हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.

आयुष्यभर ओणवं

ती क्षणभरासाठी थांबली, विजयनगरमच्या मध्यान्हीच्या सूर्याच्या तलखीने थकलेली. पण ती तशीच ओणवी थांबली. तिला माहित होतं की काही क्षणात तिला परत कामाला लागायचंय, त्याच स्थितीत.

त्याच काजूंच्या बागांमध्ये तिच्या गावच्या बायांचे इतर दोन गट काम करत होते. एका गटाने त्यांचं खाणं आणि पाणी दोन किलोमीटरवर शेतात सोबत आणलेलं होतं. इतर बाया उलट्या दिशेने काम करत येत होत्या. सगळ्याच कमरेत वाकलेल्या.

ओरिसाच्या रायगडामध्ये शेतात पुरुषही होते. कॅमेऱ्याच्या लेन्समधून दिसणारं दृश्य भन्नाट होतं. सगळे पुरुष ताठ उभे आणि सगळ्या बाया वाकलेल्या, ओणव्या. ओरिसातल्या नौपाडात पावसाचे थेंब आले तरी ती तण काढायचं थांबली नव्हती. कमरेत खाली वाकून ती काम करतच होती. छत्रीआड.

व्हिडिओ पहाः 'काम करत असलेल्या बायांकडे पाहिल्यावर पहिल्यांदा काय लक्षात येतं - त्या कायम ओणव्या असतात,' पी. साईनाथ

लावणी किंवा हाताने रोपांची लागवड, पेरणी आणि तण काढणं किंवा खुरपणी ही सगळी फार कष्टाची कामं आहेत. या सगळ्या कामांमध्ये सलग खूप वेळ अवघड आणि वेदनादायी स्थितीत काम करावं लागतं.

भारतातल्या एकूण स्त्री कामगारांपैकी एक्क्याऐंशी टक्के स्त्रिया शेतकरी, मजूर, वन उपज गोळा करणाऱ्या आणि छोटी जनावरं पाळणाऱ्या आहेत. शेतीच्या कामांमधे मोठ्या प्रमाणावर लिंगभेद केला जातो. बायांना नांगरट करू दिली जात नाही. पण रोपांची लावणी-लागवड, खुरपणी, तण काढणं, कापणी, झोडणी आणि कापणीनंतरची इतर अनेक कामं मात्र बहुतांशी बायाच करतात.

एका विश्लेषणानुसार, कामांमधला स्त्रियांचा वाटा हा असा आहे –

शेतीसाठी जमीन तयार करणे – ३२ टक्के
पेरणी – ७६ टक्के
लावणी-लागवड – ९० टक्के
शेतातून पीक घरी आणणे – ८२ टक्के
अन्न प्रक्रिया – १०० टक्के
दूध उत्पादन – ६९ टक्के

PHOTO • P. Sainath
PHOTO • P. Sainath


या सगळ्याच कामांसाठी ओणवं किंवा उकिडवं बसावं लागतं. शिवाय, त्या वापरतात ती अवजारं त्यांच्या सोयीनी बनवलेली नसतात.

बाया शेतात जी कामं करतात, त्यात त्या कमरेत वाकून किंवा उकिडवं बसून पुढे सरकत जात असतात. त्यामुळे प्रचंड पाठदुखी आणि पायांमधली वेदना मोठ्या प्रमाणावर आढळून येते. लावणीच्या वेळी सलग घोटाभर पाण्यात उभं राहून काम करावं लागत असल्यामुळे त्वचेचे विकार होण्याचा धोका बराच असतो.

आणि त्यात भर म्हणजे अवजारांमुळे होणाऱ्या जखमा. ही अवजारं पुरुषांसाठी बनवली जातात, ती बायांना वापरायला सोपी व्हावीत म्हणून त्यात फारसे बदल केले जात नाहीत. विळे आणि कोयत्याने होणाऱ्या जखमा सर्रास आढळतात, आणि त्यासाठी बरे उपचार विरळाच. धनुर्वाताचा धोका तर कायमच असतो.

PHOTO • P. Sainath
PHOTO • P. Sainath
PHOTO • P. Sainath

शेतीतल्या या कामाशी निगडीत एक मोठा धोका म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारे बालमृत्यू. उदाहरणार्थ, लावणीच्या काळात, बायांना जवळजवळ अख्खा दिवस वाकून किंवा उकिडवं बसून काम करावं लागतं. महाराष्ट्रातल्या एका अभ्यासात हे दिसून आलंय की याच काळात गर्भ पडून जाण्याच्या किंवा अर्भकांच्या मृत्यूच्या सर्वात जास्त घटना घडतात. बराच काळ उकिडवं बसल्यामुळे ओटीपोटावर ताण पडतो, ज्यामुळे दिवस भरण्याआधी मूल जन्माला येण्याची शक्यता वाढते.

काम करणाऱ्या बायांना पुरेसं खायलाही मिळत नाही. एकूणच गरिबीचा हा परिपाक. घरच्या सर्वांना वाढून मग शेवटी स्वतः खाण्याच्या रिवाजामुळे परिस्थिती अजूनच बिकट होते. गरोदर बाईला जास्त आहाराची गरज असूनही तिला फारसं बरं खायला मिळत नाही. बहुतेक वेळा आयाच कुपोषित असल्यामुळे दिवस भरण्याआधी जन्माला आलेली मुलं कमी वजनाची असतात. जगण्याचं पुरेसं बळ त्यांच्यामध्ये नसतं.

शेतीत काम करणाऱ्या बाया या अशा दुष्टचक्रात अडकलेल्या आहेत. एकामागोमाग एक गरोदरपणं, अर्भकमृत्यूचं मोठं प्रमाण आणि त्याचे परत तब्येतीवर विपरित परिणाम. गरोदरपणात किंवा बाळंत होताना बाया मरण पावण्याचं प्रमाण मोठं आहे.

PHOTO • P. Sainath

پی سائی ناتھ ’پیپلز آرکائیو آف رورل انڈیا‘ کے بانی ایڈیٹر ہیں۔ وہ کئی دہائیوں تک دیہی ہندوستان کے رپورٹر رہے اور Everybody Loves a Good Drought اور The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom کے مصنف ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پی۔ سائی ناتھ
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے