तमिळनाडूच्या कोटगिरी पंचायतीतल्या वेलरीकोम्बई गावात आर कृष्णा भलतेच लोकप्रिय आहेत. पारंपरिक कुरुंबा शैलीच्या चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे त्यांना तिकडे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. ही शैली भौमितिक आकारांचा वापर करते, अगदी कमी बारकावे वापरते आणि या चित्रांचे विषय म्हणजे सुगीचे उत्सव, सण, रिवाज, विधी, मध गोळा करण्यासाठीच्या सफरी आणि नीलगिरीतल्या आदिवासींच्या अशाच काही इतर प्रथा.
आमची त्यांची भेट नीलगिरीच्या घनदाट जंगलात झाली. तेही व्हर्डंट चहाचे मळे आणि फणसांनी लगडलेले, अगदी धोकादायक बनलेले वृक्ष मागे टाकून दोन एक तासाची चढण चढून गेल्यावर. या दूरवरच्या पर्वतराजीमधली आमची सफर चालू असताना, एक अगदी आकड्यासारखं वळण घेऊन मी आणि माझे दोन साथीदार अचानक एका मोकळ्या, स्वच्छ प्रकाशी भागात येऊन पोचलो. आणि अगदी थेट कृष्णांच्या पुढ्यात थडकलो.
वेलरीकोम्बई या आर कृष्णांच्या गावी जाताना लागणारे व्हर्डंट चहाचे मळे
आमच्या या अशा आगंतुक आगमनाबद्दल कसलीही अढी न ठेवता त्यांनी अगदी आनंदाने तिथेच बैठक मारली आणि त्यांची पोतडी आमच्यासमोर खुली करायला सुरुवात केली. त्यांच्या विटलेल्या पिवळ्या पिशवीत कप्प्या-कप्प्यांचं एक केशरी फोल्डर होतं. आणि त्यामध्ये डझनावारी कात्रणं, फोटो आणि त्यांच्या चित्रांच्या काही प्रती होत्या. ही पोतडी कायम त्यांच्यासोबत असते. न जाणो कोणाशी कधी अशी अचानक भेट घडेल.
“एकदा, खुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनाच माझी चित्रं आवडली आणि त्यांनी ती खरेदीदेखील केली,” ४१ वर्षांचे कृष्णा बडागा भाषेत आम्हाला सांगत होते. त्यांच्या कारकिर्दीतला हा आतापर्यंतचा सर्वात अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं.
आदिवासी चित्रकारांच्या दीर्घ परंपरेतले कृष्णा काही अखेरच्या कलाकारांपैकी एक आहेत. अनेक कुरुंबा आदिवासींची अशी श्रद्धा आहे की एलुथुपारईमधली कडेकपारींवरची चित्रं ही त्यांच्याच पूर्वजांनी चितारलेली आहेत. वेलरीकोम्बईपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेलं हे पुरातन स्थळ ३००० वर्षांपूर्वीचं असल्याचं मानलं जातं. “पूर्वी आम्ही एलुथुपारईजवळ अगदी जंगलाच्या आत राहत असू,” कृष्णा सांगतात. “अशी चित्रं केवळ कुरुंबाच काढतात.”
कृष्णांचे आजोबाही विख्यात चित्रकार होते. त्यांच्या भागातली अनेक मंदिरं त्यांनी त्यांच्या चित्रांनी सजवली आहेत. कृष्णा पाचे वर्षांचे असल्यापासून त्यांच्याकडेच चित्रकला शिकू लागले. आजही ते त्यांच्या आजोबांचाच वारसा पुढे चालवत आहेत. फक्त त्यात काही बदल झाले आहेतः त्यांचे पूर्वज कातळावर काड्यांनी चित्रं काढायचे. कृष्णा कुंचल्याचा आणि कॅनव्हास किंवा हातकागदाचा वापर करताहेत. पण रंग मात्र जैविक आणि घरी बनवलेलेच. आमच्या दुभाषाने सांगितल्याप्रमाणे हे रंग रासायनिक रंगांपेक्षा जास्त उठावदार आणि टिकाऊ असतात.
डावीकडेः चित्र काढत असताना कृष्णांचा फोटो. उजवीकडेः त्यांचं पूर्ण झालेलं चित्र
कृष्णांचं ८x१० आकाराचं मूळ चित्र कोटागिरीतल्या लास्ट फॉरेस्ट इंटरप्राइजेसच्या दुकानात सुमारे ३०० रुपयांना विकलं जातं. ही संस्था मध तसंच स्थानिक पातळीवर तयार होणारी उत्पादनं विकते. साधारणपणे एका दिवसात कृष्णांची दोन चित्रं काढून होतात आणि आठवड्याला ते अंदाजे ५ ते १० चित्रं विकतात. ते भेटकार्डं आणि बुकमार्कदेखील तयार करतात. घरांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये भिंतींवर कुरुंबा शैलीत चित्रं काढण्यासाठी देखील त्यांना बरीच निमंत्रणं येत असतात. एकूणात काय तर कृष्णा त्यांच्या कलाकारीच्या जोरावर महिन्याला १०,००० ते १५,००० रुपयांची कमाई करतात.
यालाच हातभार म्हणून ते मध गोळा करण्याच्या सफरींनाही जातात. एका हंगामात याचेही त्यांना १५०० ते २००० रुपये मिळतात. यामध्ये जमिनीपासून किती तरी फूट वर हवेत तरंगत कडे कपारीत असणाऱ्या पोळ्यांमधल्या माशांना धूर करून हाकललं जातं आणि मग त्यातला सोनेरी मध गोळा केला जातो. दुर्मिळ असला तरी यात जीव जाण्याचा धोका असतोच. अशा सफरींमध्ये काय अघटित घडू शकतं याची कटू आठवण म्हणजे एकदा याच कड्यांच्या अगदी सरळ रेषेत आम्ही आमचा तळ ठोकला होता. आणि आमच्या अगदी नजरेसमोर एक जण थेट खाली कोसळला आणि दगावला. आपल्या साथीदाराचा मान राखण्यासाठी तेव्हापासून त्या ठिकाणी कुणीही जात नाही. नशीबाने कृष्णांचं आतापर्यंत नाकावर मधमाशीने केलेल्या डंखावरच निभावलं आहे.
नेक वर्षांपूर्वी एक कुरुंबा आदिवासी खाली पडून दगावला तो कडा
निरोप घेण्याआधी कृष्णांनी वेलरीकोम्बईत त्यांच्या घरी कसं पोचायचं ते आम्हाला समजावून सांगितलं आणि घरी नक्की यायचं आवतन दिलं. काही तासांनी आम्ही त्यांच्या घरी पोचलो. त्यांच्या बायकोने, सुशीलाने अगदी प्रेमाने आम्हाला घरात घेतलं. दोन वर्षांची त्यांची मुलगी गीता मात्र आम्हाला पाहून फारशी खूश नव्हती.
कृष्णांची मुलगी गीता, लाजत दाराआडून डोकावताना (फोटोः ऑड्रा बास) उजवीकडेः गीताला कडेवर घेतलेली त्यांची बायको सुशीला
सुशीलाने आम्हाला त्यांचे जैविक रंग दाखवले. कृष्णा पिढ्या न् पिढ्या चालत आलेल्या पद्धतीनुसार जंगलात मिळणाऱ्या वस्तूंपासून हे रंग बनवतात. त्यांच्या चित्रांचं वैशिष्ट्य असणाऱ्या गहिऱ्या आणि मातीशी नातं सांगणाऱ्या छटा या वनांमधून आलेल्या वस्तूंमुळेच आहेत हे स्पष्ट दिसत होतं. हिरवा रंग कट्टेगाडा पानांपासून आणि विटकरी-तपकिरी रंगाच्या विविध छटा वंगई मारम झाडाच्या रसापासून तयार होतात. करीमारम झाडाची साल काळा रंग देते, कलिमान माती पिवळ्या रंगासाठी वापरली जाते. बुरिमन मातीपासून विलक्षण चमकदार पांढरा रंग तयार होतो. लाल आणि निळा हे दोन्ही रंग कुरुंबा चित्रांमध्ये तसे विरळाच.
कृष्णांच्या चित्राचे टप्पेः कट्टेगाडाची ताजी पानं, हाताने बनवलेले जैविक रंग आणि या रंगाने सजलेली चित्रं
कृष्णांचा ठाम दावा आहे की कुरुंबा चित्रकला येत्या अनेक पिढ्यांपर्यंत चालू राहणार. चित्रकला ही त्यांच्यासाठी फक्त व्यक्तिगत आवड नाहीये. झपाट्याने ऱ्हास पावत चाललेल्या कुरुंबा संस्कृतीचं जतन करण्याचा तो एक मार्ग आहे. तरुण कलाकारांना तुम्ही काय सल्ला द्याल असं विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं, “तुम्हाला विद्यापीठांमध्ये जायचं असेल तर तुम्ही अवश्य जा. पण आपल्या संस्कृतीची कास सोडू नका. फास्ट फूड चांगलं नाहीये – आपले पूर्वज जे खात होते, ते खा. ही चित्रकला चालू ठेवा, मध गोळा करणं थांबवू नका. या जंगलात सगळी औषधं आहेत.”
जुन्या आणि नव्यामधल्या हा झिम्मा कृष्णांना पुरताच माहित आहे. खरंच, आमच्या गप्पा सुरू असतानाच त्यांचा मोबाइल फोन वाजला आणि जंगलातली ती तेवढी मोकळी जागा त्या गाण्याने निनादून गेली. असं गाणं जे कदाचित मुंबईच्या एखाद्या नाइटक्लबमध्ये कानावर पडेल. एकच हशा पिकला, आणि आम्ही आमची मुलाखत चालू केली. पण क्षणभरच का असेना, त्या पर्वतांची शांतता ढळली हे नक्की.
छायाचित्रः ऑलिव्हिया वॉरिंग
लास्ट फॉरेस्ट एंटरप्राइजेसचे मार्केटिंग अधिकारी आणि निलगिरी पर्वतांमधले माझे दुभाषी सर्वानन राजन यांचे मनापासून आभार. त्याचसोबत लास्ट फॉरेस्ट एंटरप्राइजेससोबत काम करणारी एआयएफ क्लिंटन फेलो ऑड्रा बास हिचेही आभार. कोटागिरीत माझ्या मुक्कामाची सोय करण्याकरिता आणि माझ्या बरोबर गावोगावी सोबत येण्याकरिता.
अनुवादः मेधा काळे