नाही तर काय.
रड, प्रिय माते, अश्रू ढाळ.
तुझ्या लेकालाही शाप मिळालाय
करणी झालीये त्याच्यावर.

परसात रात्र गहिरी झालीये
नक्षत्रांचे झालेत तारे –
आणि त्या ताऱ्यांचे होतायत विस्फोट.
महाकाय छातीचा हा राजा
दोन पलंगावर निद्रिस्त आहे.
“गावातलं एक मूल हसतंय,”
त्याला वार्ता सांगितली जाते.
आकाशात गडगडतं!
धरणी थरथरते!
राजा झोपेतून खाडकन जागा होतो.
कृपाळू आणि दिलदार.
“या माझ्या देशाला कुणाची नजर लागलीये?”
कृपाळू आणि दिलदार राजाला हुंदका फुटतो.
घास घ्यायला आसुसलेली त्याची तलवार तळपते.
या देशासाठी, देशाच्या भल्यासाठी – त्याला हे करायलायच हवं.
लहान असोत वा वृद्ध
कोणाच्याही चेहऱ्यावर उमटलेलं हसू
त्याला मारायलाच हवं.
कृपाळू आणि दिलदार राजा विचार करतो.

आईच्या एका डोळ्याला दिसते
तळपती तलवार
आणि दुसऱ्या, आपल्या बाळाचं हसू.
घाव घालणारे
परिचित आवाज
अस्फुट हुंदक्याचे
परिचित आवाज
‘राजा की जय हो’ चे
परिचित आवाज
तांबडं फुटतानाच हवेत भरून जातात.
आणि सूर्य उगवतो तोच मुळी बोळकं उघडून
गालाचे स्नायू वर गेलेले, दाताच्या पंक्ती पांढऱ्या शुभ्र.
तो हसतोय की काय?
हळूच पण ठाम
नाजूक पण जोरकस
त्याच्या चेहऱ्यावर तिला हसू तर दिसत नाहीये?

Illustrations: Labani Jangi

चित्रः लाबोनी जांगी

Poem and Text : Gokul G.K.

گوکل جی کیرالہ کے ترواننت پورم کے ایک آزاد صحافی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Gokul G.K.
Illustration : Labani Jangi

لابنی جنگی مغربی بنگال کے ندیا ضلع سے ہیں اور سال ۲۰۲۰ سے پاری کی فیلو ہیں۔ وہ ایک ماہر پینٹر بھی ہیں، اور انہوں نے اس کی کوئی باقاعدہ تربیت نہیں حاصل کی ہے۔ وہ ’سنٹر فار اسٹڈیز اِن سوشل سائنسز‘، کولکاتا سے مزدوروں کی ہجرت کے ایشو پر پی ایچ ڈی لکھ رہی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Labani Jangi
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے