“आम्ही दर वर्षी उन्हाळ्यात एक महिना इथे पैसे कमवण्यासाठी इथे येतो,” शांती सांगते, बोलता बोलता ती तिची ओढणी कपाळापाशी घेते आणि तिच्या नऊ वर्षांच्या नातवाला, अमरजीतला रावणहाथा वाजवायचं थांबू नको असं म्हणतात कोपराने हलकेच ढुसणी देते. “बजाओ, बजाओ,” ती त्याला सांगते. तो जरासा नाखुशीतच तारांवर बो फिरवतो.
पर्वतरांगा पहायला जात असताना आम्हाला शांती आणि अमरजीत (शीर्षक फोटो पहा) भेटले. धरमशालाच्या वरच्या दिशेला मॅकलॉइडगंजपासून तीन किलोमीटरवरच्या नड्डी गावी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका चौथऱ्यावर ते बसलेले होते.
शांतीने जरासं ओशाळून आम्हाला सांगितलं, “या पोराचा [अमरजीतचा] आजा रावणहाथा फार छान वाजवतो, पण आज त्यांना बरं नाही म्हणून ते आले नाहीत. आम्ही कायम हे वाद्य वाजवत आणि गाणी गात आलोय. पण माझ्या नातवाला काही ते [रावणहाथा वाजवायला] आवडत नाही. आजकाल सगळे म्हणतात पोरांनी शिकायला पाहिजे. म्हणून तो [आमच्या गावी] शाळेत जातो.”
तू कितवीत आहेस, मी अमरजीतला विचारलं. “चौथीत,” त्याने हसून उत्तर दिलं.
रावणहाथा याचा शब्दशः अर्थ आहे, रावणाचा हात. हे दोनतारी वाद्य आहे. त्याच्या एका टोकाला नारळाची करवंटी आणि बकऱ्याच्या कातड्याने बनवलेला लहानसा भोपळा असतो. वादक वाद्याचा भोपळा पोटाशी धरतो आणि त्याला जोडलेला बांबू समोर हवेत ठेवतो. या बांबूला एक धातूची आणि एक प्राण्याच्या केसापासून तयार केलेली तार असते. या तारांवरून बो फिरवला की त्यातून सूर निघतात.



