इराप्पा बावगेला मार्च २०१९ मध्ये बेंगळुरूत प्रोजेक्ट मॅनेजरचं काम मिळालं. एका वर्षांनंतर टाळेबंदीमुळे ते काम हातचं जाईल याची त्याला तीळमात्रही कल्पना नव्हती. आणि जून २०२० पासून कर्नाटकाच्या ईशान्येकडच्या बिदर जिल्ह्यातील आपल्या कामठना या गावात मनरेगावर काम करावं लागेल, असंही कधीच वाटलं नव्हतं.
"घरी रिकामा बसून महिना गेल्यावर शेवटी मी काही तरी कमावून आपलं घर चालवावं म्हणून एप्रिलमध्ये मनरेगाची प्रक्रिया समजून घ्यायचा प्रयत्न केला," तो सांगतो. "लॉकडाऊन लागलं तेव्हा आमच्याकडे जेमतेम पैसा होता. शेतमालक मजुरांना बोलवत नव्हते म्हणून माझ्या आईला पण काम मिळणं कठीण जात होतं."
ही नोकरी मोठ्या कष्टाने आणि घरच्यांच्या पाठिंब्याने त्याच्या वाट्याला आली होती. कर्ज वाढत होतं आणि शिकून निर्धाराने आर्थिक ओढाताणीच्या चक्रातून बाहेर पडण्याचा कुटुंबासमोरचा मार्ग होता. टाळेबंदी लागली आणि त्याला ही नोकरी गमवावी लागली.
इराप्पाने बिदरमधील एका खासगी कॉलेजमधून ऑगस्ट २०१७ मध्ये बीटेकची पदवी मिळवली, आणि त्याआधी २०१३ मध्ये एका शासकीय पॉलिटेक्निकमधून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. पदवीचं शिक्षण घेण्यापूर्वी आठ महिने तो कृषी यंत्रे तयार करणाऱ्या पुण्यातल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत टेक्निकल ट्रेनी म्हणून कामाला होता. त्याचे त्याला दरमहा रू. १२,००० मिळत होते. "मी चांगला विद्यार्थी होतो म्हणून मला वाटलं मी मोठ्या जबाबदाऱ्या घेऊन जास्त पैसा कमवीन. मला वाटलं होतं की एक दिवस लोक मलाही इंजिनियर म्हणून ओळखतील," २७-वर्षीय इराप्पा म्हणतो.
कुटुंबाने त्याच्या शिक्षणासाठी अनेक कर्जं काढली. "[बीटेकच्या] तीन वर्षासाठी मिळून मला जवळपास रू. १.५ लाख लागले," तो म्हणतो. "आईबाबा गावातल्या बचत गटाकडून कधी रू. २०,००० घ्यायचे, तर कधी रू. ३०,०००." डिसेंबर २०१५ मध्ये तो पाचव्या सत्रात असताना त्याचे वडील कावीळ होऊन ४८ व्या वर्षी मरण पावले. ते मजुरी करायचे. त्यांच्या आजारपणासाठी या कुटुंबाने बचत गटातून आणि नातेवाइकांकडून रू. १.५ लाख उसने घेतले होते. "मी आपली डिग्री घेईपर्यंत माझ्या खांद्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या येऊन पडल्या होत्या," इराप्पा म्हणतो.
आणि म्हणूनच त्याला बेंगळुरूत प्लास्टिक मोल्डींग मशीन तयार करणाऱ्या एका लघुउद्योगात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून रू. २०,००० पगाराची नोकरी मिळाली, तेव्हा त्याचं कुटुंब आनंदात होतं. ही झाली मार्च २०१९ ची गोष्ट. "मी माझ्या आईला दरमहा रू. ८,०००- रू. १०,००० पाठवत होतो. पण लॉकडाऊन लागलं आणि सगळं बदललं," तो म्हणतो.










