अळगिरी सामी बोळकं भरून हसतात, मागाच्या खटखटात ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न करतात. “असं म्हणतात की ५०० वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो आणि या नदीच्या तीरावर आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला,” ते सांगतात. “पण मला तर वाटतं, आम्ही मच्छीसाठी इथे आलो असणार.”
कुथमपल्ली गावातल्या एका केंद्रात ८५ वर्षीय सामी काम करतायत. एका रांगेत तीन असे बारा माग मांडून ठेवलेले आहेत. शेडच्या बाजूला कोइम्बतूर आणि मल्लपुरमच्या सूत गिरण्यांमधून आलेल्या सुताची रिळं दिसतायत, धागे वाळत घातलेत आणि कसावु (जरीच्या) गुंडाळ्या स्टार्चच्या द्रवात भिजत घातल्या आहेत जेणेकरून त्या कडक राहतील. पिवळसर रंगाच्या, सोनेरी काठाच्या तयार वेष्टी आणि जरीत हत्ती, मोर असं नाजूक नक्षीकाम केलेल्या साड्या गिऱ्हाइकांच्या हातात जायची वाट पाहतायत.
ही शेड आणि त्या शेजारचं दुकान सामींच्या कुटुंबाच्या मालकीचं आहे. ते देवांग चेट्टियार या विणकर समाजाचे आहेत. १९६२ मध्ये तामिळ नाडूमधून ते इथे आले आणि त्यांनी भागीरथी अम्मांशी विवाह केला. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की या ५०० वर्षांपूर्वी कोचीच्या राजाने राजघराण्यासाठी वस्त्र विणण्यासाठी या समाजाच्या लोकांना आमंत्रित केलं आणि ते कर्नाटकातून केरळमध्ये स्थायिक झाले. उत्तरेला भरतपुळा आणि पश्चिमेला गायत्रीपुळा (जिला पोन्ननी असंही म्हणतात) नदी अशा प्रदेशात ते स्थायिक झाले.












