“स्वयंपाकघरातनं सुरुवात झाली,” अजित राघव सांगतात. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातल्या जोशीमठ गावाचे रहिवासी असलेले राघव ३ जानेवारी २०२३ च्या सकाळी काय काय घडलं ते सांगू लागतात.

टॅक्सीचालक असलेले ३७ वर्षीय राघव सांगतात की सुरुवातीला स्वयंपाकघरात मोठाल्या भेगा दिसू लागल्या आणि त्यानंतर घराच्या इतर खोल्यांमध्ये त्या पसरल्या. त्यांचं दोन मजली साधंसं घर आहे. त्यातल्या त्यात कमी नुकसान झालेल्या एका खोलीत स्वयंपाकघर हलवलं. आणि अचानक या आठ जणांच्या कुटुंबाकडे रहायलाच जागा उरली नाही.

“ऐश्वर्या [वय, १२] आणि शृष्टी [वय ९] या दोघी मोठ्या मुलींना मी माझ्या थोरल्या बहिणीकडे रहायला पाठवून दिलं. राघव, त्यांची पत्नी गौरी देवी आणि सहा वर्षांची मुलगी आयेशा आणि त्यांच्या दोन वयोवृद्ध चुलत्या आता जेवणखाणं इथे या घरात करतात. पण झोपण्यासाठी मात्र जवळच्या संस्कृत महाविद्यालय या शाळेतल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात जातात. जवळपास २५-३० विस्थापित कुटुंबं तिथे रहायला आली आहेत.”

चमोली जिल्हा प्रशासनाने २१ जानेवारी २०२३ रोजी एक माहितीपत्रिका प्रसारित केली. जोशीमठच्या नऊ वॉर्डातल्या एकूण १८१ इमारती धोकादायक असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. भेगा पडलेल्या घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे – १९ जानेवारी – ८४९ आणि २२ जानेवारी – ८६३. राघव आपल्या आसपासच्या घरांना कशा भेगा पडल्या आहेत ते पारीला दाखवतात. “जोशीमठमधल्या प्रत्येक घराची स्वतःची एक गोष्ट आहे,” ते म्हणतात. त्यांचा इशारा अनिर्बंध विकासकामांमुळे आजची परिस्थिती उद्भवली याकडे होता.

जोशीमठमधल्या भिंती, छत आणि आणि जमिनीला भेगा पडायला सुरुवात झाली ३ जानेवारी २०२३ रोजी. आणि पुढच्या अगदी थोड्या दिवसांत परिस्थिती अतिशय गंभीर बनली. ते राहतात त्या सिंघदर वॉर्डातल्या १३९ घरांना भेगा पडलेल्या दिसतायत आणि ९८ असुरक्षित प्रदेशात आहेत. या सगळ्या घरांवर जिल्हा प्रशासनाने लाल फुली मारली आहे. इथे राहणं किंवा त्या परिसरात वावर सुरक्षित नाही.

The family has set up a temporary kitchen in the room with the least cracks.
PHOTO • Shadab Farooq
Clothes and other personal belongings are piled up in suitcases, ready to be moved at short notice
PHOTO • Shadab Farooq

डावीकडेः जरा छोट्या भेगा असलेल्या एका खोलीत स्वयंपाकघर हलवण्यात आलं आहे. उजवीकडेः कधीही मुक्काम हलवावा लागेल म्हणून कपडे, इ. सूटकेसमध्ये भरून ठेवले आहेत

A neighbour is on her roof and talking to Gauri Devi (not seen); Raghav and his daughter, Ayesha are standing in front of their home
PHOTO • Shadab Farooq
Gauri Devi in the temporary shelter provided by the Chamoli district administration
PHOTO • Shadab Farooq

डावीकडेः एक शेजारीण आपल्या छतावरून गौरी देवींशी बोलतीये (त्या फोटोमध्ये दिसत नाहीत). राघव आणि त्याची मुलगी आएशा घरासमोर उभ्या आहेत. उजवीकडेः गौरी देवी चमोली जिल्हा प्रशासनाने पुरवलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात

राघव यांचं सगळं आयुष्य याच गावात गेलंय. आपल्या घरावर लाल फुली मारली जाऊ नये यासाठी त्यांची सगळी धडपड सुरू आहे. “ मला परत माझ्या घराच्या गच्चीत ऊन खात पर्वतांचा नजारा पहायचाय ,” ते म्हणतात. आई-वडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत ते इथे लहानाचे मोठे झाले आहेत. हे तिघंही आता या जगात नाहीत.

“लाल फुलीचा अर्थ अधिकारी [चमोली जिल्हा प्रशासनाचे अधिकारी] ही जागा सील करणार. म्हणजेच लोक आपल्या घरी परतू शकणार नाहीत,” ते सांगतात.

रात्र झालीये. राघवच्या घरी रात्रीची जेवणं उरकली आहेत. राघव यांची काकी रात्री निजण्यासाठी त्यांच्या तात्पुरत्या घराकडे – शाळेत निघाल्या आहेत.

त्यांचं सगळं घर अस्ताव्यस्त पसरलेलं आहे. कपड्यांनी भरलेली एक उघडी सूटकेस दिसतीये. लोखंडी कपाटं रिकामी केलेली आहेत. फ्रीज बंद करून वायर काढून ठेवलीये. बाकी सगळं छोटं मोठं सामान पिशव्या, बॅगांमध्ये भरून ठेवलंय. स्टीलची आणि प्लास्टिकची भांडी तसंच खोके इतस्ततः पडलेत. सगळं सामान निघण्यासाठी सज्ज आहे.

“माझ्याकडे [फक्त] २,००० रुपयांची एक नोट आहे. तेवढ्या पैशात माझा सगळा पसारा हलवायला ट्रक मिळत नाही,” आजूबाजूला पाहत राघव सांगतात.

Raghav and Ayesha are examining cracks on the ground in their neighbourhood. He says, ‘My story is the story of all Joshimath.’
PHOTO • Shadab Farooq
The red cross on a house identifies those homes that have been sealed by the administration and its residents evacuated
PHOTO • Shadab Farooq

डावीकडेः राघव आणि आयेशा शेजारच्या घरात जमिनीला पडलेल्या भेगा पाहतायत. ते म्हणतात, ‘माझी गोष्ट अख्ख्या जोशीमठची गोष्ट आहे.’ उजवीकडेः घरावर लाल फुली म्हणजे जिल्हा प्रशासनाने ही घरं राहण्यासाठी लायक नाहीत म्हणून सील केली आहेत आणि रहिवाशांना बाहेर काढलं आहे

Raghav and Ayesha on the terrace of their home.  'I want to come again to sit in the sun on my roof and watch the mountains'.
PHOTO • Shadab Farooq
A view of Joshimath town and the surrounding mountains where underground drilling is ongoing
PHOTO • Shadab Farooq

डावीकडेः राघव आणि आयेशा आपल्या घराच्या गच्चीत. ‘मला परत माझ्या गच्चीत ऊन खात पर्वतांचा नजारा पहायचाय.’ उजवीकडेः जोशीमठ आणि आसपासच्या पर्वतरांगा. इथेच जमिनीखाली ड्रिलिंगचं काम सुरू आहे

त्यांची पत्नी त्यांना आठवण करते की जिल्हा प्रशासन “दोन दिवसांत घरं खाली करा अशा सूचना माइकवर देतंय.”

ते इतकंच म्हणतात, “मी जोशीमठ सोडून कुठेही जाणार नाही. मी पळून जाणार नाही. हेच माझं आंदोलन आहे, माझा लढा आहे.”

हे सगळं घडत होतं जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात.

*****

त्यानंतर एक आठवड्याने २० जानेवारी २०२३ रोजी राघव दोन बिगारी कामगारांना आणायला गेले होते. आदल्या रात्री परिस्थिती आणखीच बिघडली. जोशीमठला बर्फाचा प्रचंड मारा सहन करावा लागला. डळमळीत झालेल्या घरांमध्ये राहणाऱ्यांची चिंता आणखीच वाढली. दुपारचा १ वाजला तेव्हा राघव या कामगारांसोबत पलंग, फ्रीजसारखं जड सामान घरासमोरच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून नेऊन ट्रकवर लादत होते.

“बर्फ पडायचं थांबलंय. पण रस्ते ओले आणि निसरडे झालेत. घसरून पडायला होतंय,” राघव फोनवर सांगतात. “सामान हलवणं आमच्यासाठी मुश्किल व्हायला लागलंय.” ते आपल्या कुटुंबासहित इथून ६० किलोमीटरवर असणाऱ्या नंदप्रयागला चाललेत. तिथे, आपल्या बहिणीच्या घराजवळ भाड्याचं घर घेण्याचा त्यांचा विचार आहे.

जोशीमठमध्ये सगळीकडे सध्या बर्फाचा जाड थर जमा झालाय. त्यातूनही घरांच्या भेगा अगदी ठळक उठून दिसतायत. घरांवर मारलेल्या लाल रंगाच्या खुणाही. ज्या भागात घरं, दुकानं किंवा इतर इमारतींच्या पायालाच भेगा आढळून आल्या तिथून लोकांना दुसरीकडे हलवण्यात आलं आहे.

Ranjit Singh Chouhan standing outside his house in Joshimath which has been marked with a red cross signifying that it is unsafe to live in.
PHOTO • Manish Unniyal
A house in Manoharbagh, an area of Joshimath town that has been badly affected by the sinking
PHOTO • Manish Unniyal

डावीकडेः रणजीत सिंह चौहान जोशीमठमध्ये आपल्या घराबाहेर. त्यांच्याही घरावर लाल खुली मारून ते राहण्यासाठी धोकादायक असल्याचं चिन्हित केलं आहे. उजवीकडेः जोशीमठच्या मनोहर बाग भागात जमीन सर्वात जास्त खचली आहे, तिथलं एक घर

रणजीत सिंह चौहान, वय ४३ सुनील वॉर्डातल्या आपल्या लाल फुली मारलेल्या घराबाहेर उभे आहेत. घरासमोर बर्फ साचला आहे. चौहान, त्यांची पत्नी आणि तीन मुलांची जवळच्याच एका हॉटेलमध्ये तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांचं बहुतेक सगळं सामान घरीच आहे. बर्फ पडत असलं तरी चौहान एकदा तरी घरी चक्कर मारून येतात. चोरीमारीची भीती आहे.

“मी माझं कुटुंब डेहराडून किंवा श्रीनगरला हलवायचं म्हणतोय. कुठेही जिथे सुरक्षित असेल तिथे,” ते म्हणतात. चौहान यांचं बद्रीनाथला एक हॉटेल आहे. उन्हाळ्यात ते सुरू असतं. भविष्यात आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय याची कसलीच शाश्वती नाही. एकच गोष्ट त्यांना पक्की माहित आहे – सुरक्षित असण्याची गरज आहे. ११ जानेवारी २०२३ रोजी उत्तराखंड शासनाने दीड लाख रुपये अंतरिम भरपाई देण्याची घोषणा केली. ती रक्कम मिळण्याची ते सध्या वाट पाहत आहेत.

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या, खचत चाललेल्या या गावात पैशाची वानवा आहे. राघव यांचं घर तर आता गेलंच पण त्यात गुंतवलेला पैसाही वायाच गेला असं म्हणावं लागेल. “नवं घर बांधण्यासाठी मी ५ लाख रुपये खर्च केले आहेत. तीन लाख रुपये कर्ज घेतलं होतं ते अजून फेडायचे आहेत,” ते सांगतात. त्यांच्या मनात इतरही काही योजना होत्या. डाव्या डोळ्याला त्रास होत असल्याने त्यांना ते काम सोडून गाड्या दुरुस्त करण्यासाठी गॅरेज उघडायचं होतं. “सगळंच पाण्यात गेलंय.”

*****

अनेक प्रकारच्या विकास प्रकल्पांमुळे हे नुकसान झालं आहे. पण सगळ्यात जास्त नुकसान राष्ट्रीय औष्णिक विद्युत ऊर्जा महामंडळ – एनटीपीसीच्या तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्पासाठी खोदण्यात येणाऱ्या भुयारांच्या कामाने झालं आहे. सध्या उत्तराखंडमध्ये ४२ जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहेत आणि इतर काही आगामी काळात सुरू होणार आहेत. या जलविद्युत निर्मिती प्रकल्पांमुळे जोशीमठवर ही आपत्ती ओढवली आहे. पण ही अशी पहिली घटना नाही .

स्थानिक तहसिल कचेरीसमोर एनटीपीसीविरोधी धरणं आंदोलन सुरू आहे. शहरातल्या बाकी लोकांबरोबर राघवसुद्धा रोज तिथे जातात. या निदर्शनांमध्ये अगदी सुरुवातीपासून सहभागी असणाऱ्या अनिता लांबा सांगतात, “आमची घरं कोलमडून पडली आहेत. पण हे गाव असं ओसाड होऊ नये.” तिशीची ही अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लोकांना “एनटीपीसी आणि त्यांच्या जीवघेण्या प्रकल्पांविरोधात लढण्याचं” आवाहन करत आहे.

he people of the town are holding sit-in protests agianst the tunneling and drilling which they blame for the sinking. A poster saying 'NTPC Go Back'  pasted on the vehicle of a local delivery agent.
PHOTO • Shadab Farooq
Women from Joshimath and surrounding areas at a sit-in protest in the town
PHOTO • Shadab Farooq

डावीकडेः भुयार तयार करण्यासाठी केलेल्या ड्रिलिंगमुळे जमीन खचत असल्याचा आरोप करत लोक आता या कामाविरोधात धरणं आंदोलन करत आहेत. गावातल्या एका ठेकेदाराच्या वाहनावर लावलेलं ‘गो बॅक एनटीपीसी’ पोस्टर. उजवीकडेः जोशीमठ आणि आसपासच्या परिसरातल्या स्त्रिया गावात धरणं धरून बसल्या आहेत

The photos of gods have not been packed away. Raghav is standing on a chair in the makeshift kitchen as he prays for better times.
PHOTO • Shadab Farooq
Ayesha looks on as her mother Gauri makes chuni roti for the Chunyatyar festival
PHOTO • Shadab Farooq

डावीकडेः देव-देवतांच्या तसबिरी अजून हलवलेल्या नाहीत. राघव आता खुर्चीत उभे राहून पूजा करतायत. उजवीकडेः गौरी देवी चुन्यात्यार सणासाठी चूनी की रोटी बनवतायतआणि छोटी आयेशा मागून पाहतीये

२०१७ साली वॉटर अँड एनर्जी इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झालेल्या ‘ हायड्रोपॉवर डेव्हलपमेंट इन उत्तराखंड रीजन ऑफ इंडियन हिमालयाज ’ या लेखात लेखक संचित सरण अगरवाल आणि एम. एल. कंसल उत्तराखंडमधल्या जलविद्युत प्रकल्पांमुळे उद्भवलेल्या पर्यावरणीय समस्यांची यादीच देतात. त्यात चार धाम प्रोजेक्ट आणि सीमा रस्ते संघटना (बीआरओ) बांधत असलेल्या हेलांग बायपासमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

अतुल सती पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत. त्यांनी जोशीमठमध्ये आणखी एक धरणं आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या मते बद्रीनाथ यात्रेला अधिकाधिक भाविक यावेत यावर जोर देण्यात येत आहे. त्यामुळे हॉटेल आणि व्यापारी स्वरुपाच्या इमारतींचं बांधकाम मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे. त्याचा इथल्या भूप्रदेशावर ताण येत आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या बद्रीनाथाला जाणाऱ्या भाविकांसाठी जोशीमठ हे पायथ्याचं शहर आहे. बद्रीनाथ गिर्यारोहणासाठीही प्रसिद्ध आहे. २०२१ साली या दोन्ही ठिकाणी एकूण ३.५ लाख प्रवासी येऊन गेले. हा आकडा जोशीमठच्या लोकसंख्येच्या (जनगणना, २०११) दहा पट आहे.

*****

राघव यांनी एका खुर्चीवर उदबत्तीच्या घरात तीन उदबत्त्या लावल्या आहेत. या छोट्याशा खोलीत त्यांचा सुगंध दरवळतोय.

त्यांच्या सगळ्या सामानाची बांधाबांध सुरू आहे. देवांच्या तसबिरी आणि खेळण्यांना मात्र अजून हात लावलेला नाही. घर सोडून जाताना वाटत असलेली हुरहुर आणि दुःखाने मन जड झालं असलं तरीही त्यांच्या घरी चुन्यात्यार सण साजरा केला जाणार आहे. हिवाळा संपता संपता साजरा होणारा हा सुगीचा सण आहे. या प्रसंगी चूनी रोटी बनवून खाल्ली जाते.

सूर्य कलतो. संध्याप्रकाशात आयेशा आपल्या वडलांची एक घोषणा म्हणत राहतेः

“चूनी रोटी खायेंगे, जोशीमठ बचायेंगे.”

Shadab Farooq

شاداب فاروق، دہلی میں مقیم ایک آزاد صحافی ہیں اور کشمیر، اتراکھنڈ اور اتر پردیش سے رپورٹنگ کرتے ہیں۔ وہ سیاست، ثقافت اور ماحولیات پر لکھتے ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Shadab Farooq
Editor : Urvashi Sarkar

اُروَشی سرکار ایک آزاد صحافی اور ۲۰۱۶ کی پاری فیلو ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز اُروَشی سرکار