“चौदा, सोळा, अठरा...” खंडू माने अठ्ठ्याच्या
पाठीवरच्या खोळीत दोन्ही बाजूला दोन दोन अशा कच्च्या विटा लादतायत. अठरा विटा झाल्या
की ते अठ्ठ्याच्या पाठीवर काठी टेकवतात आणि म्हणतात,
“चला...फुर्रर्र...फुर्रर्र...” अठ्ठ्या आणि त्याच्यासोबतची दोन गाढवं भट्टीच्या
दिशेने चालायला लागतात. अंदाजे ५० मीटर अंतरावरच्या भट्टीपाशी विटा रचायचं काम
सुरू आहे.
“आणखी एक तासभर, मग सुट्टी,” माने म्हणतात. सुट्टी? आता तर सकाळचे फक्त नऊ वाजलेत. आमचे कोड्यात पडलेले चेहरे पाहून ते सांगतात, “मध्यरात्री, अंधारात एक वाजल्यापासून काम सुरू होतंय. सकाळी १० वाजता सुट्टी होणार. रातभर हे असंच चालू आहे.”
मानेंची चार गाढवं विटा उतरवून परत आली आहेत. पुन्हा तेच काम सुरू. “चौदा, सोळा, अठरा...”
आणि अचानक एका गाढवाला ते म्हणतात, “रुको...” आम्ही परत कोड्यात. “आपल्याकडच्या गाढवांना मराठी कळतंय. हे राजस्थानातलं हाय. त्याला हिंदीत सांगावं लागतंय,” माने खळखळून हसतात. आणि आम्हाला प्रात्यक्षिकच करून दाखवतात. रुको. गाढव थांबतं. चलो. निघालं.
आपल्या या चतुष्पाद प्राण्यांबद्दलचा अभिमान खंडूभाऊंच्या चेहऱ्यावर दिसत राहतो. “लिंबू न् पंधऱ्या चरायलेत. आन् बुलेट बी. असली देखणी हाय आन् पळती बी लई जोरात!”
सांगली शहराला लागूनच
असलेल्या सांगलीवाडी परिसरात जोतिबा मंदिरापाशी असलेल्या वीटभट्टीवर आमची त्यांची
भेट झाली. या परिसरात नदीकाठावर चिक्कार वीटभट्ट्या आहेत. आम्हीच पंचवीस तरी
मोजल्या.
वीटेत वापरत असलेल्या उसाच्या वाळलेल्या भुश्शाचा गोड वास हवेत भरला होता. त्यात भट्टीच्या धुराचा वास मिसळलेला.
प्रत्येक भट्टीवर एकच चित्र दिसत होतं, गडी, बाया, लेकरं आणि गाढवं घडाळ्याच्या
काट्यासारखी एका लयीत काम करत होती. कुणी माती कालवतंय, तर कुणी साच्यातून विटा
पाडतंय. कुणी कच्च्या विटा गाढवांवर लादतंय तर कुणी भट्टीत रचतंय.
गाढवं येतात, गाढवं जातात, दोन...चार...सहा...
“किती तरी पिढ्या आम्ही
गाढवं पाळतोय,” खंडूभाऊ सांगतात. “माझा आजा, माझा बाप आन् आता मी.” सांगलीहून १५०
किलोमीटरवर असलेलं पंढरपूर तालुक्यातलं वेळापूर हे त्यांचं गाव. दर वर्षी
दिवाळीनंतर ते आणि त्यांचं कुटुंब वीटभट्ट्यांवर कामासाठी स्थलांतर करतं.
त्यांची बायको, माधुरी गाढवावरच्या विटा उचलून
भट्टीवर रचतीये. त्यांच्या मुली, ९ वर्षांची कल्याणी, १२ वर्षांची श्रद्धा आणि १३
वर्षांची श्रावणी गाढवं चालवतायत. आणि त्यांचा धाकटा भाऊ, वडलांजवळ विटांवर बसून चहाबरोबर
बिस्किट खातोय.
“श्रावणी आणि श्रद्धा सांगलीत एक राहत्या शाळेत
शिकायला हायत्या. पर काय करावं, त्यांना बोलून घ्यावं लागलं कामावर,” दोन दोन विटा
भट्टीवरच्या भटकऱ्याला देता देता माधुरी सांगते. “एक जोडपं घेतलं होतं कामावर.
दोगं ८०,००० उचल घेऊन पळून गेलेत. आता काम घेतलंय अंगावर. पुढच्या दोन महिन्यात
पुरं करावं लागतंय,” आमच्याशी बोलत बोलत ती गाढवामागे धावत जाते.
माधुरीच्या हातातल्या प्रत्येक विटेचं वजन किमान दोन किलो आहे. उंचच उंच भट्टीवर विटा रचणाऱ्या भटकऱ्याकडे ती दर वेळी अशा दोन दोन विटा उचलून फेकतीये.
तोही वाकून झटक्यात विटा झेलतो आणि तोंडाने मोजत राहतो, “दहा, बारा, चौदा...” हा भटकरी आतून पेटलेल्या भट्टीच्या कडेकडेने सुबकपणे विटा रचत राहतो.
*****
दररोज, सकाळी दहा वाजेपर्यंत, अख्खी रात्र काम करून
खंडू, माधुरी आणि त्यांच्या मुली १५,००० वीट उचलतात आणि भट्टीवर नेतात.
त्यांच्याकडची १३ गाढवं रोज प्रत्येकी जवळजवळ २,३०० किलोचा भार वाहून नेतायत. आणि
रात्रभर खेपा मारत ही गाढवं आणि त्यांच्याबरोबर त्यांचे गाढवंवाले १२ किलोमीटर
अंतर चालतात. दररोज.
दर हजार विटेमागे खंडूभाऊंच्या कुटुंबाला २०० रुपये
मिळतात. वीटभट्टीचं सगळं काम उचलीवर चालतं. लोक अंगावर काम घेतात. सहा महिन्यांनी
केलेल्या कामाचे पैसे मिळतात. तेव्हा आगाऊ घेतलेली उचल, दर आठवड्याला किराण्यासाठी
घेतलेले पैसे आणि इतर काही खर्चपाण्याला घेतले असले तर असे सगळे वजा करून हिशोब
केला जातो. गेल्या हंगामात माने कुटुंबाने २ लाख ६० हजाराची उचल घेतली होती. एका
गाढवामागे २०,००० असा हिशोब असतो.
“आम्ही शक्यतो गाढवामागे २०,००० उचल देतो,” विशीत
असलेला विकास कुंभार मला सांगतो. इथून ७५ किलोमीटरवर कोल्हापूर जिल्ह्यात भांबवडे
गावात त्याच्या मालकीच्या दोन वीटभट्ट्या आहेत. “सगळं काम उचल देऊन, अंगावर असतं,”
तो सांगतो. जितकी गाढवं जास्त, तितकी उचल जास्त.
शेवटी हिशोब केला जातो तेव्हा सहा महिन्यात किती वीट
उचलली, किती उचल घेतली असा सगळा ताळमेळ मांडला जातो. “हप्त्याला त्यांना
किराण्यासाठी [कुटुंबाला २००-२५० रुपये] पैसे देतो, इतर काही खर्चाला लागले तरी
देतो,” विकास सांगतो. आणि त्या हंगामात जर जितकी उचल घेतली तितकं काम झालं नाही तर
ते पुढच्या हंगामात येऊन काम पुरं करून देतात. खंडू आणि माधुरी मदतीला कामगार
घेतात, त्यांची मजुरी बाजूला ठेवतात.
*****
“सांगली जिल्ह्यातला पलूस ते म्हैसाळ असा कृष्णेचा
नदीकाठ पाहिलात, तर किमान ४५० वीटभट्ट्या आहेत,” ॲनिमल
राहत या पशु आरोग्यावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचा एक कार्यकर्ता
आम्हाला सांगतो. या दोन्ही टोकांच्या मध्यावर सांगलीवाडीचा भाग येतो. पलूसपासून
म्हैसाळपर्यंत नदीकाठ तसा ८०-८५ किलोमीटरचा आहे. “या वीटभट्ट्यांवर मिळून किमान
४,००० गाढवं कामाला आहेत,” त्याचा साथीदार सांगतो. हे दोघं जण दर आठवड्यातून
एक-दोन वेळा प्रत्येक भट्टीवर जाऊन गाढवांची तब्येत ठीक आहे ना यावर लक्ष ठेवतात.
त्यांची एक तातडीची सेवा देणारी रुग्णवाहिका देखील आहे. आणि गरज पडल्यास गाढवांना
दवाखान्यात घेऊन जाते.
दिवसभराचं म्हणजे खरं तर रात्रभराचं काम संपलं की
जोतिबा मंदीर परिसरातल्या भट्ट्यांवरची गाढवं थेट नदीकाठी धावायला लागतात.
मोटरसायकल किंवा सायकलींवरची तरुण मुलं गाढवं हाकताना दिसतात. बहुतेक गाढवं
उकिरड्यांवर आणि नदीकाठी चरतात आणि संध्याकाळी गाढवंवाले अंधाराच्या आत गाढवं
माघारी घेऊन येतात. बरेच जण सांगतात की त्यांच्यासाठी कुट्टी आणि बाकी पशुखाद्य
असतं. पण कुणाच्याच घरी ते काही पहायला मिळत नाही.
“दर साली आम्ही
जनावराच्या चाऱ्यासाठी म्हणून दोन गुंठे रान घेतो. गवत आन् कडब्यासाठी,” ४५
वर्षांच्या जनाबाई माने सांगतात. त्याचे २,००० रुपये भाडं म्हणून द्यावे लागतात.
“पण कसंय, त्यांनाच खायला भेटलं नाही, तर आमचं पोट कसं भरावं?”
आमच्याशी बोलता बोलताच
त्या त्यांचं जेवण उरकतात. विटा रचून केलेली तात्पुरती घरं आहेत इथे. वर पत्रा
टाकलेला. नुकतंच शेणाने सारवून घेतल्यामुळे त्या आम्हाला बसायला प्लास्टिकची चटई
देतात. “आमचं गाव फलटण [जि. सातारा] पण तिथं या गाढवांना काही कामच नाही. आता गेलं
१०-१२ वरीस याच मालकाच्यात काम करतोय. जिथे त्यांना काम, तिथं आमी,” जनाबाई
सांगतात. त्या आणि त्यांचं सात जणांचं कुटुंब आता सांगलीतच स्थायिक झालंय.
खंडूभाऊसारख्या त्या स्थलांतर करत नाहीत.
जनाबाई आणि त्यांच्या घरच्यांनी नुकतीच सांगलीच्या
टोलनाक्यापाशी जरा टेकाडावर २.५ गुंठे जागा विकत घेतलीये. “सारखेच पूर यायला
लागलेत. आमच्या जनवरांचे लई हाल होतात पाण्यात. म्हणून मग जरा उंचावर जागा घेतली.
आता तिथं घर बांधायचंय. खाली गाढवं, आन् वर आमी,” त्या सांगतात. त्या बोलत असताना
त्यांचा बारका नातू, आजीच्या मांडीत येऊन बसतो आणि खूश होऊन सगळं ऐकायला लागतो.
जनाबाईंकडे शेरडं देखील आहेत. “माझ्या बहिणीनी पाडी दिल्ती. आता दहा झालीयात,”
सांगताना जनाबाईंचा चेहरा फुलून येतो.
“पण गाढवं पाळणं आता लई अवघड झालंय बगा,” त्या
तक्रारीच्या सुरात सांगतात. “आमची ४० गाढवं होती. त्यातलं गुजरातचं एक होतं ते ॲटॅक
येऊन गेलं. काहीच करता नाही आलं.” सध्या त्यांच्याकडे २८ गाढवं आहेत. भट्ट्या सुरू
असल्या की सांगलीहून जनावराचे डॉक्टर सहा महिन्यात एक-दोनदा चक्कर मारतात. पण
मार्च महिन्यापासून गेल्या तीन महिन्यांत त्यांची चार गाढवं मेली आहेत. तिघं काही
तरी विषारी खाऊन, पोट फुगून गेली तर एक वाहनाची धडक लागून गेलं. मोठी होती चारी.
“आमच्या आई-बापाला झाडपाल्याची औषधं माहित होती. पण आमाला तसलं काय बी येत नाही,”
जनाबाई सांगतात. “आता आमी सरळ मेडिकलला जातो आणि बाटल्या घेऊन पाजतो.”
*****
महाराष्ट्रात गाढवं पाळणारे बरेच समुदाय आहेत. त्यात प्रामुख्याने कैकाडी, बेलदार, कुंभार आणि वडार समुदाय महत्त्वाचे. खंडू, माधुरी आणि जनाबाई कैकाडी आहेत. इंग्रजांनी ज्या भटक्या जमातींवर गुन्हेगार असा शिक्का मारला त्यात कैकाडी देखील होते. वसाहत काळातला गुन्हेगारी जमाती कायदा १९५२ साली रद्द करण्यात आला तेव्हा इतर काही जमातींबरोबर ही जमातही ‘विमुक्त’ झाली. पूर्वापारपासून टोपल्या, कुंचे, कणग्या तयार करणाऱ्या या समाजाप्रती इतरांचा दृष्टीकोन, मनातला संशय आणि भेदभाव आजही पूर्णपणे संपलेला नाही. महाराष्ट्रात विदर्भातले आठ जिल्हे वगळता कैकाडी जमातीची नोंद विमुक्त जाती (अ) या वर्गात करण्यात आली आहे. विदर्भात मात्र ते अनुसूचित जातीमध्ये मोडतात.
गाढवं
पाळणारे बरेचसे कैकाडी पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीतून किंवा अहमदनगरच्या मढीत गाढवं
विकत घेतात. काही तर गुजरात आणि राजस्थानातल्या बाजारातही जातात. “एका जोडीला ६०
हजार ते १ लाख २० हजार रुपये पडतात,” जनाबाई सांगतात. “बिनदाताच्या जनावराला जास्त
किंमत येते,” त्या म्हणतात. दातावरून जनावराचं वय मोजलं जातं.
गाढवांचे दुधाचे दात पहिल्या काही आठवड्यात येतात. साधारणपणे गाढव पाच वर्षांचं
झालं की दुधाचे दात पडून कायमचे दात येतात.
सध्या मात्र या प्राण्यांच्या बाबतीत वेगळीच चिंता
भेडसावू लागली आहे. गेल्या दहा वर्षांत गाढवांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे.
२०१२ ते २०१९ या काळात आपल्या देशात गाढवांची संख्या तब्बल ६१.२ टक्क्यांनी घटली.
२०१२ साली करण्यात आलेल्या पशुगणनेनुसार भारतात ३.२ लाख गाढवं होती.
२०१९ च्या पशुगणनेत
हीच संख्या १.२ लाख इतकी घटल्याचं दिसतं. महाराष्ट्र गाढवांच्या संख्येत देशात
दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथेही ४० टक्क्यांनी घट होऊन २०१९ साली गाढवांची संख्या
केवळ १७,५७२ इतकी उरली आहे.
इतकी प्रचंड घट का होत असेल असा प्रश्न पडल्याने
ब्रूक इंडिया या पशुकल्याणासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेने पत्रकार शरत के.
वर्मा यांना एक
शोध अभ्यास
हाती घेण्यास सांगितलं. वर्मा यांनी तयार केलेल्या
अहवालानुसार ही घट होण्यामागे अनेक कारणं आहेत – गाढवांचा वापर कमी झाला आहे,
गाढवं पाळणाऱ्यांनी ती पाळणं थांबवलं आहे, यांत्रिकीकरण, घटती चराऊ कुरणं, अवैध
कत्तली आणि चोऱ्या.
“दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये गाढवाच्या मांसाला मोठी मागणी आहे, खास करून आंध्र प्रदेशात गुंटुरमध्ये,” डॉ. सुजीत पवार सांगतात. ब्रूक इंडियाचे ते सांगलीस्थित प्रकल्प समन्वयक आहेत. वर्मांनी केलेल्या अभ्यासातही हे दिसून आलं होतं की आंध्र प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गाढवांची सर्रास कत्तल केली जात आहे. गाढवाचं मांस स्वस्त असतं. शिवाय त्यामध्ये काही औषधी गुण असल्याचा आणि हे मांस खाल्ल्यास पुरुषांची 'ताकद' वाढत असल्यांचा लोकांचा समज आहे.
गाढवाच्या
कातड्याची चीनमध्ये तस्करी होतीये, डॉ. पवार सांगतात. ‘एजाओ’ या चिनी औषधामध्ये
गाढवाच्या कातडीपासून मिळणारा पदार्थ असतो आणि त्यामुळे त्याची मागणी वाढली आहे.
ब्रूक इंडियाने प्रसिद्ध केलेल्या या अहवालामध्ये गाढवांची कत्तल आणि चोरी यामध्ये
असलेला संबंध विशद केलेला आहे. अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की
कातड्याची अवैध तस्करी, चीनमधल्या वाढत्या मागणीमुळे त्यात झालेली वाढ या
कारणांमुळे आता गाढवं अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत.
*****
बाबासाहेब बबन मानेंची सगळीच्या सगळी, १० गाढवं सहा
वर्षांपूर्वी चोरीला गेली. “तेव्हापासून मी विटा रचायचं काम करायलोय. कमाई घटली
तरी,” ४५ वर्षीय माने सांगतात. गाढवंवाल्यांना हजार विटेमागे २०० रुपये मिळतात तर
रचणाऱ्याला १८०. (गाढवंवाल्यांना गाढवासाठी वरचे २० मिळतात असं माधुरी आम्हाला
म्हणाली होती.) सांगलीवाडीहून १२ किलोमीटरवर मिरज-अर्जुनवाड रोडवरच्या लक्ष्मी माता
मंदिरापाशी एका वीटभट्टीवर बाबासाहेब काम करतात. “आमचं सोडा, एका
व्यापाऱ्याची २० गाढवं म्हैसाळ फाट्यावरून चोरीला गेलीत,” ते सांगतात. त्यांच्या
भट्टीपासून हा फाटा फक्त १० किलोमीटरवर आहे. “मला तर वाटतं ते गाढवांना गुंगीचं
इंजेक्शन वगैरे देत असणार आणि गाडीत कोंबत असणार.”
दोन वर्षांपूर्वी जनाबाईंची देखील सात गाढवं चोरीला गेली होती. चरायला गेलेली परत आलीच नाहीत. सांगली, सोलापूर, बीड आणि इतर जिल्ह्यात गाढवांच्या चोरीच्या घटना वाढतायत आणि त्याचा थेट परिणाम बाबासाहेब आणि जनाबाईंसारख्या गाढवं पाळणाऱ्यांवर होतोय. कारण गाढवं कमी झाली की कमाई देखील कमी होते. “त्यांनी माझी चार गाढवं चोरली,” मिरजेतल्या वीटभट्टीवर काम करणारे जगू माने सांगतात. त्यांना २ लाखांचा फटका बसलाय. “हे नुकसान मी कसं भरून काढावं?” ते विचारतात.
पण डॉ. पवार याचा थोडा दोष गाढवंवाल्यांनाही देतात. ते आपल्या गाढवांची फार काही काळजी घेत नाहीत. दिवसभर त्यांना चरायला सोडून देतात. “काहीच लक्ष देत नाहीत. कामाची वेळ झाली की जाऊन त्यांना घेऊन यायचं. पण मधल्या वेळेत काही घडलं तर पहायला कोण आहे?” ते विचारतात.
बाबासाहेबांशी बोलत असताना बाबू विठ्ठल जाधव चार
गाढवांच्या पाठीवर विटा लादून घेऊन येताना दिसतात. साठीचे बाबूदेखील कैकाडी आहेत
आणि गेल्या २५ वर्षांपासून वीटभट्टीवर काम करतायत. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ
तालुक्यातलं पाटकूळ हे त्यांचं गाव. दर वर्षी सहा महिन्यांसाठी ते मिरजेतल्या या
भट्टीवर कामाला येतात. ते अगदी दमून गेलेले दिसतात. जरा वेळ टेकावं म्हणून ते
विटांवर बसतात. सकाळचे ९ वाजलेत. बाबासाहेब आणि इतर दोन महिला कामगारांबरोबर
चेष्टा मस्करी करत बाबू दिवसभराचं काम संपवतात. त्यांची बायको आता गाढवं घेऊन विटा
लादायला जाते. त्यांच्याकडे एकूण सहा गाढवं आहेत. सगळी चिपाड झालेली, थकलेली आणि
खंगलेली दिसतायत. दोघांच्या पायांना जखमा झाल्या आहेत. अजून एक दोन तासांनी सुट्टी
होणार असल्याचं इथले कामगार सांगतात.
वीटभट्टीवरच्या गाढवंवाल्यांना महिन्यातून एकच सुट्टी
– अमावास्येला. त्यामुळे सगळेच जण प्रचंड थकलेले दिसतायत. “कसंय, आम्ही सुटी घेतली
तर विटा भट्टीवर कोण नेणार?” जोतिबा मंदिरापासच्या भट्टीत माधुरी विचारते. “आणि
आम्ही विटा उचलल्या नाहीत, तर नव्या घालायच्या कुठं? जागा नको? त्यामुळे आम्हाला
सुटी नाही. फक्त अमावास्येला काम बंद,” ती सांगते. अमावास्येला काही तरी अशुभ
घडायला नको असा समज आजही असल्याने त्या दिवशी सुटी. सहा अमावास्या सोडल्या तर
गाढवंवाले आणि त्यांच्या गाढवांना सहा महिन्यांच्या काळात आणखी फक्त तीन सुट्ट्या असतात – शिवरात्र, शिमगा आणि गुढी पाडवा.
सूर्य माथ्यावर येईपर्यंत सगळे जण विटा रचून तयार केलेल्या आपापल्या घरी परतलेत. श्रावणी आणि श्रद्धा जवळच्याच नळावर कपडे धुवायला गेल्या आहेत. खंडूभाऊ गाढवं चारायला गेलेत. माधुरी आता स्वयंपाक उरकेल आणि उन्हाच्या कारात तापलेल्या घरात मिळेल तेवढी झोप घ्यायचा प्रयत्न करेल. भट्टीवर काम थंडावलंय. “मस पैसा हाय, खायला हाय,” माधुरी म्हणते. “डोळ्याला झोप तेवढी नाही बगा.”
रितायन मुखर्जी देशभरातील भटक्या पशुपालक समुदायांसंबंधी वार्तांकन करतात. सेंटर फॉर पॅस्टोरिलझमतर्फे त्यांना प्रवासासाठी स्वतंत्र निधी मिळाला आहे. या वार्तांकनातील मजकुरावर सेंटर फॉर पॅस्टरोलिझमचे कोणतेही संपादकीय नियंत्रण नाही.