"मुलगी आहे," डॉक्टर म्हणाल्या.

हे आशाचं चौथं मूल आहे – पण शेवटचं नक्कीच नाही. प्रसूतीतज्ज्ञ तिच्या आई कांताबेनचं सांत्वन करत असल्याचं तिच्या कानी पडलं: "आई, रडू नका. गरज पडल्यास मी आणखी आठ सिझेरियन करीन. पण ती मुलग्याला जन्म देईपर्यंत मी इथेच आहे. ती माझी जबाबदारी."

यापूर्वी आशाला तिन्ही मुली झाल्या होत्या, तिघींची प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रियेने झाली. अहमदाबाद शहराच्या मणीनगर भागातील एका खासगी दवाखान्यात डॉक्टर तिच्या गर्भलिंगनिदान चाचणीचा सांगत होत्या. (अशा चाचण्या बेकायदेशीर असल्या तरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.) चार वर्षांतील हे तिचं चौथं गरोदरपण. ती कांताबेनसोबत इथून ४० किमी लांब असलेल्या खानपर गावाहून आली होती. मायलेकी दोघीही अतोनात दुःखी होत्या. आशाचे सासरे तिला गर्भ पाडू देणार नाहीत हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. "आमच्या धर्मात तो गुन्हा आहे," कांताबेन म्हणाल्या.

थोडक्यात: हे काही आशाचं अखेरचं गरोदरपण नव्हतं.

आशा आणि कांताबेन भारवाड पशुपालक समाजाच्या आहेत. ते या सहसा शेळ्यामेंढ्या पाळतात. मात्र, त्यांच्यापैकी अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका तालुक्यात राहणारे बहुतांश लोक थोड्या फार गायी म्हशी पाळतात. खानपर या त्यांच्या गावात (२०११ जनगणनेनुसार) केवळ २७१ कुटुंबं असून १,५०० हून कमी लोक राहतात. पारंपरिक सामाजिक उतरंडीत हा समाज  पशुपालक जमातींमध्ये कनिष्ठ मानण्यात येतो आणि गुजरातमध्ये तो अनुसूचित जमात म्हणून नमूद आहे.

*****

कांताबेन डोक्यावरून साडीचा पदर खाली घेतात आणि खानपरमधल्या एका छोट्या खोलीत आत येतात. बोलायला नेहमीच कठीण असलेल्या एका विषयावर चर्चा करण्यासाठी आसपासच्या गावांमधून आणखी काही महिला इथे जमल्या आहेत – विषय अर्थातच त्यांचं प्रजनन आरोग्य.

'You don’t cry. I will do eight more caesareans if needed. But I am here till she delivers a boy'

'आई, रडू नका. गरज पडल्यास मी आणखी आठ सिझेरियन करीन. पण ती मुलाला जन्म देईपर्यंत मी इथेच आहे'

"या गावात छोटी मोठी अशी ८० ते ९० भारवाड कुटुंबं आहेत," कांताबेन सांगतात. "हरिजन [दलित], वागरी, काही ठाकोर समाजाची आणि काही कुंभारांची घरंही आहेत. पण बहुतेक सगळी कुटुंब भारवाडच." ठाकोर कोळी ही गुजरातमधली एक मोठी जात आहे – इतर राज्यांतील ठाकूर जातीशी हिचा काही संबंध नाही.

"आमच्यात मुलींचं लवकर लग्न होतं पण त्या १६ किंवा १८ वर्षांच्या होईस्तोवर माहेरीच राहतात अन् नंतर सासरी जातात," पन्नाशीत असलेल्या कांताबेन समजावून सांगतात. त्यांची मुलगी आशा हिचं लवकर लग्न झालं, तिला वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत तीन मुलं झालीत आणि आता चौथं मूल पोटात आहे. या समाजात बालविवाहाची पद्धत असून बहुतांश महिलांना त्यांचं वय, लग्नाचं वर्ष, किंवा पहिलं बाळंतपण झालं तेंव्हा त्यांचं वय काय होतं याची स्पष्ट कल्पना नाही.

"लग्न कधी झालं ते आठवत नाही, पण मी दर एका वर्षाआड गरोदर राहायची," कांताबेन म्हणतात. त्यांच्या आधार कार्डवरील तारीख त्यांच्या स्मरणशक्ती एवढीच भरवशाची आहे.

"मला नऊ मुली आहेत आणि हा दहावा – मुलगा," त्या दिवशी जमलेल्या महिलांपैकी एक हीराबेन भारवाड म्हणतात. "मुलगा आठवीत आहे. मुलींपैकी सहा जणींचं लग्न झालंय, दोघींचं व्हायचंय. त्यांची जोडीनं लग्न लावलीत." या तालुक्यातील खानपर आणि इतर गावांमधील समाजात लागोपाठची बाळंतपणं काही वावगी नाहीत. "आमच्या गावी एकीला तर १३ वेळा गर्भ पडल्यानंतर मुलगा झाला," हीराबेन म्हणतात. "वेडेपणा आहे सगळा. इथले लोक मुलगा होईस्तोवर पाहिजे तितक्या वेळा बाळंतपण होऊ देतात. त्यांना काहीच कळत नाही. त्यांना मुलगा हवा फक्त. माझ्या सासूला [तोवर] आठ मुलं झालीत. काकूला तर १६ होती. आता बोला?"

"सासरच्यांना मुलगाच हवा," रमिला भारवाड म्हणतात. "अन् आपण जर त्यासाठी प्रयत्न केले नाही, तर सासू-नणंदेपासून शेजाऱ्यांपर्यंत सगळे जण टोमणे मारतात. अशात मुलांना वाढवणं काही सोपी नाही. माझा मोठा मुलगा दोनदा १०वी नापास झालाय अन् आता तिसऱ्यांदा पुन्हा परीक्षेला बसतोय. मुलं वाढवणं म्हणजे काय ते फक्त आम्हा बायांनाच कळतं. पण आम्ही करणार तरी काय?"

कुटुंबात मुलाला इतकं प्राधान्य असल्यामुळे महिलांकडे प्रजनन अधिकार नावापुरतेच उरतात. " देवच आम्हाला मुलगा होण्यासाठी वाट पाहायला लावत असेल तर काय करणार?" रमिला विचारतात. "मलाही मुलगा होण्याआधी तीन मुली झाल्या.  अगोदर आम्ही मुलगा होईस्तोवर वाट पाहायचो, पण आता गोष्टी जरा बदलल्या असतील."

"कसला बदल? मला नाही का चार मुली झाल्या?" रेखाबेन चिडून म्हणते. ती शेजारच्या १,५१२ लोकांची वस्ती असलेल्या लाना गावची आहे. अहमदाबादहून ५० किमी परिघाच्या आत असलेल्या तालुक्यातल्या खानपर, लाना आणि अंबलीयारा गावाच्या विविध वस्त्यांमधून या महिला इथे आल्या आहेत. आणि आता त्या केवळ माझ्याशीच नाही, तर एकमेकींशीही संवाद साधू लागल्यात. परिस्थिती बदलली असेल हे रमिला यांचं म्हणणं रेखाबेन खोडून काढते. "मी सुद्धा फक्त मुलगा जन्मण्याची वाट पाहत राहिले, नाही का?" ती विचारते. "आम्ही भारवाड आहोत, आम्हाला मुलगा तर व्हायलाच हवा. फक्त मुली झाल्या तर ते आम्हाला वांझ म्हणतात."

'The in-laws want a boy. And if you don’t go for it, everyone from your mother-in-law to your sister-in-law to your neighbours will taunt you'

सासरच्यांना मुलगाच हवा, अन् आपण जर त्यासाठी प्रयत्न केले नाही, तर सासू-नणंदेपासून शेजाऱ्यांपर्यंत सगळे जण टोमणे मारतात

रमिलाबेन हिने आपल्या समाजाच्या महिलांकडून असलेल्या अपेक्षांवर कडाडून टीका केली, तरीही सामाजिक दबाव आणि सांस्कृतिक परंपरेच्या पगड्यामुळे बहुतांश महिला स्वतःच 'मुलाला प्राधान्य' बहाल करतात. २०१५ मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ हेल्थ सायन्सेस अँड रिसर्च यात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार अहमदाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील जवळपास ८४ टक्के महिलांनी त्यांना मुलगा हवा असल्याचं कबूल केलंय. महिलांमध्ये अशा प्राधान्यामागची कारणं देताना या शोधनिबंधात लिहिलं होतं की: "पुरुषांची कमावण्याची क्षमता जास्त असते, खास करून कृषी अर्थव्यवस्थेत. ते वंश पुढे नेतात आणि बहुतेकदा त्यांनाच वारसा हक्क मिळतो."

दुसरीकडे या शोधनिबंधात लिहिलंय की मुलींना आर्थिक ओझं मानण्याची कारणं पुढीलप्रमाणे: "हुंडा प्रथा, लग्नानंतर त्या नवऱ्याच्या कुटुंबाचा हिस्सा होतात, आणि [त्यामुळे] आई-वडलांची आजारपणी व म्हातारपणी जबाबदारी घेऊ शकत नाहीत."

*****

३,५६७ लोकांची वस्ती असलेल्या जवळच्या अंबलियारा गावच्या जीलूबेन भारवाड, वय ३०, हिची काही वर्षांपूर्वी ढोलका तालुक्यातील कोठ (उर्फ कोठा) गावाजवळील एका शासकीय रुग्णालयात नसबंदी करण्यात आली. पण या नसबंदी शस्त्रक्रियेअगोदर तिला चार मुलं झालीत. "मला दोन मुलं होईस्तोवर वाट पाहावी लागली," ती म्हणते. "माझं लग्न झालं तेव्हा मी ७ किंवा ८ वर्षांची असेन. मग मी वयात आल्यावर त्यांनी मला सासरी पाठवलं. तेव्हा मी १९ वर्षांची असेन. मी लग्नातले कपडेसुद्धा बदलले नसतील अन् मला दिवस गेले होते. त्यानंतर दर एका वर्षाआड हे सुरूच राहिलं."

गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्या की तांबी बसवून घ्यावी या बाबतीत तिला संभ्रम होता. "मला तेव्हा इतकी माहिती नव्हती. माहिती असती तर कदाचित इतकी मुलं होऊ दिली नसती," ती विचारपूर्वक म्हणते. "पण आम्हा भारवाड लोकांमध्ये माताजी (मेलाडी मा, एक लोकदैवत) जे दान पदरात टाकेल ते स्वीकारावं लागतं. मी आणखी एक मूल जन्माला घातलं नसतं तर लोकांची कुजबुज सुरु झाली असती. त्यांना वाटलं असतं की माझ्या मनात कोणी दुसरा पुरुष आहे. ते कसं सहन करायचं?"

जीलूबेनला पहिल्यांदा मुलगाच झाला, पण घरच्यांनी तिला आणखी एक मुलगा जन्माला घालण्याची गळ घातली – आणि दुसऱ्या मुलाची वाट पाहता पाहता तिला सलग दोन मुली झाल्या. पैकी एक मूकबधिर आहे. "आम्हा भारवाड लोकांमध्ये दोन मुलगे व्हायलाच हवेत. आजकाल काही बायांना वाटतं एक मुलगा अन् एक मुलगी पुष्कळ झाले, पण आम्ही तरीही माताजीच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो," ती म्हणते.

Multiple pregnancies are common in the community in Khanpar village: 'There was a woman here who had one son after 13 miscarriages. It's madness'.
PHOTO • Pratishtha Pandya

खानपर गावातील या समाजात वारंवार बाळंतपणं नेहमीची आहेत: 'आमच्या गावी एकीला तर १३ वेळा गर्भ पडून गेल्यावर मुलगा झाला. वेडेपणा आहे सगळा '

तिचा दुसरा मुलगा झाल्यावर मात्र एका महिलेच्या सांगण्यावरून जीलूबेनने अखेर कोठमध्ये आपल्या जावेसोबत जाऊन नसबंदी करण्याचं ठरवलं. त्या महिलेला बाकी पर्याय माहित होते. "माझ्या नवऱ्याने पण मला ते करून घ्यायला सांगितलं," ती म्हणते. "त्याला पण आपण किती पैसा कमावून घरी देऊ शकतो हे [याची मर्यादा] माहीत होतं. आमच्याकडे तर हुशारीचं कामही नाही. आम्ही फक्त या गाई-गुरांची देखभाल करतो."

ढोलका तालुक्यातील हा समाज सौराष्ट्र किंवा कच्छ येथील भारवाड पशुपालकांपेक्षा वेगळा आहे. त्यांच्याकडे शेळ्यामेंढ्यांचे मोठाले कळप असले तरी ढोलका तालुक्यातील भारवाड बहुधा थोड्याफार गायी-म्हशी सांभाळतात. "प्रत्येक घरात २-४ जनावरंच आहेत," अंबलीयाराची जयाबेन भारवाड म्हणते. "त्यातून आमच्या घराचं जेमतेमच भागतं. यातून काहीच पैसा मिळत नाही. आम्ही त्यांचं चारापाणी बघतो. धानाच्या मोसमात लोक कधी कधी आम्हाला धान देतात – नाहीतर आम्हाला तेही विकत घ्यावं लागतं."

"या भागातील पुरुष अकुशल कामगार म्हणून वाहतूक, बांधकाम आणि शेती यांसारख्या विविध क्षेत्रांत काम करतात," भावना रबारी म्हणतात. त्या गुजरातमधील भारवाडांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या अहमदाबाद स्थित मालधारी संगठनच्या अध्यक्षा आहेत. "कामाच्या उपलब्धतेनुसार त्यांची दिवसाला २५० ते ३०० कमाई होते."

For Bhawrad women of Dholka, a tubectomy means opposing patriarchal social norms and overcoming their own fears

ढोलकाच्या भारवाड महिलांसाठी नसबंदी म्हणजे पुरुषप्रधान सामाजिक रूढींचा विरोध आणि स्वतःच्या भीतीवर मात करणं याचं प्रतीक आहे

जयाबेनही सांगते की पुरुष "बाहेर पडून मजुरी करतात. माझा नवरा सिमेंटची वाहून नेतो अन् २००-२५० रुपये कमावतो." आणि सुदैवाने जवळच एक सिमेंट कारखाना आहे जिथे त्याला बऱ्यापैकी काम मिळतं. तिच्या कुटुंबाकडे येथील बऱ्याच कुटुंबांप्रमाणे बीपीएल (दारिद्र्य रेषेखालील) राशन कार्डही नाही.

जयाबेनला गर्भनिरोधक गोळ्या आणि तांबीपैकी काहीही वापरण्याची भीती वाटतीये – दोन मुलं आणि एक मुलगी होऊनसुद्धा. तिला कायमची शस्त्रक्रिया करणं देखील मान्य नाही. "माझी सगळी बाळंतपणं घरीच झालीत. ते जी काही उपकरणं वापरतात त्यांची मला खूप भीती वाटते. मी एका ठाकोरच्या बायकोचे ऑपरेशननंतर हाल झालेले पाहिले आहेत."

"म्हणून मी ठरवलं की आमच्या मेलाडी माला साकडं घालावं. तिच्या परवानगीशिवाय मी ऑपरेशन करूच शकत नाही. माताजी का म्हणून मला एका वाढत्या रोपाला तोडू देईल? पण आजकाल महागाई इतकी वाढलीय. म्हणून मी माताजीला सांगितलं की मला झाली तेवढी मुलं पुरे, पण मला ऑपरेशनची भीती वाटते. मी तिला नवस केलाय. दहा वर्षं माताजीने माझी काळजी घेतलीय. मला एकही औषध घ्यावं लागलं नाही."

*****

तिच्या नवऱ्याला नसबंदी करून घेता येईल या कल्पनेने जयाबेन आणि जमलेल्या घोळक्यातील इतर सगळ्याच महिला चकित झाल्या होत्या.

देशभर पुरूष नसबंदीबद्दल किती टाळाटाळ आहे ते त्यांच्या प्रतिक्रियेतून परावर्तित होतं. राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या एका अहवालानुसार २०१७-१८ मध्ये भारतभरात "एकूण १४,७३,४१८ नसबंदी शस्त्रक्रियांपैकी केवळ ६.८% शस्त्रक्रिया पुरुषांच्या होत्या आणि तब्बल ९३.१% महिलांच्या."

आजच्या तुलनेत ५० वर्षांपूर्वी पुरुष नसबंदींचा स्वीकार जास्त होता. पण १९७०च्या उत्तरार्धात, खासकरून १९७५-७७च्या आणीबाणीदरम्यान करण्यात आलेल्या सक्तीच्या नसबंदीनंतर हे प्रमाण प्रचंड ढासळलं. १९७० मध्ये ७४.२ टक्क्यांवर असलेलं हे प्रमाण १९९२ मध्ये थेट ४.२ टक्क्यांवर घसरलं, असं बुलेटिन ऑफ द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका शोधनिबंधात म्हटलंय.

कुटुंब नियोजन ही अजूनही पुष्कळशी महिलांचीच जबाबदारी मानण्यात येते

या गटात जीलूबेन ही नसबंदी केलेली एकमेव महिला होती. ती सांगते की ती शस्त्रक्रिया करण्याआधी "माझ्या नवऱ्याला काही वापरायला सांगण्याचा प्रश्नच नव्हता. त्याला ऑपरेशन करून घेता येईल हेसुद्धा मला माहीत नव्हतं. असंही, आम्ही असल्या विषयावर कधीच बोलायचो नाही." मात्र, काही वेळा तिचा नवरा ढोलकाहून स्वतःहून तिला आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या घेऊन यायचा, असं ती सांगते, "रू. ५०० ला तीन गोळ्या." ही गोष्ट आहे तिच्या नसबंदीच्या काही वर्षांआधीची.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणीच्या गुजरात राज्याच्या २०१५-१६ च्या माहिती पत्रकानुसार ग्रामीण गुजरातमध्ये कुटुंब नियोजनाच्या एकूण पद्धतींपैकी पुरुष नसबंदीचं प्रमाण केवळ ०.२ टक्के होतं. महिला नसबंदी, तांबी आणि गोळ्या इत्यादी सगळ्या पद्धतींचा भार महिला सहन करत होत्या.

ढोलकाच्या भारवाड महिलांसाठी नसबंदी म्हणजे पुरुषप्रधान सामाजिक रूढींचा विरोध आणि स्वतःच्या भीतीवर मात याचं प्रतीक आहे.

The Community Health Centre, Dholka: poor infrastructure and a shortage of skilled staff add to the problem
PHOTO • Pratishtha Pandya

सामूहिक आरोग्य केंद्र, ढोलका: अपुऱ्या सुविधा आणि कुशल कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे स मस्येत भर पडत जाते

"आशा कर्मचारी आम्हाला सरकारी दवाखान्यात घेऊन जातात," विशीत असलेली कनकबेन भारवाड, कांताबेनची सून, म्हणते. "पण आम्हा सगळ्यांना भीती वाटते." तिच्या कानावर आलंय की "एका ऑपरेशन दरम्यान एक बाई जागच्या जागीच मरण पावली. डॉक्टरने चुकून चुकीची नस कापली अन् ती त्याच ऑपरेशन टेबलवर मरण पावली. अजून वर्षही झालं नसेल या गोष्टीला."

पण ढोलका तालुक्यात बाळंतपणही तितकंच जोखमीचं आहे. शासकीय सामूहिक आरोग्य केंद्रातील (सीएचसी) एक सल्लागार डॉक्टर म्हणतात की निरक्षरता आणि दारिद्र्य ही एका पाठोपाठ, कमी अंतराने होणाऱ्या बाळंतपणांना कारणीभूत आहेत. आणि "कोणीच नियमित तपासणीला येत नाही" ते म्हणतात. केंद्रात येणाऱ्या बहुतांश महिलांना कुपोषित असतात, त्यांना रक्तक्षय असतो. "इथे येणाऱ्या जवळपास ९०% महिलांमध्ये हिमोग्लोबिन ८ टक्क्यांहून कमी असतं," असा अंदाज ते वर्तवतात.

सामूहिक आरोग्य केंद्रात अपुऱ्या सुविधा आणि कुशल कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे ही समस्येत आणखी भर पडते. सोनोग्राफी यंत्रं नाहीत, आणि बरेचदा गरजेच्या वेळी पूर्ण वेळ स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा भूलतज्ज्ञ उपलब्ध नसतात. ढोलका येथील सर्व सहा पीएचसी (प्राथमिक आरोग्य केंद्र), एक सामुदायिक आरोग्य केंद्र आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये एकच भूलतज्ज्ञ आहे आणि रुग्ण त्याला वेगळे पैसे देतात.

तिथे खानपार गावातील त्या खोलीत महिलांचं स्वतःच्या शरीरावर नियंत्रण नाही यावर सुरू असलेल्या संभाषणात एक संतप्त स्वर उमटतो. कडेवर एक वर्षांचं मूल घेतलेली एक तरुण आई चिडून विचारते: "कोण ठरवणार म्हणजे? मीच ठरवणार. हे माझं शरीर आहे; तेंव्हा कोणा परक्याने का म्हणून ठरवावं? मला माहित्येय की मला आणखी एक मूल नकोय. अन् मला गोळ्या पण घ्यायच्या नाहीयेत. अन् समजा मला पुन्हा एकदा गर्भ राहिलाच मी माझा मार्ग शोधीन. सरकारकडे आमच्यासाठी औषधं आहेतच, नाही का? मी ती औषधं [गर्भनिरोधक इंजेक्शन] घेईन. ते मीच ठरवणार."

असा स्वर दुर्मिळच. तरीही, रमिला भारवाड सुरुवातीला म्हणाल्या तसं: "आता गोष्टी जरा बदलल्या असतील." जराशाच.

गोपनीयतेच्या कारणास्तव या कहाणीतील सर्व महिलांची नावं बदलली आहेत.

पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवाद: कौशल काळू

Pratishtha Pandya

پرتشٹھا پانڈیہ، پاری میں بطور سینئر ایڈیٹر کام کرتی ہیں، اور پاری کے تخلیقی تحریر والے شعبہ کی سربراہ ہیں۔ وہ پاری بھاشا ٹیم کی رکن ہیں اور گجراتی میں اسٹوریز کا ترجمہ اور ایڈیٹنگ کرتی ہیں۔ پرتشٹھا گجراتی اور انگریزی زبان کی شاعرہ بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Pratishtha Pandya
Illustrations : Antara Raman

انترا رمن سماجی عمل اور اساطیری خیال آرائی میں دلچسپی رکھنے والی ایک خاکہ نگار اور ویب سائٹ ڈیزائنر ہیں۔ انہوں نے سرشٹی انسٹی ٹیوٹ آف آرٹ، ڈیزائن اینڈ ٹکنالوجی، بنگلورو سے گریجویشن کیا ہے اور ان کا ماننا ہے کہ کہانی اور خاکہ نگاری ایک دوسرے سے مربوط ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Antara Raman

پی سائی ناتھ ’پیپلز آرکائیو آف رورل انڈیا‘ کے بانی ایڈیٹر ہیں۔ وہ کئی دہائیوں تک دیہی ہندوستان کے رپورٹر رہے اور Everybody Loves a Good Drought اور The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom کے مصنف ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پی۔ سائی ناتھ
Series Editor : Sharmila Joshi

شرمیلا جوشی پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی سابق ایڈیٹوریل چیف ہیں، ساتھ ہی وہ ایک قلم کار، محقق اور عارضی ٹیچر بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز شرمیلا جوشی
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

کے ذریعہ دیگر اسٹوریز کوشل کالو