दर वर्षी जुलैच्या महिन्यात महाराष्ट्रात लाखो वारकरी पुणे जिल्ह्यातल्या देहू आळंदीहून सोलापूरच्या पंढरपूरला असणाऱ्या आपल्या लाडक्या विठोबा आणि रखुमाईला भेटण्यासाठी पायी निघतात. शेकडो वर्षांपूर्वीच्या पशुपालकांच्या पायवाटांवरून, गेल्या ८०० हून अधिक वर्षांपासून ही पायी वारी चालू आहे, अव्याहत.
देहू ही संत तुकारामांची जन्मभूमी आणि आळंदी, संत ज्ञानेश्वरांचं समाधी स्थान. समानतेचा पुरस्कार करणाऱ्या भक्ती पंथाचे हे मोठे संत. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या देहू-आळंदीला पोचतात आणि मग तिथनं हा दोन आठवड्याचा प्रवास सुरू होतो. प्रत्येक गावच्या बाया-पुरुषांची एक दिंडी असते, काही दिंड्या पुण्यापर्यंत येतात तर काही पुण्यातून निघतात. बाकी आपापल्या गावाहून आषाढी एकादशीला पंढरीला पोचण्यासाठी निघतात.
सगळ्या वयाचे, जातीचे, पंथाचे आणि पिढ्यांचे लोक वारीला जातात. आणि वारीसाठी प्रत्येक जण माउली असतो, ज्ञानोबांचे अनुयायी त्यांना याच नावाने संबोधतात. पुरुषांच्या अंगावरचे सदरे म्हणजे पांढऱ्या रंगाच्या विविध छटा आणि स्त्रियांची लुगडी, पांढरा सोडून सगळ्या रंगाची.
पहाटे तीनच्या सुमारास पुण्यात मुक्कामी असलेल्या दिंड्या ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या गजरात मार्गस्थ होतात. वाटेत वारकऱ्यांच्या तोंडून अभंग, ओव्या, गवळणी ऐकायला मिळतात. टाळ-मृदंगाचा आवाज सर्वत्र निनादत असतो.
चार वर्षांपूर्वी पुणे ते दिवे घाट हे २० किलोमीटरचं अंतर मी या वारीसोबत चालले. वयस्क, तरुण अशा अनेक वारकऱ्यांशी गप्पा मारल्या – हास्यविनोदाबरोबर येऊ घातलेल्या दुष्काळाबद्दल चिंता व्यक्त झाल्या (२०१४ साली महाराष्ट्राच्या बहुतेक भागात दुष्काळ पडला होता). “आता भगवंताला आमची दया आली तरच पाऊस पाडील तो,” उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या पानगावच्या एक मावशी म्हणत होत्या.
वारीतले ते चार तास हास्यांनी, गाण्यांनी आणि एकमेकांबद्दलच्या जिव्हाळ्याने ओथंबलेले होते. असं असलं तरी पायात तुटक्या चपला घालून वारी करणारी अनेक म्हातारे बायाबापडेही होतेच. पुढचे दोन आठवडे वारीच त्यांना खाऊ घालणार होती, त्यांची काळजी घेणार होती. ज्या ज्या गावातून, वस्तीतून वारी पुढे जात होती तिथे वारकऱ्यांना केळी, फळं, चहा बिस्किटं वाटून तिथले लोक आपली माया आणि ऋण व्यक्त करत होते.